घरात खणलेल्या खड्ड्यात बसून “विशाल जाधव” करणार होता पूजा
पोलिसांचे पथक आरोपीला घेऊन चिपळूणला रवाना
नळबळीची शक्यतेच्या दृष्टीने पोलिसाचा तपास सुरु
कुडाळ
तालुक्यात हिर्लोक आंबेडकरवाडी येथील विशाल जाधव यांच्या घरात संशयास्पद होत असलेल्या जादूटोणा व अघोरी पूजेच्या दरम्याने खणण्यात आलेल्या आठ फुटी खड्ड्यात मंगळवारी रात्री विशाल जाधव हे स्वतः बसून पूजा करणार होते. तेथील सर्व गोष्टी या संशयास्पद असल्याने या ठिकाणी नरबळीची शक्यता होती का ? या दृष्टीने तपास करीत आहोत, अधिक तपासासाठी चिपळूण येथे एक पथक संशयित आरोपी सुस्मित गमरे याच्या घरी पाठवले आहे अशी माहिती कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.
हिर्लोक येथील विशाल जाधव यांच्या घरात आठ फूट खोल खड्डा खणून अघोरी पूजा करण्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी विशाल जाधव व त्यांची पत्नी हर्षाली जाधव (दोघेही रा. हिर्लोक, सद्या रा., धोबीबाळी, ठाणे) यांच्यासह सुस्मित गमरे (वय ३३ वर्षे रा. साईनिवास सोसायटी, चिपळूण), अविनाश संते (वय ३२ वर्षे) व दिनेश पाटील (वय ३४ वर्षे दोघेही रा. उसरघरगांव, दिवारोड, डोंबिवली) यांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या पाच जणांना ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयाने या पाचही जणांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून आता पोलीस या प्रकरणाच्या तपास करीत असताना विविध माहिती समोर येत आहे.
या प्रकरणाबाबत पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, या तपासात विशाल जाधव व त्यांची पत्नी यांचा जबाब घेतला असून त्यांनी जबाब मध्ये त्यांना मुल बाळ होत नाही तसेच वास्तूमध्ये शांती नाही या करिता ही पूजा आयोजित केली होती व घरामध्ये जो खड्डा मारला होता त्यामध्ये विशाल जाधव हे पूजेला बसणार होते.विशाल परब यांच्या अंगात एका देवीचा संचार येतो व या संचारानेच हा पूजेचा उपाय त्यांना सांगितला होता व त्या दृष्टीने त्यानंतरच त्यांनी अशा पद्धतीची पूजा करायला सुरुवात केली अशी माहिती जबाबात दिलेली आहे.
जून पासून खड्डा मारण्यास सुरुवात-
विशाल जाधव यांच्या अंगात आलेल्या देवीच्या संचाराने सांगितल्या प्रमाणे विशाल जाधव व त्यांच्या पत्नीने जून महिन्यात गावाकडच्या घरात येत काही अंतर खोल खड्डा खणला होता. त्यानंतर पुन्हा सप्टेंबर महिन्यात व आता १३ डिसेंबर पासून १६ डिसेंबर पर्यंत अंतिम खड्डा आठ फुटाचा मारण्यात आला.
खड्ड्यातील माती घरातच ठेवली-
घरात मारण्यात येणाऱ्या खड्ड्याची माती ही बाहेर परिसरात न टाकता घरातच ठेवण्यात आली होती त्यामुळे ही माती बाहेर न टाकता घरातच का ठेवली कोणाला कळू नये का असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नरबळीची शक्यता नाकारता येत नाही- मगदूम
संबंधित प्रकरणातील पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याबरोबरच या ठिकाणी मांडणी करून ठेवण्यात आलेला कोयता, सुरी तसेच इतर साहित्य यामुळे या ठिकाणी नरबळीची शक्यता नाकारता येत नसून या दृष्टीने आमचा तपास सुरू असल्याचेही पो. नि. राजेंद्र मगदूम यांनी सांगितले.
एक पथक चिपळूणला रवाना-
या प्रकरणातील संशयित आरोपी सुस्मित गमरे हा भगत असून तो जाधव यांच्याबरोबर गेले कित्येक महिने सोबत आहे त्यामुळे त्याच्या चिपळूण येथील राहत्या घराकडे या किंवा अन्य प्रकरणातील काही धागेदोरे सापडतात का याचा तपास करण्यासाठी त्याच्या घरी पोलिसांचे एक पथक गमरे याच्यासह गुरुवारी पाठविण्यात आले आहे.
हिर्लोक येथील या जाधव यांच्या घराघडील पूजेची मांडणी पाहता पोलिसांना सर्व संशयास्पद गोष्टी आढळून आल्या असल्याने जादूटोणा व अघोरी कृत्य सुरू होते याची खात्री झाली आहे. मात्र यातील संशयित सर्व आरोपी हे खड्डा का काढला याच योग्य असं उत्तर देत नसून आता पोलीस तपासात काय माहिती पुढे येणार आहे याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे