सावंतवाडी :
सावंतवाडी तालुक्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांनी एकत्र येत आंबेगावात पाणी अडवा पाणी जिरवा या उपक्रमांतर्गत बंधारा बांधत गावातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी बंधाऱ्याचे व श्रमदानाचे महत्व सर्वांसमोर ठेवले. तसेच पाणी म्हणजे जीवन, पाण्याचे महत्त्व मानवी जीवनात अमूल्य असून जर ग्रामीण भागातील माणसांचे जीवन, भविष्य उज्ज्वल तसेच समृद्ध करायचे असेल बंधाऱ्यांचे महत्त्व अधोरेखित केले पाहिजे.
ग्रामीण भागातील सर्व ग्रामरोजगार सहाय्यक मानधन तत्त्वावर नेहमीच गावातील लोकांचे जीवन समृद्ध करण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत अनेक उपक्रम गावात राबवित असतात. त्याचा फायदा गावातील जनतेला होऊन ग्रामीण मानवी जीवन समृद्ध होत आहे. ग्रामीण भागात ग्राम रोजगार सहाय्यक यांच्या मार्फत शेतकर्यांना फळबाग लागवड, सिंचन विहिरी, पशू पालन गोटा, शोषखड्डा, जलतारा, कच्चे रस्ते असे अनेक उपक्रम ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात येतात.
सावंतवाडी तालुका ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेच्या आंबेगाव येथील या उपक्रमासाठी आंबेगाव सरपंच शिवाजी परब, उपसरपंच रमेश गावडे, कृषी सहाय्यक तृप्ती राणे यांचेही सहकार्य लाभले. यावेळी ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिताराम ऊर्फ अण्णा केळुसकर, सचिव स्नेहा कुडतरकर, गुरुनाथ आरोसकर, सिद्धेश गोसावी, शिवराम मेस्त्री, मयुरी नाईक, मानसी राणे, परेश गावडे, कृष्णा सावंत आदींसह सावंतवाडी तालुक्यातील ग्रामरोजगार सहाय्यक उपस्थित होते.