बांदा येथील माकडांचा उपद्रव रोखा…
ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर यांची वनखात्याकडे मागणी…
सावंतवाडी
बांदा परिसरात माकडांपासून होणारा उपद्रव व शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी माकडांचा बंदोबस्त करावा यासाठी बांदा ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर यांनी उपवनसंरक्षक यांची भेट घेऊन याविषयी सविस्तर चर्चा केली व त्यांना निवेदन सादर केले.
बांदा परिसरात माकडांपासून शेती बागायतीचे भरपूर नुकसान होत आहे. नागरिक व शेतकरी यांना माकडांच्या उपद्रवापासून रोखण्यासाठी जलद कृती दलामार्फत त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य तथा उबाठा शिवसेना बांदा शहरप्रमुख साई काणेकर यांनी आज जिल्हा उपवनसंरक्षक नंदकुमार रेड्डी यांच्याकडे केली आहे.
काणेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बांदा शहरात भरवस्तीत माकड, वानरांचा धुडगूस सुरू आहे. तसेच परिसरात शेती, बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात येते. वनविभागाच्या जलद कृती दलामर्फत माकड, वानरे यांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मोहीम सुरु आहे. ती कौतुकास्पद असून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. तशीच कार्यवाही आपण बांदा शहरात करून माकडांचा बंदोबस्त करावा.
उपवनसंरक्षक नंदकुमार रेड्डी यांनी याबाबत वनविभाग सतर्क असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी हि मोहीम राबविण्यात येत आहे. बांदा शहरात देखील लवकरच माकड पकड मोहीम राबविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी काणेकर यांच्या सोबत भाऊ वाळके उपस्थित होते.