You are currently viewing न्हावेलीत दोन किलोमीटरच्या परिसरात गतिरोधक बसवा

न्हावेलीत दोन किलोमीटरच्या परिसरात गतिरोधक बसवा

उपसरपंच अक्षय पार्सेकर यांची बांधकाम विभागाकडे मागणी

सावंतवाडी :

न्हावेली गावातून जाणाऱ्या सावंतवाडी – रेडी या राज्य मार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी तत्काळ गतिरोधक बसवण्यात यावेत अशी मागणी गावचे उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. दरम्यान जिल्हा नियोजन मधून निधी प्राप्त झाल्यानंतर तात्काळ हे काम हाती घेण्यात येईल असे आश्वासन बांधकामचे उपकार्यकारी अभियंता वैभव सगरे यांनी दिले.

गेले काही दिवस न्हावेली परिसरात अपघातांचे प्रमाण वाढल्यामुळे याबाबत ग्रामस्थांच्या माध्यमातून बांधकामचे लक्ष वेधण्यात आले. यात या राज्यमार्गावर अन्य ठिकाणी गतिरोधक उभारण्यात आले आहेत. परंतु न्हावेली गावातून जाणाऱ्या दोन किलोमीटरचा भाग वगळण्यात आला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अपघात होत आहे. परिणामी या मार्गावर एक प्राथमिक शाळा तसेच ७० ते ८० घरे लागून असल्यामुळे तसेच मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याच वेळा अपघात होतात. हे प्रकार रोखण्यासाठी लवकरात लवकर याबाबत योग्य ती उपाययोजना करा अशी मागणी यावेळी पार्सेकर यांनी केली.

याबाबत आपण पाठपुरावा करु जिल्हा नियोजन मधून निधी प्राप्त झाल्यानंतर ग्रामस्थांची मागणी लवकरच पूर्ण केली जाईल असे आश्वासन वैभव सगरे यांनी यावेळी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळात दिले. यावेळी राज धवण, विठ्ठल परब, दिपक पार्सेकर, अनिकेत धवण, सिद्धेश धवण, कृणाल पार्सेकर, प्रथमेश आरोंदेकर, पुनीत नाईक, सौरभ पार्सेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा