मालवण :
आचरा गावच्या गावपळणीचे दिवस जवळ येत आहेत. गावाच्या वेशीबाहेर वस्तीसाठी निवारा उभारण्यात ग्रामस्थ गुंतले आहेत. रविवारी १५ डिसेंबरला दुपारनंतर इशारा होताच संपूर्ण गाव निर्मनुष्य होणार आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस तीन रात्री गडबड वाढणार आहे ती गावाच्या वेशीबाहेर. सुमारे आठ हजाराच्या वर वस्ती असलेले आणि सर्व धर्मियांचा सहभाग असलेले हे गाव गावपळण प्रथेत निर्मनुष्य होणार आहे. या गावपळणीत पूर्ण गावच वेशीबाहेर जाणार असल्याने याकाळात वेशीबाहेर राहण्यासाठी पारवाडी नदी किनारी, वायंगणी, चिंदर भगवंतगड रस्त्यानजीक केउंडले बेटावर राहुट्या उभारून ग्रामस्थ निवासासाठी जागा बनविण्यात गर्क झाले आहेत. जमीन साफ करून शेणामातीने सारवून लख्ख केली जात आहे आणि त्यावर राहुट्या उभारण्याची लगबग दिसत आहे. यासाठी संपूर्ण चिव्याच्या काठ्यांचा सांगाडा उभा करून त्याला माडांच्या झावळ्यांचा आधार देऊन, तर काही ठिकाणी ताडपत्रीच्या सहाय्याने राहुट्या उभारण्यात येत आहेत. गावपळणीमुळे उडालेल्या या श्रमाच्या धावपळीच्या नाराजीचा लवलेशही कुणाच्या चेहऱ्यावर न दिसता, उलट आनंदाने अंगात उत्साहाने झपाटल्यासारखे ग्रामस्थ काम करत आहेत. लोकांना ऊर्जा देणारी ही गावपळण प्रथा गेली अनेक शतके आचरेवासीय आनंदाने पाळत आहेत.