You are currently viewing शशिकांत पेडणेकर…एक समाजप्रिय व्यक्तिमत्व

शशिकांत पेडणेकर…एक समाजप्रिय व्यक्तिमत्व

 

बालपणी अतिशय गरिबीचे चटके सहन करत परिस्थितीशी झुंज देत दारिद्र्यावर मात करून आपलं विश्व निर्माण केलेले शशिकांत पेडणेकर यांचं जग सोडून जाणे अनेकांना निराधार करून गेलं. स्वतः गरिबीचे चटके खाऊन खंबीर उभे राहिल्याने त्यांना गोरगरिबांबद्दल कळवळा होता. निरवडे येथे त्यांनी साकारलेल्या “सिल्वर एकर” या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामधून मिळालेल्या नफ्यात सुंदर अशा वृद्धाश्रमाची निर्मिती करून ती इमारत त्यांनी दान म्हणून दिली. आभाळा एवढं मन असणारा हा माणूस अचानक निघून गेल्याने माणुसकी विसरत चाललेल्या समाजात माणुसकी जपणारी एक व्यक्ती गेल्याने पोकळी निर्माण झाली आहे.

प्रत्येकाला मृत्यू नावाच्या अंतिम सत्याला सामोरे जायचेच असते परंतु, समाजाला दिशा देणाऱ्या, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या, समाजप्रिय व्यक्तीचे मरण चटकन कोणालाही स्वीकारता येत नाही हेच खरे. शशिकांत पेडणेकर यांचे अचानक निघून जाणे हे केवळ एका व्यक्तीचे जाणे नव्हे तर माणुसकीचा झरा आटण्यासारखे आहे. या माणुसकीच्या झऱ्याचे निर्मळ पाणी अमृतासम मानून तृप्त होणारी शेकडो कुटुंबे निराधार झाल्यासारखे आहे. पेडणेकर यांनी केवळ कमाई, पैसा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कधीच व्यवसाय केला नाही, तर आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आपल्या कमाई मधील मोठा हिस्सा समाजासाठी काढून ठेवला. त्यांच्याजवळ गेलेली कोणीही व्यक्ती कधी रिकाम्या हाताने परतलीच नाही. गोरगरीब आणि अपंगांच्या मदतीसाठी त्यांचा हात नेहमीच पुढे असायचा. दूरदृष्टी आणि कठोर परिश्रम हेच त्यांच्या जीवनाचे ब्रीद होते. सामाजिक, व्यावसायिक वाटचालीत त्यांचे अनेक राजकीय व्यक्तींशी सलोख्याचे आणि मैत्रीपूर्ण संबंध आले परंतु, राजकारणापासून त्यांनी स्वतःला अलिप्त ठेवलं. आपल्या सभ्य, सालस, सोज्वळ आणि सुसंस्कृत प्रतिमेला धक्का लागेल असे वर्तन त्यांच्या हातून कधीच घडलं नाही. त्यामुळेच या स्पष्टवक्ता व्यक्तीला समाजात प्रतिष्ठा, मानसन्मान मिळाला.

शशिकांत पेडणेकर ज्यांच्या सहवासात आले त्यांना ते आपलेसे करत गेले. परमेश्वराने दिलेल्या छोट्याशा आयुष्यात त्यांनी अनेकांना माया प्रेम दिले आणि जाता जाता कित्येकांना दुःखाच्या सागरात लोटून दिले. छोट्याशा आयुष्यात माणसे आणि माणुसकी जपण्याची कला ते समाजाला शिकवून गेले. समाजाप्रती असलेला त्यांचा कळवळा, माणुसकी हा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांच्यासारखे जगणे, वागणे, परोपकारी वृत्ती अंगीकारणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली असेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा