*जत्रोत्सवातील जुगार चिंतेचा विषय*
*पाच सात हजारात खाकी वर्दीकडून ठरते जत्रेतील जुगाराची मैफिल*
संपादकीय…..
पाच-सात हजारात बकरा, मेंढी सुद्धा मिळत नाहीत परंतु आपले इमान राखून काम करण्याची शपथ घेतलेली खाकी वर्दी केवळ पाच-सात हजाराला जुगाऱ्यांकडे गहाण ठेवून सावंतवाडी तालुक्यातील जत्रोत्सवांमध्ये खुलेआम जुगारांच्या मैफिली ठरवल्या जातात हे नक्कीच दुर्दैवी आहे. जिल्ह्याच्या खाकीच्या वरिष्ठांचे झालेले दुर्लक्ष्यच याला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जिल्हावासियांचा खाकिकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून प्रत्येक प्रकरणात जनता संशयाची सुई प्रथम खाकीच्या दिशेने फिरवत असल्याने जिल्ह्यातील जत्रोत्सवातील जुगाराच्या पार्श्वभूमीवर खाकी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जत्रोत्सवांमध्ये जुगारावर बंदी आहे. परंतु जुगारावर असलेली बंदी केवळ घोषणांमध्येच कागदावर उरली की काय..? असा प्रश्न प्रत्येक जत्रोत्सव मध्ये खाकीच्याच आशीर्वादाने सुरू असलेले जुगार पाहिले की पडतो. जत्रोत्सव असलेल्या मंदिरापासून काही अंतरावर एखाद्या घरात, टेरेसवर किंवा झाडी मध्ये पाल टाकून खुलेआम जुगार खेळला जातो. जत्रोत्सव मधील जुगाराच्या परवानगीसाठी खाकीचे त्या त्या भागातील अंमलदार जुगाराची मैफिल केवळ पाच सात हजारांच्या आमिशापोटी आपले कर्तव्य विसरुन इमान विकून मोकळे होतात. त्यामुळे जुगार खेळणाऱ्यांच्याच नव्हे तर पाहणाऱ्यांच्या नजरेत सुद्धा खाकीची किंमत केवळ पाच सात हजार रुपये उरली असल्याचे दिसून येते.
जत्रोत्सवात जुगार असले की जत्रा भरतात असा कित्येकांचा समज आहे. परंतु वर्षातून होणारा गावचा जत्रोत्सव म्हणजे भक्तीचा महापूर आणि श्रद्धेचा सागर अवतरलेला असतो. अशा जत्रेतील ओसंडून वाहणाऱ्या भक्तीमध्ये जुगार सारखे अवैध धंदे दुधात मिठाचा खडा पडावा असेच दुष्कर्म करतात. घरातून जत्रोत्सवासाठी पैसे घेऊन आलेली तरुणाई लाल काला, घुडघुडे आदी सारख्या छोट्या जुगाराच्या प्रशिक्षणानंतर तीन पत्ती सारख्या जुगाराच्या पालावर बसतात आणि आयुष्याचा रस्ता चुकतात. झटपट पैसा कमावण्याची एकदा लागलेली सवय हळूहळू व्यसन बनते आणि तरुणाईला व्यसनांच्या जाळ्यात अडकवते. काही कुटुंबातील कर्ता पुरुष जत्रेसाठी कुटुंबाला पैसे देत नाही परंतु जास्त पैसे कमावण्याच्या आशेपोटी जुगारावर नशीब आजमावतो आणि असलेले चार पैसे सुद्धा हारतो. जुगाराच्या नादात कुटुंबांची होणारी ही दैना रोखण्यासाठी जत्रोत्सव मध्ये सुरू असलेल्या जुगारावर हातोडा पडणे आवश्यक असून सुरुवात जी खाकी आपले इमान विकते तिच्यापासून झाली पाहिजे. जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यात सुरू असलेले अवैध जुगार गांभीर्याने घेऊन तात्काळ त्यावर कारवाई करणे आवश्यक आहे..अन्यथा अवैद्य धंदे खाकी वर्दी पोसते यावर शिक्कामोर्तब होईल यात शंकाच नाही.