*कुडाळ औद्योगिक वसाहतील उद्योजकऔद्योगिक विकास मंडळाच्या नकारात्मक कार्यपध्दतीवर आक्रमक*
सर्व प्रश्नावर लक्ष घालण्याचे विभागीय अधिकारी सौ. वंदना खरमाळे यांचे आश्वासन.
सरकारी नोकऱ्या नाहीत आणि रोजगार नाही म्हणून अनेक नव उद्योजक स्वतःचा रोजगार निर्माण करण्यासाठी धडपडत असतात पण त्यासाठी संबंधित विभाग गांभीर्याने या विषयांकडे पहात नाही.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे उद्योजकांचे व नव उद्योजकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कुडाळ औद्योगिक वसाहतील अनेक समस्या बाबत असोसिएशन सातत्याने प्रयत्न करत आहे मात्र संबंधित यंञणेकडे सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. हेतुपुरस्सर महामंडळ उद्योजकांची प्रकरण अडवून ठेवत असल्याच्या तक्रारी असोसिएशनकडे वाढत चालल्या आहेत.
जुने उद्योजक आहेत त्यांच्या विस्तारी करणासाठी अतिरिक्त भूखंडावर बांधकाम करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी परिपूर्ण प्रस्ताव पाठवून दोन दोन वर्षे झाली तरी कोणत्याही प्रकारचे सबळ कारण न देता सदर प्रस्ताव वरिष्ठ स्तरावरून फेटाळले जातात. नवीन उद्योजकांना भूखंड मिळत नाहीत. वास्तविक पहाता औद्योगिक वसाहतीत एकूण भूखंड ९४० उपलब्ध असून त्यापैकी 67 उद्योग पूर्णपणे बंद आहेत. रिकामी भूखंडांची संख्या ७७ एवढी आहे. अंदाजे 250 उद्योग सुरु आहेत मात्र उर्वरित भूखंडांचा कोणताही लेखा जोखा जुळत नाही तरी याबबत तातडीने अशा भूखंडांचा सर्वे होणे आवश्यक आहे. रिक्त भूखंड होतकरू नव उद्योजकांना मिळू शकतात. मात्र या विषयाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.
जुन्या उद्योजकांना सुरळीत विद्युत पुरवठा न झाल्याने उद्योजकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच नव उद्योजकांना विद्युत लाईन मिळत नाहीत. तसेच या वसाहतील काही नव्याने प्रदुषण करणारे उद्योग सुरू झालेले आहेत त्याचा ञास इतरांना होतो. ते अधिकृत आहेत का ❓याची चौकशी होणे गरजेचे आहे. औद्योगिक वसाहतीत होणाऱ्या अनावश्यक स्मशानभूमीलाही उद्योजकांनी कडाडून विरोध केलेला आहे. बायोवेस्ट प्रकल्पाचाही आढावा घेण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.
महामंडळाकडून असलेल्या अनेक अनुत्तरित प्रश्न आज कुडाळ एम्. आय्. डि. सी. इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री मोहन होडावडेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने विभागीय अधिकारी सौ. वंदना खरमळे यांच्या समोर मांडले. अनेक प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत असोसिएशनचे कार्यवाह अॅड. नकुल पार्सेकर, उपाध्यक्ष डॉ. नितीन पावसकर, जेष्ठ सदस्य श्री आनंद बांदिवडेकर , सहकार्यवाह कुणाल वरसकर, जेष्ठ सदस्य शशिकांत चव्हाण सहभाग घेतला
असोसिएशनने आक्रमक रित्या आपल्या मांडलेल्या समस्या सौ. खरमाळे यांनी ऐकून घेतल्या व आपल्या अधिकाराच्या कक्षेत जे विषय आहेत ते सर्व विषय पुढच्या आढावा बैठकीत सुटलेले असतील असेआश्वासीत केले. तसेच किरकोळ कामासाठी अनेकांना रत्नागिरी विभागीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात त्यासाठी यापुढे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या बुधवारी आपण स्वतः कुडाळ येथे उपस्थित राहून सहकार्य करणार असल्याचे सांगितले. सौ. खरमाळे यांनी असोसिएशन व उद्योजकांना यापुढे आमच्या कार्यपद्धती बाबत सकारात्मक अनुभव मिळतील असे आश्वासन दिल्याने उद्योजकांनी याबाबत पुढचा आंदोलना बाबतचा निर्णय तात्पुरता स्थगित केलेला आहे.
यावेळी सहकार्यवाह कुणाल वरसकर, असोसिएशनचे पदाधिकारी सर्वश्री शशिकांत चव्हाण, प्रमोद भोगटे,संजीव प्रभू, हरिश्चंद्र वेंगुर्लेकर, अधिकारी श्री विनोद रेवणकर,क्षेत्र अधिकारी श्री कसबेकर व समस्याग्रस्त उद्योजक उपस्थित होते.