*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*’वितभर पोटासाठी’*
*****************
वितभर पोटासाठी घरदार सोडून
गावच्या वेशीबाहेर पडायचं
जिथे पोटाला भाकर मिळेल
ते गाव आपलं समजायचं
मगं तोडका मोडका संसार
बैलगाडीत भरला की
कष्टाचा रस्ता धरायचा नी्
ज्या गावाला मुक्काम
त्या गावच्या मातीचा गंध
कपाळी लावायचा
खळ्या मळ्यात कुठेतरी
मोकळ्या जागेत
घर वजा झोपडी बांधायची
एकमेकांच्या संगतीने
संसाराची गाडी ओढायची
पोटात बाळ असल्यावरही
हातचं काम सुटत नाही
काम केल्याशिवाय
तव्यावर भाकर फुगत नाहींँ
कधी कधी शेतमळ्यात
उसाच्या पाचटातही
बाळ जन्माला येत असतं
पोट धरायला तेव्हा तिच्याजवळ
कोणीच नसतं
अशाही अवस्थेत ती
एक दिवसाची बाळांतीन
दुसऱ्या दिवशी कोयता घेऊन
कामाला लागते
नवऱ्याच्या संगतीन भारा सरसर कापते
पालापाचोळ्यात निजलेल पोरगं
बोंबलायला लागली की तिने
पाठीला बांधून घ्यायचं
अन् मोकळं झालेलं शेतशिवार
डोळेभरून पहायचं
मग काम संपल की
बैलाच्या गळ्यातला कासरा ओढून
मुक्काम हलवायचा आणि
नव्या गावच्या नव्या मातीत
घाम कष्टाचा जिरवायचा
कष्ट करणाऱ्याला कुठलं गाव नी्
कसलं घर असतं
कुठे जन्म कुठे मरण माहीत नसतं
पोटाची खळगी भरायला
भूक कुठंही पळवत असतें
कुठल्याच गावच्या पंचायतीत
जन्म मृत्यूची नोंद नसते
म्हणून ऊन वारा थंडी पावसाचं
पांघरूण अंगावर ओढून
उघड्यावर संसार करायचा
एकमेकांच्या चेहऱ्यावरचा आनंद
एकमेकांनी बघायचा
*संजय धनगव्हाळ*
*अर्थात कुसुमाई*
९४२२८९२६१८
९५७९११३५४७