कॅबिनेट मंत्री नितेश राणे २२ डिसेंबरला सिंधुदुर्गात…
जिल्हा भाजपतर्फे स्वागताची जय्यत तयारी ; उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात होणार नागरी सत्कार
कणकवली
राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे २२ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत. मंत्री झाल्यानंतर नितेश राणे हे पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील येत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी जिल्हा भाजपा कडून करण्यात येत आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात मंत्री नितेश राणे यांचा नागरी सत्कार केला जाणार असून, जिल्हा भाजपाच्या वतीने होणाऱ्या या स्वागताची जय्यत तयारी कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांकडून केली जात आहे. या स्वागताच्या निमित्ताने कणकवली शहरात जागोजागी मंत्री नितेश राणे यांच्या स्वागताचे भले मोठे बॅनर लागले असून उपजिल्हासमोरील रुग्णालयासमोरील मैदानाच्या साफसफाई चे देखील काम आजपासून हाती घेण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंत्री नितेश राणे यांचे भव्य दिव्य स्वागत केले जाणार असून, या स्वागतसाठी कोणतीही कसूर राहू नये यासाठी समीर नलावडे व गोट्या सावंत यांच्याकडून पुरेपूर काळजी घेतली जात आहे. नेत्र दीपक असा हा सत्कार सोहळा करण्याचे नियोजन आहे. कणकवली शहरात या स्वागत सोहळ्याच्या निमित्ताने अनेक ठिकाणी स्वागत कमानी देखील उभारल्या जाणार आहेत. तर उपजिल्हा रुग्णालया समोर पासून शहरात जागोजागी भाजपाच्या झेंड्यांनी वातावरण भाजपमय केले जाणार आहे. महायुती मधील घटक पक्ष देखील या स्वागत सोहळ्यास सहभागी होणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. यासोबत कणकवली शहरासह कणकवली तालुक्यामध्ये भाजपाच्या बैठका घेतल्या जात असून जास्तीत जास्त भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी व जनता या स्वागत व सत्कार सोहळ्यात सहभागी होणार आहे. अशी माहिती श्री. नलावडे यांनी दिली.