नवनिर्वाचित मंत्री नितेश राणे यांचे देवगडात जल्लोशी स्वागत
देवगड
देवगडकरांच्या नि:स्वार्थी प्रेमामुळे मी या तालुक्याचा मंत्री झालो. मात्र आज संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर असली तरी अख्ख्या महाराष्ट्राला न्याय देताना माझा एक डोळा देवगडवर राहील आणि प्रशासन तसेच सर्व अधिकारी वर्ग आपल्या देवगडवासीयांना सहकार्य करतील अशी ग्वाही राज्याचे मत्सोद्योग आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी पडेल येथे दिली. ते पुढे म्हणाले की, देवगड तालुक्यातील गावागावातील प्रश्न मला ज्ञात आहेत. ते सर्व प्रश्न मंत्री म्हणून मार्गी लावण्यासाठी तुमच्या घरातला मुलगा किंवा भाऊ म्हणून मी कार्यरत राहीन.
मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ना. नितेश राणे यांनी पडेल येथे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. जेसीबीच्या माध्यमातून नवनिर्वाचित मंत्री नितेश राणे यांच्यावर पुष्पवर्षाव करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा पडेल मंडल अध्यक्ष बंड्या नारकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, सदस्य प्रकाश बोडस, बाळा खडपे, रवी पाळेकर, अमोल तेली, आरिफ बगदादी, उत्तम बिर्जे, भूषण पोकळे, संजय बोंबडी, मकरंद जोशी, माजी आमदार अजित गोगटे, अंकुश टुकरूल, संजना आळवे, लता गिरकर, संदीप साटम आदी पदाधिकारी उपस्थित होते. या भव्य सत्कार सोहळ्यावेळी उपस्थित असलेल्या प्रत्येक देवगडवासीयांच्या मनात आपला आमदार मंत्री झाल्याचा सार्थ अभिमान ओसंडून वाहत होता. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश माळोदे यांनी केले.