*महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन*
पिंपरी
परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने पिंपरी न्यायालयातील पुरुष बार रूम येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून पाळला जातो. शुक्रवार, दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ६८ वी पुण्यतिथी आहे. समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, विचारवंत, राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री भीमराव रामजी आंबेडकर यांनी झोपेतच अखेरचा श्वास घेतला आणि हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून गणला जातो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायम शिक्षणाला महत्त्व दिले आणि समाजाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश दिला याचीच प्रेरणा घेत ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने पिंपरी चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मरकास हार अर्पण केल्यानंतर रयत विद्यार्थी विचार मंच यांच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या ‘एक वही, एक पेन’ या अभियानात सहभागी होत अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यासाठी एक सामाजिक भान समजून संस्थेला पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने वह्या व पेन देण्यात आल्या. यावेळी बारचे माजी अध्यक्ष ॲड. राजू माधवन, ॲड. देवराव ढाळे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. नवीन वालेचा, ॲड. पल्लवी विघ्ने आणि वकील बांधव उपस्थित होते. अभिवादन सभेचे आयोजन पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, उपाध्यक्ष ॲड. अनिल पवार, सचिव ॲड. उमेश खंदारे, महिला सचिव ॲड. रीना मगदूम, सहसचिव ॲड. राकेश जैद, खजिनदार ॲड. अक्षय फुगे, सदस्य ॲड. संकेत सरोदे, ॲड. विकास शर्मा, ॲड. सीमा शर्मा, ॲड. राजेश राजपुरोहित, ॲड. संघर्ष सूर्यवंशी यांनी केले होते.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२