You are currently viewing डॉ. मोतीलाल राठी एक पुण्यस्मरण

डॉ. मोतीलाल राठी एक पुण्यस्मरण

डॉ. मोतीलाल राठी एक पुण्यस्मरण

मानवतेचे वारकरी:
स्व. डॉ.मोतीलाल राठी

डॉ. मोतीलाल राठी आज आपल्यात नाहीत. पण या अमरावती शहरासाठी अमरावती शहरातील वैद्यकीय सामाजिक साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी जे कार्य केलेले आहे ते आजही त्यांच्या परोपकाराची आजही साक्ष देत आहेत. डॉ.मोतीलाल राठी गावाच्या नात्याने आमचे जावई. मी सातेगावचा. त्यांच्या पत्नी कमलताई या सातेगावच्या. कासट परिवारातील कन्या. माझे वडील कासट परिवारातच कामाला होते. त्यामुळे डॉक्टर साहेबांचा व माझा ऋणानुबंध जुळून आला. पण आमची खरी मैत्री झाली की आमच्या साहित्यकृतीमुळे. माझे शिक्षण नोकरी सर्वकाही अमरावतीच्या श्री गणेशदास राठी विद्यालय व श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय येथे झाले. डॉक्टरसाहेब या संस्थेचे पदाधिकारी व पुढे अध्यक्ष झाले. डॉक्टरांना साहित्याची व सामाजिक कार्याची खूप आवड. त्यामुळे आम्ही डॉक्टर साहेबांच्या खूप जवळ गेलो. आम्ही स्थापन केलेल्या साहित्य संगम या साहित्य संस्थेचे डॉक्टरसाहेब अध्यक्ष होते. आमचे सगळे कार्यक्रम जेव्हा डॉक्टर साहेबांच्या कॅम्प रोडवरील मोहर बंगल्यातील तळमजल्यावरील बॅडमिंटन हॉलमध्ये व्हायचे. डॉक्टरसाहेब कमलताई प्रवीण आणि प्रतीक कार्यक्रमाच्या वेळी कार्यकर्त्यांसारखे वावरायचे. आपले मोठेपण बाजूला सारून डॉक्टरसाहेब सर्वांना जवळ करीत होते. जेव्हा अमरावती येथे प्रसिद्ध असलेल्या कुष्ठधामात तपोवनला जाण्याचे धाडस लोकांना होत नव्हते. त्या काळात डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांच्या तपोवनात जाऊन रुग्णांना तपासत होते. आरोग्य सेवा मंडळाच्या मार्फत त्यांनी अमरावती शहरातील गरीब वस्तीमध्ये दवाखाने काढून विनामूल्य आरोग्य सेवा प्रारंभ केली. अमरावती शहरातील डॉक्टर साहेबांचे मित्र यांनी गरीब लोकांसाठी दवाखाने वाटून घेतले. त्यात त्या त्या भागातील दवाखान्यात जाऊन तेथे गरीब रुग्णांना मोफत इलाज मिळत होता. गरीब लोकांसाठी दवाखाने उघडून आरोग्यसेवा मंडळा मार्फत डॉक्टरसाहेबांनी स्वतःला वाहून घेतले होते. कमी औषधांमध्ये आजार बसविणारे डॉक्टर म्हणून डॉ.मोतीलाल राठी यांचा नावलौकिक होता. ते अचूक निदान करून मोजकेच औषधे लिहून द्यायचे .कारण त्यांना खरा आजार कळलेला असायचा.
अमरावतीला झालेल्या अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनाचे ते सहस्वागत अध्यक्ष होते. हे संमेलन यशस्वी होण्यासाठी त्यांनी तनमनधनाने स्वतःला वाहून घेतले. ते कविवर्य सुरेश भटांचे जिवलग मित्र होते. सुरेश भटांचा मुक्काम अनेक वेळा डॉक्टर मोतीलाल राठी यांच्याकडेच असायचा. एवढेच नव्हे तर विठ्ठल वाघ शंकर बडे मिर्झा रफी अहमद बेग श्रीकृष्ण राऊत यांच्यासारखे कवी तसेच हृदयनाथ मंगेशकर जीवन किर्लोस्कर सारखी मंडळी डॉक्टर साहेबांकडे मुक्कामाला थांबायचे. डॉक्टरांना त्याची आवड होती. अमरावतीचे साहित्य विश्व समृद्ध करण्यामध्ये त्यांचा फारच मोलाचा वाटा आहे. डॉक्टर झाल्यापासून तर डॉक्टर साहेबांचा मृत्यू होईपर्यंत डॉक्टर साहेबांनी सामाजिक शैक्षणिक साहित्य व आरोग्य विषयक उपक्रमांना वाहून घेतले होते. आज अमरावतीच्या श्री गणेशदास राठी शिक्षा समितीचा जो विस्तार झालेला आहे त्यामध्ये डॉक्टर साहेबांचा मोलाचा वाटा आहे. अगोदर अमरावतीचे श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय हे हिंदी कवी संमेलनासाठी प्रसिद्ध होते. त्याकाळचे मोठमोठे कवी या महाविद्यालयामध्ये कवी संमेलननिमित्त येऊन गेले. डॉक्टर साहेबांनी हिंदी कवी संमेलनाबरोबरच मराठी कवी संमेलन दरवर्षी घेणे सुरू केले. सर्वश्री मंगेश पाडगावकर विंदा करंदीकर वसंत बापट सुरेश भट देविदास सोटे विठ्ठल वाघ शंकर बडे मिर्झा रफी अहमद बेग असे कितीतरी कवी त्यांनी आपल्या महाविद्यालयात बोलावून मराठी रसिक जणांना फार मोठी साहित्यिक मेजवानी दिली. अमरावती मधील अनेक तरुणांच्या पाठीशी ते समर्थपणे उभे राहिले. सुरेश भटांचे अनेक कार्यक्रम महाराष्ट्रातच नव्हे महाराष्ट्राबाहेर झालेले आहेत. पण अमरावतीला नगर वाचनालयात आम्ही साहित्य संगम तर्फे घेतलेला रंग माझा वेगळा हा कार्यक्रम अमरावतीचा इतिहासात मैंलाचा दगड ठरला आहे. या कार्यक्रमासाठी डॉक्टर साहेबांनी स्वतःला वाहून घेतले होते. सभागृह तुडुंब भरले होते. पाय ठेवायलाही जागा नव्हती. सुरेश भटांनी आपल्या कार्यक्रमात कबूल केले. माझे संपूर्ण महाराष्ट्रात कार्यक्रम होत आहेत .पण माझ्या जन्मभूमीमध्ये झालेला हा कार्यक्रम अवर्णनीय आहे. या कार्यक्रमाच्या वेळेस म्हणजे पन्नास वर्षांपूर्वी तीन दैनिकांनी आपल्या पुरवण्या काढल्या होत्या. त्यातील नागपूर पत्रिकेची पुरवणी ही चार पानांची होती. एखाद्या कवीच्या कार्यक्रमाची एवढी दखल अमरावतीची इतिहासात प्रथमच होत होती .पण त्यासाठी सर्वस्वी पुढाकार होता तो डॉक्टरसाहेबांचा आणि त्यांचे जिवलग मित्र श्री अरविंद ढवळे यांचा.आम्ही तेव्हा तरुण होतो. महाविद्यालयात शिकत होतो. पण या सर्व वर्तमानपत्रांना जाहिराती उपलब्ध करून देण्याचे काम डॉक्टर साहेबांनी मनापासून केले. डॉक्टर साहेबांचे मूळ गाव मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई . डॉक्टरानी जेव्हा अमरावतीला प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा ते आठवणीने सुट्टीच्या दिवशी गावाला जाऊन तिथल्या लोकांना आरोग्य सेवा द्यायचे. त्यांचा हा उपक्रम बरेच वर्षे सुरू होता. माझे व्यक्तिमत्व घडविण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. मी जरी त्यांच्या संस्थेतील कर्मचारी होतो. तरी माझा वावर त्यांच्या घरी त्यांच्या मानसपुत्रासारखाच होता. आमची ही मैत्री इतकी पक्की होती की डॉक्टर साहेब अध्यक्ष असलेल्या श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयामध्ये जेव्हा प्राचार्य पदाची जाहिरात निघाली तेव्हा त्यांच्या समाजातील एक प्राध्यापक माझ्याकडे आले. त्यांनी प्राचार्य पदासाठी अर्ज केला होता. ते मला म्हणाले नरेश माझ्या नावाची शिफारस डॉक्टर साहेबांकडे करा. मी त्यांना म्हणालो तुम्ही आणि डॉक्टरसाहेब एका समाजाचे आहात. तेव्हा ते प्राध्यापक म्हणाले आमच्यापेक्षा डॉक्टरसाहेब तुमचेच जास्त ऐकतात. हे ऐकून मला धक्काच बसला. आणि त्यामध्ये बरेचसे सत्यही होते. डॉक्टर साहेबांची आणि आमचे दररोज बैठक त्यांच्या कॅम्प रोडवरील मोहर बंगल्याच्या गॅलरीमध्ये असायची. पाच वाजले की मी डॉक्टर साहेबांचे घर गाठायचा. सात वाजेपर्यंत त्यांच्या दवाखान्याची वेळ होईपर्यंत डॉक्टरसाहेब अरविंद ढवळे राजूभाऊ जैन अमर अग्रवाल गोविंदभाई राठी सुखदेव लड्डा विश्वजीत तुळजापूरकर यापैकी कोणी ना कोणी आमच्या गप्पा गोष्टींमध्ये सहभागी व्हायचे. कमलदेवी अल्पोपहार आणि चहाची व्यवस्था करायच्या. सात वाजले की डॉक्टर साहेब दवाखान्यात निघून जायचे. पुढे पुढे उतार वयात डॉक्टर साहेबांनी कार चालवणे बंद केले तेव्हा मी त्यांना दवाखान्यात सोडणे व अन्य आणणे हे काम केले. सुरुवातीला त्यांनी याला विरोध केला .पण मी त्यांचा पिच्छा सोडलाच नाही .तेव्हा त्यांनी विरोध करणे सोडून दिले. या कामी मला श्री राजूभाऊ जैन यांची पण मदत व्हायची .अमरावतीच्या दैनिक हिंदुस्थान परिवाराशी त्यांचे कौटुंबिक संबंध. मराठे परिवार आणि राठी परिवार हे एक समीकरण होऊन गेले आहे. हिंदुस्थानच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित राहायचे. असा हा लाखमोलाचा माणूस. अमरावतीकरांवर खऱ्या अर्थाने प्रेम करणारा माणूस दिनांक 5 डिसेंबरला आमच्यातून निघून गेला. योगायोगाने त्यांच्या अंतिम क्षणापर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो. डॉक्टर साहेबांची प्रकृती बिघडल्यामुळे डॉक्टर साहेबांना श्रीकृष्ण पेठेतील चोरडिया हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. प्रवीण व प्रतीक मुंबईवरून आले होते . डॉक्टरावर उपचार सुरू होते. चार सप्टेंबरला मध्यरात्र झाली होती. प्रवीणला आम्ही घरी पाठवून दिले. मी प्रतीक डॉक्टर सुरभी राठी माझी सौभाग्यवती विद्या डॉ. अमोल राठी आम्ही दवाखान्यातच थांबलो. मध्यरात्रीनंतर डॉक्टर साहेबांची तब्येत भेट सिरीयस झाली. डॉक्टर चोरडिया प्रतिक यांनी आपल्या प्रयत्नांची शिकस्त केली. पण नियतीपुढे कोणाचे चालत नाही. डॉक्टर साहेबांनी अखेरचा श्वास घेतला. त्या रात्री आम्ही झोपलो नाही. हिंदू स्मशानभूमीमध्ये विद्युत दाहिनीमध्ये डॉक्टर साहेबांवर अंत्यसंस्कार झाले. शोकसभेची जबाबदारी माझ्यावर होती. अंतयात्रेमध्ये खूप मान्यवर होते. प्रत्येकाला बोलायचे होते. पण आम्ही निर्णय घेतला आणि स्मशानभूमीमध्ये डॉक्टरसाहेबांचे जवळचे मित्र माजी आमदार प्रा बी टी देशमुख यांनी एकट्यांनीच सर्वांच्या वतीने डॉक्टरसाहेबांना आदरांजली अर्पण केली. अमरावती शहरातील नागरिकांवर खऱ्या अर्थाने प्रेम करणारा त्यांच्या सुखदुःखात धावून जाणारा एक प्रेमळ निर्मळ परोपकारी व्यक्तिमत्व कायमचे अनंतात विलीन झाले होते .अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवुनी जाती. आज डॉक्टरसाहेब आमच्यात नाहीत पण आमच्या पिढीला त्यांनी जे मार्गदर्शन केले जे प्रेम केले ते शब्दातीत आहे. त्यांच्यामुळे आमच्यासारख्यांना अनेकांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या .अनेक कवींना त्यांनी व्यासपीठे उपलब्ध करून दिली. हे सर्व त्यांनी निस्वार्थ भावनेने केले. कोणी त्यांच्याकडे समस्या घेऊन आला तर डॉक्टरांना ती स्वतःची समस्या वाटायची आणि तो प्रश्न सोडविण्यासाठी ते जीवापाड प्रयत्न करायचे. आज अशी जीवापाड प्रेम करणारी माणसे फारच बोटावर मोजण्यासारखी आहेत. 9 सप्टेंबर हा डॉक्टरांचा वाढदिवस. गेले अनेक वर्ष आम्ही हा वाढदिवस नित्य नियमाने डॉक्टर साहेबांच्या बंगल्यावर साजरा करीत होतो. येणाऱ्या जाणाऱ्यांची रीघ लागलेली असायची. त्यामध्ये सर्व क्षेत्रातील लोक असायचे. आज डॉक्टर साहेब आमच्यात नाहीत. पण त्यांचा वारसा आम्ही फूल ना फुलाची पाकळी या नात्याने चालवित आहोत आणि चालविणारही आहोत. या विशाल हृदयाच्या माणसाला मानाचा मुजरा.

प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे. संचालक. मिशन आयएएस. अमरावती.9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा