आपत्ती व्यवस्थापणाबाबत जागृती
सिंधुदुर्ग
शालेय विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन या विषयाबाबत जाणीव जागृती करणे, एखादी आपत्ती आल्यास त्याला कसा प्रतिसाद द्यावायाचे शास्त्रशुद्ध तंत्र आत्मसात करणे आणि कोणत्याही आपत्कालीन स्थितीत स्वतःचे मनोधैर्य न गमावता त्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड देणे तसेच इतरांना मदत करण्यास तत्पर राहणे हा उद्देश समोर ठेवून विद्यार्थ्यांकरिता विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे शालेय सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाचा ४०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग, शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (NDRF) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जात आहे.
विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांना घरगुती गॅस सिलेंडर ला आग लागल्यास ती कशी थांबवावी, अग्निशामक सिलेंडर चा वापर कसा करावा, शाळेत आग लागल्यास न घाबरता विद्यार्थी व शिक्षक यांनी वर्गाच्या बाहेर कसे पडावे याची माहिती दिली. अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला कसे उचलावे, स्ट्रेचर नसल्यास उपलब्ध साहित्याच्या मदतीने स्ट्रेचर कसे बनवावे, अपघातग्रस्त व्यक्तीला रक्तस्त्राव होत असल्यास तो कसा थांबवावा, बँडेज कसे करावे या अनुषंगाने प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. वर्गातील मुलांना विषबाधा झाल्यास किंवा घशात एखादी वस्तू अडकल्यास त्याला प्रथमोपचार कसे द्यावेत, पुरातून बचाव करण्यासाठी घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंच्या सहाय्याने फ्लोटिंग डिव्हायसेस कसे बनवावे, भूकंप आल्यास, वीज पडल्यास जीवितहानी टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी या अनुषंगाने विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सचिव विजयकुमार वळंजू यांनी अशा प्रकारची आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणे महत्वाची असून अशा प्रशिक्षणात आपत्ती व्यवस्थापन बाबत देण्यात येणाऱ्या शास्त्रशुद्ध तंत्राची माहिती विद्यार्थ्यांनी आत्मसात करून ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रशालेचे मुख्याध्यापक पी.जे.कांबळे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शालेय सुरक्षा प्रशिक्षणासाठी ज्या पाच शाळांची निवड करण्यात आली त्यात पाच शाळांमध्ये कणकवली विद्यामंदिर प्रशालेचा समावेश केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.
या प्रशिक्षण कार्यक्रमात शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. कार्यक्रमास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीम.राजश्री सामंत, कणकवली निवासी नायब तहसीलदार मंगेश यादव, अव्वल कारकून डी.एम.पाटील, महसूल सहाय्यक श्रीम.एस.एम.गायकवाड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आय.टी.सहाय्यक अभिषेक कोरडे, कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजयकुमार वळंजू, विद्यामंदिर हायस्कूल कणकवली चे मुख्याध्यापक पी.जे.कांबळे आणि सहाय्यक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.