सावंतवाडीत २९ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत “सावंतवाडी महोत्सव”…
दीपक केसरकर मित्र मंडळाचे आयोजन; विविध कार्यक्रमासह फुड स्टाॅलची मेजवानी…
सावंतवाडी
दीपक केसरकर मित्र मंडळ, रोटरी आणि इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी उद्यानाच्या समोर २९ ते १ जानेवारी या कालावधीत “सावंतवाडी महोत्सवाचे” आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा शुभारंभ कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे व सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे तालुकाप्रमुख नारायण राणे व माजी नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी दिली.
श्री. केसरकर यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी सुमेधा नाईक, रिया रेडीज, शर्वरी धारगळकर, अर्चित पोकळे, सायली होडावडेकर, सुरेंद्र बांदेकर, गजानन नाटेकर, नंदू शिरोडकर आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. राणे पुढे म्हणाले, या महोत्सवात विविध फूडचे तब्बल ४० स्टॉल लावण्यात येणार असून त्याचा आनंद खवय्यांना घेता येणार आहे. २९ तारीख ला हा महोत्सव सुरू होणार आहे. यात पहिल्या दिवशी रोटरॅक्ट क्लबच्या वतीने “ऑर्केस्ट्रा” सांज से संगीत हा कार्यक्रम होणार असून यावेळी महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम धनश्री कोरगावकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. ३० डिसेंबरला इनरव्हील क्लबच्या माध्यमातून “इनरव्हील क्वीन” हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी रिया रेडीज ९४२२०७६७२१ यांच्याशी संपर्क साधावा. ३१ डिसेंबरला आवाज आर्ट इव्हेंट निमित्त “बेधुंद 2025” जल्लोष नववर्षाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यावेळी सुप्रसिद्ध वादक शैलेश वाटोळे यांचा ऑर्केस्ट्रा होणार आहे. तसेच यावेळी इंडियन आयडॉल फेम राहुल खरे, सुर नवा ध्यास नवा महाविजेती सुनिता धापटे, सारेगामापा मराठी फेम ब्रम्हानंदा पाटणकर, गोवा आयडॉल समृद्धी चोडणकर आदी उपस्थित राहणार आहेत. तर शेवटच्या दिवशी स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम व समारोप होणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.