*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*
*आकाशीचा चित्रकार तो!*
पहाटे पहाटे ऊगवते शुक्राची चांदणी. किती सुंदर रेखलेले असते तिचे सौंदर्य! नव्या आशेची दमदार पहाट, रानीवनी फुललेले सुंदर रंगित फुलोरे.
शांत निरवता आणि रूपेरी नभांगण. दाटलेला काळोख हळूहळू ऊजळू लागतो.
ताज्या फुलांनी डवरलेल्या घमघमाट पसरवणार्या बागा, कधीतरी खेळणारे दंवबिंदू , शांत सागराची गाज हे असं सुंदर रेखाटलेले चित्र बघू तितके मन अधिकच हळवे होते.
दशदिशा होऊ लागतात गुलाबी. झपाट्याने किरण पसरत अवनीवर राज्य गाजवू लागतात. नव आशची सुप्रभात होऊ लागते.सगळीकडे सोने सांडत रवी येतो व आपल्या रथावरून ऊषेला घेऊन सर्वांना सुवर्णाने माखुन टाकतो. झाडाचे शेंडे, घरे देवळे रस्ते शेते सगळे सोनेरी होते. सारे जगच अधिक सुंदर दिसू लागते.
मधुनच हिरवे पानांचे व रंगीत फुलांचे ठिपके चमकत सौंदर्य वाढवतात. सुप्रभातीचे चित्र पुरे होताच हा प्रचंड ताकदीचा चित्रकार मध्यान्हाकडे वळतो.
रवीबिंब निळ्या आकाशाच्या तुकड्याच्या मधोमध तेजाने तळपत असते. वाफेचे पुंजके कापसासारखे पसरत ढगांचे थवे जमतात वारा सुस्तावतो. वृक्षवेली स्तब्ध होतात. जलाशयीची प्रतिबिंबे लांबट दिसतात. तरूतळी वृक्षाच्या सावल्या पसरू लागतात. विलक्षण शांतता नांदत असते या माध्यान्हीच्या चित्रात.
एकदा स्वत:चे हे चित्र निरखत तो संध्याकाळच्या चित्रावर काम करू लागतो. प्रचंड हौसेने तो एकेक चित्र रेखत असतो.
थकलेला रवी संध्येची वाट पाहू लागत पश्चिमेला सरकलेला असतो. फुले माना टाकू लागतात. वारा खट्याळ होउन वक्षराजीला घुसळून काढतो. सुकलेली पाने गिरक्या घेत खाली येतात. दिवसाचा तडाखा कमी होऊ लागतो. आकाशात अबोली पिवळसर रंग पसरत संध्या रवीराजाला शोधते व दोघेही भराभर डोंगर ऊतरत खाली सागरात गुडूप होतात. जाताना आपल्या रंगात त्या सागराला डोंगरांनाही सुंदर अबोली पिवळ्या रंगात रंगवायला चुकत नाहीत. आजची ऊमेद संपल्याची सजिवांची जाणिव तो चित्रकार जिवाचा आटापिटा करत रेखतो.
हळूहळू सावळी सांजवेळ दशदिशांना खाऊ लागते. पशुपक्षी घराकडे परतू लागतात. गाई गुरं घंटा गळ्यात वाजवत धावत गोठ्याकडे येतात व भुकावलेल्या वासरांना तृप्त करतात. सांज देऊळी राऊळी ऊतरते. समया तेऊ लागतात. घंटा निनादतात. घरोघरी परवचा म्हणत तुळशी वृंदावनांसमोर दिवा जळू लागतो. देवघरात नंदादीप ऊजळतो. वाटेवर वाटसरूंची पाऊले घराकडे धाऊ लागतात. पक्षांच्या रांगा सावळ्या आभाळात शिस्तीत घरी परतूं लागतात . थकलेले पक्षी घरट्यात विसावतात.
सावळी सांज आपली छाया अशी पसरते कि, मन कातर कातर होते. काळोखात ऊदास वाटते.तरीही ही शोभा तो चित्रकार अभुतपूर्व रेखाटतो व शांत होतो.
काजळ पैंजण घातलेली निशा मग तिची सखी रूपेरी रजनी नभांगणी दिसू लागतात.
निशा ही फार सुंदर दिसते पण भिती दाखवत रहाते.हलणार्या झाडाझुडपांच्या सावल्या, काळोख, राक्षसासारखे ते डोंगर नाहीशा होणार्या काळोखी पाऊलवाटा, अंधारात बुडून गेलेली घरे. आणि निशब्दता सारेच घाबरवून टाकते. पण हे असं रेखुन तो आनंदित होतो.
मग नभांगण तारांगण करणारी रजनी एकेक नक्षत्रांचा दिवा लाऊ लागते. अनेक तारकादले आपल्या लाडक्या चांदोबाला घेऊन आपला डाव मांडत खेळू लागतात. काजव्यांच्या दिपमाळा लटकत रस्त्यांवर प्रकाश सांडतात. नाजुक चमकते हंसरे खेळकर दंवबिंदू या चित्रकाराला कूठे भेटतात कळत नाही पण रजनीला तो जीव ओतुन सुंदर रेखाटतो.
कधी याच चित्रात वर्षाराणी मिसळते. सुंदर कृष्णमेघ दाटतात. वेगवेगळे रंग घेऊन मस्ती करतात. दिमिनी नाचुन जाते. सहस्त्र जलधारांनी आभाळ अवनीवर कोसळते.
तर कधी शरद ऋतू रंगवतो व रात्री निरभ्र आभाळातून चांदणचुरा सांडवतो आपल्या चित्रात.
कधी शिशिराची हौस पुरी करत जागोजागी शेकोट्या पेटवत रहातो. निष्पर्ण वृक्ष तरूवेली ओसाड करून टाकतो. पण ऊस, हरभरा गहू शेतात हिरवाई भरुन काढतात.
ग्रिष्मात पिवळा रंग माखत बहावा तर अनेक रंगात फुलणारा जाकरांदा तर शेवटी लालचुटूक गुलमोहर फुलवत चित्र मोहक बनवतो.
कधी आकाश काळे करतो पण तिथे सप्तरंगात छान इंद्रधनुची कमान ऊभारत अवनीला सुंदर रूप देतो.
हेमंत वसंत तर शेतात बागात रानात तयार शेती, फुलांचे रंगीत बहर यांची रंगपंचमी रंगवतो.
खरोखरच हा चित्रकार किती प्रकाराने…. किती रंगात ही अशी अनेक चित्रे रेखत असतो. बघू ते चित्र सौंदर्याने परिपूर्ण असते. सृष्टी कधीही मोहक हवीहवीशीच वाटते. ऊत्साह आशा ऊमेद जोषपूर्ण होतात या जगण्यावर आयुष्यावर शतदा प्रेम करावेसे वाटते.
जबर दस्त ताकदीचा हा न थकणारा चित्रकार आहे हा आकाशीचा.
अनुराधा जोशी.
9820823605