*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तुझ्या पदरात आई*
ह्या पदराची ख्याती मी काय सांगू बाई
याच्या छत्रछायेमध्ये कसे हसू येते बाई
किती गोड गोड हसू मुखावर समाधान
जसे मिळाले हो पहा स्वर्ग लोकीचेच धन..
डोळे मिटले हासता उतू जाई मुखी हसू
तुझ्या पदरात आई मला काही नको पुसू
मी चालत राहिन फक्त पदर असू दे
वाटतच नाही भीती ऊन कितीही लागू दे..
लेक तुझी गोड गोड तुला देईन मी जोड
तू पुरविते तसे तुझे पुरविन तुझे कोड
जग दाखविले तू ग कशी होऊ उतराई
तुझा पदर आभाळ कसे सांगू तुला आई..
तुझ्या पदरात सुखे नाही रिती होत झोळी
नाही डोकावत पहा छाया कोणतीही काळी
तू तो माझे विद्यापीठ तुला पाहून शिकते
तू सोसते तसे ग धडे मला देत जाते..
सोसणार ना अन्याय मुकी राहणार नाही
तुझ्या अन्यायाची आई करीन मी भरपाई
तू असता पाठीशी मला कशाचे ग भय
मारीन मी शिंगे अशी नाही करणार गय….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)