You are currently viewing संकल्प

संकल्प

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम लेख*

 

*संकल्प*

 

आपणच आपले माणूसपण टिकवायचा हवे.

नीरक्षीरविवेक बुद्धी आणि सारासार विचार याचा आपल्याकडे अभाव आहे, आपण स्वतः च आपल्या मार्गात नवनवीन अडथळे निर्माण करतो आणि दोष दुसर्याला देतो. पहिल्यांदा या गोष्टी सोडा. मी पण एक सामान्य व्यक्ती आहे. सर्वसामान्य लोकांप्रमाणे माझ्याही काही अपेक्षा आहेत, महत्वाकांक्षा आहेत, स्वप्न आहेत तरीही मी कायम माझे पाय जमिनीवर ठेवूनच वावरत आहे. मलाही खूप सारी हौस आहे, पण ती हौस पूर्ण करण्यासाठी कोणाकडे नतमस्तक व्हावेसे वाटत नाही. माझ्या स्वभावाला, खिशाला, आणि प्रकृतीला सोसवेल एवढेच धाडस मी करु शकते.

उगाच खूप मोठ्या वल्गना किंवा दिखावा करुन मला पुढे जायचे नाही. कारण मला ए एक गोष्ट पक्की माहित आहे की, जे आपल्या नशीबात लिहिले आहे तेवढेच आपल्याला मिळणार आहे.

कितीही प्रयत्न केला तरी नशीबात काही घटना आपण टाळू शकत नाहीत.

हे सर्व लिहिण्याचे कारण असे की, मला कोणाला काही सांगायचे किंवा सुचवायचे नाही

मनात विचारांचे वादळ घोंघावत होते ते कुठेतरी प्रवाहात सोडायचे होते.

मुख्य म्हणजे मला असे वाटते की, माणसाने स्वतः साठी, कुटुंबासाठी, समाजासाठी जगावे पण तसे आपण जगताना कोणालाही आपल्यापासून त्रास न होता आनंदच मिळावा हा शुद्ध हेतू मनात ठेवावा तरच आपल्या जीवनाचे सार्थक होईल असे मला वाटते. आपल्याकडे जे

काही चांगले आहे ते चांगली लोक आपोआप घेतीलच, आणि आपणही जे चागले विचार, कृती आहेत त्या आपण घेण्याचा प्रयत्न करावा.

प्रत्येक व्यक्तीला जीवनात वेगवेगळ्या तर्हेवाईक प्रसंगाना तोंड द्यावेच लागते, म्हणून हतबल होऊन चालत नाही.

सामंजस्याने त्यातून मार्ग काढावा लागतो. काही गोष्टी प्रेमाने समजुतीने घ्याव्या लागतात, अरेरावी करुन काही उपयोग नसतो. तो अगदी शेवटचा मार्ग आहे.

 

आता समाज खूप च चपळ झाला आहे, प्रत्येक गोष्ट त्याला त्वरित हवी असते, ती ही दुसर्या कडून दुसर्या व्यक्ती साठी हे नियम असतात की, नाही माहित नाही.

 

कोणी कसे वागावे हे आपण ठरवू शकत नाही, पण आपण कसे वागायला पाहिजे हे आपण नक्कीच ठरवू शकतो.

आपल्याला आयुष्यात काय चांगले घडवायचे आहे व आपली कुवत कुठपर्यंत आहे हा सारासार विचार करुन आपण उडी मारु शकतो पण ही गोष्ट स्व हिमतीवर करायला हवी आहे. आपल्या मुलांना योग्य शिक्षण कसे द्यावे, त्याला त्याच्या पुढील जीवनात एकट्याने जगायला किती फायदा होईल हे पालकांनी जरुर पहावे. कोणत्याही नव्या जुन्या गोष्टींचा विचारपूर्वक विचार करावा.

दोन्ही बाजूंने विचार करुन आपल्या सद्य परिस्थितीप्रमाणे निर्णय घ्यावा. जुन्या किंवा नव्या पिढीला नावे ठेवून दोन पिढीमधील दुरावा वाढवू नये तर त्यातील सुवर्ण मध्य शोधावा.

बालसंस्कारापासून ते वृद्धापकाळापर्यंत जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावर येणाऱ्या खाचाखळग्यांचा आढावा घ्यावा. आपला निर्णय योग्य व ठाम असावा, पण त्याने कोणालाही न दुखावता तो पटवून देण्याचा क्षमता असावी.

नाहक दिखाव्याला भरीस पडून आपल्या खिशाला कात्री लावू नये. कारण वरवरची रोषणाई ही जास्त खर्चाची तकलादू असू शकते.

 

आपला समाज, आपले हित या सर्व आपल्याच गोष्टी आहेत तरी कुठे आणि किती बदलावे हे त्या त्या वेळेच्या परिस्थितीनुसार ठरवावे. हट्टी पणाने किंवा आपलाच शब्द प्रमाण असे मानले तर कदाचित आपली माणसे दूर जाऊ शकतात.

एकमेकांना सांभाळण्याची कला शिकून घ्या. काही जुन्या चालीरिती योग्य शास्त्रशुद्ध होत्या, त्यामागील कारणे लक्षात घ्या, मुलांना समजावून द्या. तसेच आताच्या चपळ युगातील गोष्टीही, तांत्रिक ज्ञान समजून घ्या. प्रत्येक नाण्याच्या दोन्ही बाजू तपासून फायद्याचे निर्णय घ्या.

 

 

अजून खूप लिहायचे होते, पण अति तेथे माती होते म्हणून थांबते.

 

विचारांना विश्रांती देते.

 

संकल्प स्वतः शीच.

🐦‍🔥🦋🦚🐦‍🔥🦋🦚🐦‍🔥🦋🦚

 

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

 

संकल्प करा स्वत्व जपण्याचा

प्रतिक्रिया व्यक्त करा