पुणे :
पुणे येथे शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन दिनांक 20,21 व 22 डिसेंबर रोजी बालगंधर्व रंग मंदिरामध्ये आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्त काही लेखक असलेल्या सनदी अधिकाऱ्यांचा हा परिचय.
सुप्रसिद्ध सनदी अधिकारी श्री पुरुषोत्तम भापकर यांचा माझा परिचय अमरावतीचे तत्कालीन जिल्हाधिकारी व राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री रवींद्र जाधव यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात करून दिला .त्याचे असे झाले की श्री रवींद्र जाधव साहेबांची बदली अमरावती वरून झाली आणि नवे जिल्हाधिकारी म्हणून श्री पुरुषोत्तम भापकर हे चार्ज घेण्यास अमरावतीला आले. योगायोगाने मी त्यावेळेस जिल्हाधिकारी कार्यालयात होतो. श्री रवींद्र जाधव यांचे माझे कौटुंबिक संबंध होते .नात्याने ते माझे व्याही लागत होते. हा जिल्हाधिकारी पदाचा चार्ज घेण्याचा सोहळा माझ्या समक्ष पार पडला. श्री पुरुषोत्तम भापकर यांनी अमरावतीततच नव्हे जिथे जिथे ते गेले तिथे मनापासून भरीव परिवर्तनशील व आचरणपूर्वक कार्य केले. त्यामुळे त्यांची प्रत्येक गावातली कार्यकिर्द ही नमूद करण्यासारखी आहे. लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण अशी परिस्थिती त्यांची नाही आहे . आधी केले मग सांगितले ही प्रवृत्ती त्यांची जास्त आहे .त्यामुळे आजही वयाची इतके वर्ष गाठल्यानंतरही ते सर्वसामान्य माणसाप्रमाणे वागतात. बोलतात आणि प्रत्यक्ष आचरणात आणतात. ते जिल्हाधिकारी असताना तंतोतंत वेळेवर येणे. हा त्यांचा नित्यक्रम होता. इतरांनीही वेळेवर यावे हा त्यांचा कटाक्ष होता .ग्राम स्वच्छता अभियान खऱ्या अर्थाने राबविले ते श्री पुरुषोत्तम भापकर यांनीच. जिल्हाधिकारी असताना त्यांनी स्वतः हातात झाडू घेतला आणि सर्वप्रथम जिल्हाधिकारी परिसर स्वच्छ केला आणि इतरही विभागाला तसे आदेश दिले व त्यात स्वतःही सहभागी झाले.श्री संत गाडगे महाराज यांचा ग्रामस्वच्छता अभियान राबविणारा हा अधिकारी स्वतः चांगला लेखक आहे कवी आहे चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. म्हणजे ज्या ज्या सामाजिक चळवळी आहेत त्या चळवळीमध्ये भापकरसाहेबांनी स्वतः झोकून दिलेलं होतं .त्यामुळे त्यांचा कोणताही कार्यक्रम यशस्वी संपन्न होत असे .अमरावतीला असताना त्यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना चांगल्या सवयी लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले .त्यानिमित्ताने आम्ही आणि भापकरसाहेब एकत्र आलो .एकत्र आहोत. आणि एकत्र राहणारही आहोत. आज जरी ते सेवानिवृत्त झाले असले तरी एक लेखक म्हणून एक कवी म्हणून एक गायक म्हणून आणि एक चित्रपट निर्माता म्हणून त्यांनी आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. हा माणूस स्वतः शेतीवर राबणारा आहे .शेतीतून पीक काढणारा आहे आणि शेतकऱ्यांप्रमाणेच इतरांचेही प्रश्न सोडवण्यामध्ये व त्यांना मदत करण्यामध्ये या माणसाचा हातखंडा आहे.
पुढे भापकर साहेब संभाजीनगर येथे मनपा आयुक्त म्हणून गेले. तिथे त्यांनी क्रांती चौकातील संत एकनाथ नाट्यगृहात माझा मी आयएस अधिकारी होणार हा गाजलेला कार्यक्रम ठेवला. विशेष म्हणजे साहेब नुसते नियोजन करून थांबले नाहीत तर स्वतः प्रत्यक्ष प्रेक्षकांमध्ये बसले. त्यांनी हा जो मनाचा मोठेपणा दाखविला तो खरोखरच नमूद करण्यासारखा आहे. पुढे भापकरसाहेब संभाजीनगरचे विभागीय आयुक्त झाले .माझे त्यांच्याकडे नियमित जाणे येणे आहे .हा माणूस स्वतः चांगला लेखक आहे .चांगला कवी आहे .चांगला गीतकार आहे. आणि तेवढाच चांगला माणूसही आहे. त्यांचं कार्य इतके मोठे आहे की त्यांच्या कार्यावर चित्रपट देखील निघालेला आहे .सर्वसामान्य माणसाचे दुःख जाणणारा व त्यामध्ये सहभागी होणारा व त्यांचे दुःख हलके करणारा व दूर करणारा अधिकारी म्हणून या संवेदनशील लेखक असलेल्या श्री पुरुषोत्तम भापकर यांचे नाव घेतल्या जाते.
एक दिवस मी शेवगावच्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात व्याख्यान देण्यासाठी गेलो. याच महाविद्यालयामध्ये प्रा. पुरुषोत्तम भापकर हे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांचे गाव सालवडगाव जवळच असल्याचे कळले .मी त्या गावात पोहोचलो .त्यांच्या घरी गेलो .साधेसुधे घर .साधे इन्व्हर्टर पण त्यांच्या घरी नव्हते .इतके साधे . भापकर साहेबांना फोन केला की मी त्यांच्या गावाला आलेलो आहे. मी गावाला आलेलो पाहून त्यांना खूपच आनंद झाला .ते लगेच संभाजीनगर वरून सालवडगावला आले. मला भेटले .आम्ही सोबत त्यांच्या घरी जेवण केले. गावातील एक कार्यक्रम केला. कार्यक्रम संपल्यानंतर साहेबांनी मला त्यांच्या पुतण्याची भेट करून दिली. तो नोकरी करीत नाही. त्यांचा पुतण्या एम ए बी एड आहे. पण तो शेती करतो. शेतीवर त्याचे प्रेम आहे. मला साहेबांच्या स्वभावाची कमाल वाटत होती . गप्पागोष्टी करता रात्रीचे दहा वाजले . आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. शेवगाव फाट्यापर्यंत साहेबांनी मला त्यांच्या शासकीय गाडीत बसविले .माझी गाडी मागे-मागे येत होती फाट्यावर आमची गाडी थांबली. साहेब गाडीतून खाली उतरले .त्यांनी मला माझ्या गाडीत बसविले. मला निरोप दिला .माझी गाडी सुरू झाल्यावरच ते स्वतःच्या गाडीकडे वळले . श्री पुरुषोत्तम भापकर साहेबांचा माझा पहिला परिचय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे खाजगी सचिव श्री रवींद्र जाधव करून दिला होता. जिल्हा अधिकारी असताना त्यांनी केलेले कार्य असामान्य होते. अगदी जीव ओतून त्यांनी अमरावती जिल्ह्याचा विकास केला .सकाळी नियमितपणे फिरायला जाणे .हा त्यांचा छंद. आमची भेट रोज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात व्हायची. त्यांचे दरवाजे सर्वांसाठी सदासर्वदा खुले असायचे. त्यांनी अमरावती जिल्ह्यातील जनतेसाठी नोंदणीय काम केले व लोकांचे हृदय जिंकले. आजही लोक भापकर साहेबांचे नाव काढतात. औरंगाबादला ते आल्यावरही त्यांनी विविध उपक्रम राबविले व लोकांची मने जिंकली . याचे कारण एकच आहे की साहेब गरीब परिस्थितीतून शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत . त्याची त्यांना जाणीव आहे. म्हणूनच ते जोमाने काम करीत आहेत .हे काम सातत्याने करण्यासाठी व लेखनासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा..!
======================
प्रा *.डॉ.नरेशचंद्र काठोळे*
संचालक मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003