You are currently viewing कुडाळ पंचायत समितीमार्फत २१ पासून लोकसहभागातून बंधारा मोहीम…

कुडाळ पंचायत समितीमार्फत २१ पासून लोकसहभागातून बंधारा मोहीम…

कुडाळ पंचायत समितीमार्फत २१ पासून लोकसहभागातून बंधारा मोहीम…

कुडाळ

तालुक्यात दरवर्षी लोकसहभागातुन वनराई, कच्चे बंधारे बांधले जातात. गेल्या सात वर्षांपासून राबविण्यात येणार हे अभियान आता लोकचळवळ बनले आहे. यंदा सुद्धा कुडाळ पंचायत समितीमार्फत २१ ते २७ डिसेंबर हा आठवडा बंधारे बांधण्याची विशेष मोहीम म्हणून राबविण्यात येणार आहे. या निमित्ताने २७ डिसेंबर हा दिवस बंधारा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या अभियान कालावधीत प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये अंगणवाड्या, युवक क्रीडा मंडळे, बचतगट, स्वयंसेवी संस्था, विविध कर्मचारी संघटना, ग्रामस्थ यांचाही सहभाग घेण्यात येणार आहे. या मोहमेंतर्गत कोणताही शासकिय निधी उपलब्ध नसताना तालुक्यात निव्वळ लोकसहभाग व श्रमदानातून या मोहीमेत एक हजार पेक्षा जास्त बंधारे बांधण्यात येणार आहेत.

महाराष्ट्रात पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी धडपड सुरु असताना, सर्वात जास्त पर्जन्यमान असलेल्या कोकणात मात्र पाणी वाचविण्याच्या बाबतीत आता जागरुकता दिसुन येते. बऱ्याच विचारवंतानी व्यक्त केलेल्या मतांनुसार तिसरे महायुद्ध झालेच तर ते पाण्यासाठीच होईल हे लक्षात घेता युद्धात रक्त गाळण्यापेक्षा शांततेत पाण्याचे संवर्धन करणे कधीही चांगले. हाच विचार लोकचळवळीच्या माध्यमातून लोकांच्या मनात रूजविण्यासाठी कुडाळ पंचायत समितीमार्फत गेली ७ वर्षे बंधारा अभियान सातत्याने राबविले जात आहे.

कुडाळ तालुक्यात दरवर्षी लोकसहभागातुन वनराई/कच्चे बंधारे बांधले जातात. परंतु याला लोकचळवळीचे स्वरूप देऊन तालुक्यातील सर्व पदाधिकारी ,सर्व विभागांचे अधिकारी-कर्मचारी, सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रा.पं.सदस्य ,ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामस्थ, शेतकरी यांचे सहभागातून कुडाळ पंचायत समितीमार्फत दि २१ डिसेंबर २०२४ ते २७ डिसेंबर २०२४ हा आठवडा विशेष मोहीम म्हणून राबविण्याचे निश्चित करून, अभियान कालावधीत प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये अंगणवाड्या, युवक क्रिडा मंडळे, बचतगट, स्वयंसेवी संस्था, विविध कर्मचारी संघटना, ग्रामस्थ यांचाही सहभाग घेण्यात येणार आहे.

यापूर्वी कुडाळ तालुक्यात वनराई व कच्चे बंधारे हिच संकल्पना लोकांमध्ये सर्वश्रृत होती. परंतु गेल्या सात वर्षांपासून या संकल्पनेला छेद देऊन येथील नैसर्गिक परिस्थितीनुरूप विजय बंधारा व खरी बंधारा या नविन संकल्पना कुडाळ पंचायत समितीने प्रात्यक्षिकांव्दारे लोकांसमोर आणल्या. वनराई बंधारे बांधण्यासाठी प्लास्टिक पिशव्या, माती, तसेच पिशव्या भरणे व रचणेसाठी बरेच मनुष्यबळ व श्रम लागतात. याला पर्याय म्हणून ज्या ठिकाणी माती उपलब्ध नाही अशा ठिकाणी कमी श्रमामध्ये स्थानिकरित्या पाण्याच्या पात्रात उपलब्ध असलेले दगड धोंडे व साधे प्लास्टीक कापडाच्या सहाय्याने विजय बंधारा बांधता येतो. त्याचप्रमाणे रब्बी हंगामात पड असलेल्या पाणथळ शेतांत वाहून वाया जाणाऱ्या पाण्याची तोंडे (मुशी) स्थानिकरित्या उपलब्ध वनस्पती, चिखल इत्यादींच्या सहाय्याने बंद करून शेताच्या कुणग्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठा करता येतो व यात मोठ्या प्रमाणातील क्षेत्र पाण्याखाली येते.अशा बंधाऱ्याना खरी बंधारे असे म्हटले जाते.

कोणताही शासकिय निधी उपलब्ध नसताना कुडाळ तालुक्यात निव्वळ लोकसहभाग व श्रमदानातून या मोहीमेत एक हजार पेक्षा जास्त बंधारे बांधण्यात येणार आहेत. यामध्ये वनराई , कच्चे , विजय, खरी व पक्के असे बंधारे बांधून पाणी अडवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

कुडाळ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अंगणवाड्या, युवक क्रीडा मंडळे, बचतगट, स्वयंसेवी संस्था, विविध कर्मचारी संघटना, ग्रामस्थ यांच्या सहभागातून अभियान कालावधीमध्ये बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. अभियान कालावधीमध्ये झालेल्या कामाची पहाणी करणेसाठी बंधारा दिवस कार्यक्रम दिनांक २७ डिसेंबरला आयोजित करण्यात आलेला आहे. सदर अभियान यशस्वी करण्यासाठी कुडाळ तालुक्यातील सर्व ग्रामस्थ, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था यांनी उत्स्फुर्त सहभाग घेउन अभियान यशस्वी करावे असे आवाहन कुडाळ पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी (निवडश्रेणी) श्री. वासुदेव नाईक यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा