कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग सज्ज
खारेपाटण येथे होणार ऐतिहासिक स्वागत..!
२२ डिसेंबरला खारेपाटण ते बांदा व्हाया देवगड असे ठिकठिकाणी होणार जंगी स्वागत
जिल्हा भाजपतर्फे स्वागताची जय्यत तयारी
कणकवली येथे होणार भाजपच्या वतीने मंत्री नितेश राणे यांचा भव्य नागरी सत्कार
कणकवली : राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे २२ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत. मंत्री झाल्यानंतर नितेश राणे हे पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील येत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी जिल्हा भाजपा कडून करण्यात येत आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात मंत्री नितेश राणे यांचा नागरी सत्कार केला जाणार असून, जिल्हा भाजपाच्या वतीने होणाऱ्या या स्वागताची जय्यत तयारी केली जात आहे. या स्वागताच्या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यात जागोजागी मंत्री नितेश राणे यांच्या स्वागताचे भले मोठे बॅनर लागले आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने रुग्णालयासमोरील मैदानावर जाहीर नागरी सत्कार केला जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंत्री नितेश राणे यांचे भव्य दिव्य स्वागत केले जाणार असून, या स्वागतसाठी कोणतीही कसूर राहू नये यासाठी भाजप महायुतीचा कार्यकर्ता सक्रिय झाला आहे.भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांनी नेत्र दीपक असा हा सत्कार सोहळा करण्याचे नियोजन आहे. कणकवली शहरात या स्वागत सोहळ्याच्या निमित्ताने अनेक ठिकाणी स्वागत कमानी देखील उभारल्या जाणार आहेत. तर उपजिल्हा रुग्णालया समोर पासून शहरात जागोजागी भाजपाच्या झेंड्यांनी वातावरण भाजपमय केले जाणार आहे. महायुती मधील घटक पक्ष देखील या स्वागत सोहळ्यास सहभागी होणार आहे.
२२ डिसेंबरला सकाळी ९:३० वाजता खारेपाटण येथे मंत्री नितेश राणे यांचे आगमन झाल्यावर ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत होणार आहे. त्यानंतर १०:१५ वाजता तळेरे येथे येऊन पंधरा मिनिटे तळेरे येथे थांबतील, तिथे स्वागत स्वीकारतील. त्यानंतर फणसगाव करून ११:१५ वाजता पडेल कॅन्टीन येथे पोहोचतील. तिथे त्यांचे स्वागत झाल्यानंतर १२ वाजता देवगड ला येतील. तिथे त्यांचे स्वागत होईल. १२:४५ वाजता तळेबाजार येथे स्वागत होईल. दुपारी १:१५ वाजता शिरगाव, दुपारी १:४५ मिनिटांनी नांदगाव करून त्यानंतर दुपारी २:३० वाजता भारतीय जनता पार्टीच्या वसंत स्मृती, ओरोस येथील जिल्हा कार्यालयामध्ये दाखल होतील. तत्पूर्वी जिल्हा मुख्यालय येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. भाजप जिल्हा कार्यालयाच्यावतीने त्या ठिकाणी त्यांचा सत्कार होईल आणि त्यानंतर ३ वाजता सिंधुदुर्ग जिल्हा बैंक कार्यालयात ते भेट देतील. जिल्हा बँकेमध्ये स्वागत झाल्यानंतर ते बांद्याकडे रवाना होतील. ४ वाजता बांदा, ४:४५ वाजता दोडामार्ग येथे स्वागत होणार आहे. त्यानंतर ते कणकवलीकडे रवाना होतील. सायंकाळी ७ ते ९ दरम्यान कणकवलीमध्ये भाजपच्यावतीने नागरी सत्कार होणार आहे. अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली आहे.