आकेरी येथे झालेल्या अपघातात कोलगाव येथील युवकाचा जागीच मृत्यू
सावंतवाडी
सावंतवाडी कुडाळ मार्गावरील आकेरी घाटाच्या पायथ्याशी दोन दुचाकींच्या धडकेमुळे झालेल्या अपघातात कोलगाव येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सागर साईल ( ३५, रा. कोलगांव – वाघडोळवाडी ) असे त्याचे नाव आहे. कोलगाव येथून झाराप येथे जाताना एसटीला ओव्हरटेक करत असताना समोरील दुचाकी ला धडक बसून हा अपघात घडला. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, सागर साईल हा कोलगाव येथील आपल्या घराकडून झारापच्या दिशेने आपल्या ताब्यातील ज्युपिटर दुचाकीने आकेरी मार्गे जात होता. आकेरी घाटीच्या पायथ्याशी समोरून कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या एसटीला ओव्हरटेक करीत असताना समोरच्या बाजूने सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला त्याची धडक बसली. या अपघातात रस्त्यावर आदळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर समोरील ॲक्टिवा दुचाकी स्वार विनोद शिवराम राऊळ हा देखील किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर घटनास्थळी दोन्ही बाजूने वाहनांची मोठी रांगा लागली होती.