ग्राहक पंचायत महाराष्ट्र- सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे आवाहन
वैभववाडी :
वैभववाडी भुईबावडा घाट मार्गावरील एसटी वाहतूक पूर्ववत करण्यात यावी अशी विनंतीवजा मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने विभाग नियंत्रक सिंधुदुर्ग यांच्याकडे मेलव्दारे केली आहे. सदर मेलची प्रत अध्यक्ष, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद तथा जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, निवासी उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व अध्यक्ष /सचिव, ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांना पाठविण्यात आली आहे.
कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडला जाणारा करुळ घाटमार्ग रस्ता दुरुस्तीसाठी डिसेंबर २०२३ पासून बंद आहे. करुळ घाटातून होणारी वाहतूक भुईबावडा घाटमार्गे वळविण्यात आली होती. पावसाळ्यामध्ये घाट नादुरुस्त असल्याने दोन महिने वाहतूक बंद होती. त्यानंतर वाहतूक सुरु करण्यात आली. परंतु सायंकाळी पाच नंतर भुईबावडा घाटमार्गे होणारी फक्त एसटी वाहतूक पूर्ण बंद आहे. त्यामुळे या मार्गावरील एसटी प्रवाशांना आर्थिक भुर्दंड व वेळेचा अपव्यय यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत एसटी प्रवासी ग्राहकांच्या तोंडी आणि लेखी तक्रारी शाखेकडे आल्या आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा एसटी प्रशासनाने वैभववाडी भुईबावडा घाटमार्गे होणारी एसटी वाहतूक पूर्ववत करून सर्व एसटी प्रवासी ग्राहकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने मेलव्दारे केली आहे. यावेळी आगार व्यवस्थापक कणकवली यांना निवेदन देताना ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष श्री सीताराम उर्फ दादा कुडतरकर, तालुका उपाध्यक्ष गीतांजली कामत, श्री भोसले, डॉ सौ वैशाली कोरगावकर, प्रवासी संघाचे अध्यक्ष श्री मनोहर पालयेकर आदी उपस्थित होते.