You are currently viewing लाईफ इज अ ब्लिस

लाईफ इज अ ब्लिस

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*

 

*द शो मस्ट गो ऑन*

 

 *लाईफ इज अ ब्लिस*

 

संसाराचा खेळ म्हणजे ऊन पावसाचा. कधी स्वच्छ सूर्यप्रकाशात जीवन चैतन्यमय भासेल, तर दुसऱ्याच क्षणी प्रचंड वादळ निर्माण होऊन तेच जीवन नकोसे वाटू लागेल, पण म्हणून जगणे थांबते का?

त्या निर्मात्याची लीलाच आगाध! त्याने माणसाचे मन कसे बनवले आहे बघा ना. जेव्हा सगळ्या गोष्टी मनासारख्या होत असतात, तेव्हा माणूस आजूबाजूला बघत नाही. मी चांगल्या मोठ्या घरात राहत आहे, सुशिक्षित कुटुंबाचा मी एक घटक आहे, माझा जोडीदार मनासारखा आहे, मी नामांकित कंपनीत उच्च पदावर काम करतो म्हणून आनंदी आहे, मला जीवन हवे हवेसे वाटते. अशावेळी त्या जीवनदात्याची आठवण येते का?

या उलट जरासे काही मनाविरुद्ध घडू द्या, लगेच मुखावाटे उद्गार निघतात, ” परमेश्वरा तुझे माझ्याकडे लक्ष का नाही? माझ्यापेक्षा कमी शिकलेल्या त्याला तू एवढे सगळे दिलेस आणि मला मात्र इतके कष्ट! त्याच्याकडे सगळे आहे. गाडी बंगला

नोकर चाकर सुविद्य जोडीदार आणि माझ्याच वाट्याला एवढे हे दुःख का?”

हा माणसाचा स्वभाव आहे. जे आहे त्यात समाधानी रहावे ही त्याची वृत्ती नसल्यामुळे तो नेहमी दुसऱ्या सोबत स्वतःची विनाकारण तुलना करतो आणि दुःखी होतो.

खेळ म्हटला की त्यात हार जीत असणारच! परंतु हार झाली म्हणून खेळणेच थांबवायचे का? एकदा वर्ल्ड कप हातात येता येता निसटला पण पुन्हा खेळताना मिळाला ना? जगणे असेच आहे. जिद्द नाही सोडायची.

हे आयुष्य आहे. चौर्‍याऐंशी लक्ष योनीतून फिरल्यानंतर माणसाचा जन्म मिळतो असे म्हणतात. हा माणसाचा जन्म भाग्याने मिळालेला आहे, म्हणूनच म्हणतात, लाईफ इज अ ब्लिस. जीवन फार खुमासदार आहे, त्याची चव घेत जगा. किडा मुंगी पक्षी प्राणी वनस्पती सर्वातच जीव असतो, परंतु एक माणूस असा आहे की त्याची बुद्धी तल्लख आहे.

तो बोलू शकतो, संवाद साधू शकतो.

आज माणसाचा इतिहास पाहिला की गेल्या शेकडो वर्षापासून ते आज पर्यंत माणसाने त्याच्या बुद्धी

चातुर्याच्या जोरावर सर्वच क्षेत्रात किती प्रगती केली आहे? तंत्रज्ञान, वैद्यकीय ज्ञान, शास्त्रज्ञान आणि नैसर्गिक साधने यांच्या सहाय्याने माणूस नैसर्गिक आणि मानवनिर्मित सर्वच संकटांचा सामना करण्यासाठी सुजाण, सक्षम बनला आहे.

तीन वर्षांपूर्वी कोरोना नामक विषाणुने संपूर्ण जगात हैदोस घातला होता नुसता! असंख्य बळी घेतले या व्हायरसने, पण म्हणून या भूतलावरचे जगणे संपले का? माणसाने या विषाणुची लस शोधून काढली आणि न डगमगता त्यावर मात केलीच ना? आजही माणसे कोविडने आजारी पडतात, परंतु ते तीन वर्षांपूर्वीचे भय आता नाही ना राहिले?

 

वादळ कितीही मोठे असो, वृक्ष उन्मळून पडतील, अतिवृष्टीने घरे दारे वाहून जातील, वीज कोसळून धरणी दुभंगेल पण काही वेळाने सर्व शांत होऊन चकचकीत सूर्यप्रकाश नक्की पडणारच! हीच तर त्या विधात्याची लीला आहे. त्याची अवकृपा होते कारण ते माणसाचे पूर्वसंचित आहे, पण दुसऱ्याच क्षणी तोच माणसावर कृपा करतो. जेष्ठ कवी कुसुमाग्रजांनी म्हटलेच आहे की *रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल.*

तेव्हा आज कितीही यातना भोगाव्या लागल्या, संकटांशी दोन हात करावे लागले तरी उद्या सोनियाचा दिनु उगवणारच आहे या विचारांवर ठाम राहून *द शो मस्ट गो ऑन* ही धारणा मनाशी पक्की असलीच पाहिजे.

 

अरुणा मुल्हेरकर

मिशिगन

प्रतिक्रिया व्यक्त करा