You are currently viewing सशस्त्र सेना ध्वजदिन निधी-2024 संकलन शुभारंभ कार्यक्रम

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी-2024 संकलन शुभारंभ कार्यक्रम

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी-2024 संकलन शुभारंभ कार्यक्रम

सशस्त्र दल निधीत आपले योगदान देऊन कर्तव्याचे पालन करुया

-जिल्हाधिकारी अनिल पाटील

 सिंधुदुर्ग 

 आपल्या देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी सैनिक कायम कार्यरत असतात. अनेक जवानांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन देशाचे संरक्षण केले आहे.  या सैनिकांच्या मदतीसाठी ध्वजदिन निधी संकलन करणे हे एक मोठे देशकार्य आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने यामध्ये आपला अधिकाधिक सहभाग देऊन कर्तव्याचे पालन करुया असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले.

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन -२०२४ निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उमेश आईर आदी उपस्थित होते.

जिल्हा सैनिक कल्याण विभागाच्यावतीने सशस्त्र सेना ध्वजदिन २०२४ निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सशस्त्र सेना ध्वज दिन संकलनात महत्वपूर्ण सहभाग देणाऱ्यांचा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांना सशस्त्र सेना दिवसाचे बॅचेस लावण्यात आले आणि ध्वजदिन निधीत सहभाग देणाऱ्यांकडून निधी संकलित करण्यात आला. वीरमाता, वीरपिता व वीर नारींचा सत्कार, विशेष गौरव पुरस्कार प्राप्त माजी सैनिक पाल्यांचा सत्कार, ध्वजदिन २०२३ निधी संकलनाकरिता उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी/ कर्मचारी यांना भेटवस्तु व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

जिल्हाधिकारी श्री पाटील म्हणाले, ज्यांनी आपल्या जीवनातील अनेक बहुमोल वर्ष मातृभूमीच्या सेवेसाठी दिली व ज्यांनी स्वखुशीने मातृभूमीच्या संरक्षणासाठी प्राण अर्पण केले त्यांना मान वंदना देवून सैनिकाचे मनोबल वाढावे म्हणून ध्वजदिन हा दिवस साजरा करण्याची परंपरा आहे. संपूर्ण समाज वीर जवानांचा ऋणी असून त्यांच्यामागे उभा आहे, ही भावना व्यक्त करण्याकरीता, युध्दात धारातीर्थी पडलेल्या तसेच अपंगत्व आलेल्या जवानांच्या कुटुंबियाचे कल्याण व पुर्नवसन करण्याकरिता आपण सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. जवानांच्या कुटुंबियांना काही समस्या असतील तर त्या अधिकाऱ्यांनी प्राधान्याने सोडविणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

पोलिस अधीक्षक श्री अग्रवाल म्हणाले, देशासाठी  सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. सैनिकांचे त्याग, समर्पण, बलिदान हे अमूल्य आहे ही जाणीव आपण नेहमी ठेवणे आवश्यक आहे.जीवाची बाजी जावून देशाच्या सीमेवर लढणारे व देश वासियांचे सरंक्षण करणारे सैनिक हेच समाजाचे खरे हिरो आहेत. भारतमातेच्या रक्षणासाठी सीमेवर लढताना आपल्या मागे कुटुंबाची काळजी घ्यायला लाखो करोडो बांधव आहेत, अशी सुरक्षिततेची भावना अपण सैनिकांमध्ये निर्माण करायला हवी. सैनिकांच्या त्यागाची, बलिदानाची जाणीव ठेवून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करुन त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना मान-सन्मान देणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. सैनिक देशासाठी लढत असले तरी देशातील नागरिकांनीही सैनिकांप्रमाणे अपल्या कार्यातून देशसेवा केली पाहिजे. सैनिकांच्या कुटुंबियांच्या पाठिशी आपण नेहमी खंबीरपणे  उभे राहणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

श्री काळे म्हणाले, सीमेवर सैनिक आपल्या जीवाची बाजी लावून देशाचे संरक्षण करतात. सीमेवर लढण्यासाठी जाणारा सैनिक ‘देशसेवा हीच ईश्वरसेवा’ या भावनेने देशसेवा करत असतो. कोणत्याही संकटाची पर्वा न करता प्राणांची बाजी लावून देशाची सेवा करतो. अशा सैनिकांचे बलिदान आपण कधीही विसरू नये.  ध्वज संकलनामध्ये सर्वांनी आपआपल्या परीने सढळ हाताने मदत करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री सुकटे यांनी ध्वजदिन निधी संकलनाची पार्श्वभूमी सांगितली. ते म्हणाले १९४९ साली तत्कालीन संरक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने दरवर्षी ७ डिसेंबर हा ध्वजदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात ७ डिसेंबर हा दिवस ‘ध्वजदिन’ म्हणून साजरा केला जातो. यामागील संकल्पना अशी होती की, देशाच्या नागरिकांना सैनिकांचे स्मरण म्हणून एक छोटा ध्वज भेट द्यायचा आणि त्यांच्या बदल्यात नागरिकांकडून देणगी स्वीकारायची. स्वातंत्र्यानंतर ध्वजदिनाचे औचित्य दिवसेंदिवस वाढत गेले आहे. देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांचे व शहिदांच्या परिवारांचे पुनर्वसन व कल्याण यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाचे योगदान महत्त्वाचे आहे. हे सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे कारण यामध्ये नागरिकांना आपल्या जबाबदारीची जाणीव आणि सैनिकांच्या त्यागाबद्दल आदर असल्याची भावना व्यक्त केली जाते असेही ते म्हणाले.

वीरनारी वीर माता-पिता यांचा सन्मान-

श्रीमती सिताबाई रामचंद्र गावडे, श्रीमती अंकूश तारी, श्रीमती शेजालीन प्रान्सीम लॉड्रीग, श्रीमती तिलोत्तमा दिपक सावंत, श्रीमती सुप्रिया अंकूश तेजाम, श्रीमती प्रभावती तुकाराम गावडे,  श्रीमती अक्षता उदय सावंत,  श्री. बाळकृष्णा राऊळ, श्री. विठ्ठल लिंगवत, श्री. अर्जून गावडे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

विशेष गौरव पुरस्कार-

शैक्षणिक तसेच क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी सैनिक/विधवा पाल्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.

माजी सैनिक विधवा पाल्याचे नाव अंकुश राम शेटये यांचे पाल्य कु. आर्यन अंकुश शेटे, कु. तन्वी महेंद्र राणे, क. भूमिका दिपक गावडे, कु.प्रज्योती श्रीकांत जाधव, कु. परेश सतीश मडव, ऋृता गुरुनाथ परब यांना गौरविण्या आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा