नरबळीची अगर अघोरी कृत्याची शक्यता पोलिसांची कसून चौकशी
कुडाळ :
कुडाळ तालुक्यातील हिर्लोक आंबेडकरवाडी मध्ये राहत्या घरात तब्बल ८ फूट खोल खड्डा खणून सुरू असलेला अघोरी प्रकार पोलिसांनी उधळून लावला. याप्रकरणी एका दाम्पत्याला तब्बल ५ जणांना अटक करण्यात आले. त्या ठिकाणीं मिळालेले सुरी, कोयता, लिंबू, पाने, कवडे, बिब्बे आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. गृहदोष आणि मुलं होत नसल्यामुळे या ठिकाणी नर बळीची शक्यता होती, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार पोलीस पुढील तपास करत आहे.
विशाल विजय जाधव (वय ३०, रा. हिर्लोक आंबेडकरवाडी ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग सध्या काजोळकर हाऊस, राजश्री प्लाम्सचे बाजूला धोबीबाळी, ठाणे पश्चिम), सुस्मित मिलिंद गमरे (वय ३३ रा. पातेपिलवली, चिपळूण जि. रत्नागिरी) सौ. हर्षाली विशाल जाधव पूर्वाश्रमीची समृद्धी अविनाश हडकर (वय ३५ रा. हिर्लोक आंबेडकरवाडी ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग सध्या रा. ठाणे पश्चिम) अविनाश मुकुंद संते (वय ३२ रा उसरघरगांव, मानपाडा, दिवारोड डोंबिवली पूर्व जि. ठाणे) दिनेश बलराम पाटील (वय ३४ रा उसरघरगांव, मानपाडा, दिवारोड डोंबिवली पूर्व जि. ठाणे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, हिर्लोक आंबेडकरवाडी येथील विशाल विजय जाधव नामक व्यक्तीच्या घरात काहीतरी संशयास्पद हालचाली असून घरात कोणतीतरी जादूटोणा करणारी अघोरी कृती चालल्याचा दाट संशय आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलीस हवालदार मंगेश जाधव यांनी आंबेडकरवाडी येथील विशाल विजय जाधव यांच्या राहत्या घरात जाऊन खातरजमा केली. यावेळी तिथे ८ फूट खोलीचा खड्डा खणलेला आढळला. अनिष्ट प्रथेचा वापर करून जादूटोणा करणारे साहित्य सुद्धा आढळून आले. यात लिंबू, पान, सुपारीचे विडे, हळद, पिंजर, नारळ, फळे, फुले, तीळ, बर्फीचे तुकडे, पणत्या, अबीर, डमरू, रुद्राक्ष माळ, चामड्याचे छोटे चप्पल जोड, पांढरे कापड, गांधी टोप्या, बाजूला छोट्या काठ्या, कांबळी घोंगड्याचे तुकडे, कवडे, बिब्बे अश्या साहित्याची मांडणी करून नरबळी अगर कोणत्या तरी अघोरी कृतीकरिता कोयता आणि सुरी अशी हत्यारे मांडणी केलेल्या स्थितीत दिसून आली.
आवळेगाव दूरक्षेत्राच्या पोलिसांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना ही हकीकत कळवली. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, पोलीस हवालदार कृष्णा केसरकर, प्रीतम कदम, अनिल पाटील, महिला पोलीस ज्योती रायशिरोडकर यांनी घटनास्थळी पोचले. वस्तुस्थितीची खात्री करीत खड्डा खोदण्याचे कारण विचारले असता जाधव यांचे गृहदोष असल्याने तसेच मूल बाळ होत नसल्याने त्यांची पीडा दूर करण्यासाठी ही अघोरी पूजा केल्याचे सांगितलेले आहे. परंतु ते समाधानकारक माहिती देत नसून गुन्ह्याची सखोल अन्वेषणाकरिता नमूद सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. आरोपींनी घटनास्थळी येण्याजाण्याकरिता वापरलेली इको कार MH 05 EV 6561 जप्त करण्यात आलेली आहे. पोलीस हवालदार मंगेश जाधव यांनी सदरबाबत फिर्याद दिलेली आहे. अधिक तपास स्वतः पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम हे करीत आहेत.