You are currently viewing माझे गाव कापडणे..

माझे गाव कापडणे..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*माझे गाव कापडणे..*

 

मंडळी, देशासाठी जीव गहाण ठेवणारे हे सारे

आपले “वेडेपीर” घरादारावर तुळशीपत्र ठेवून बाहेर पडले होते. त्यांना आता पर्वा होती ती फक्त देशाची. त्यासाठी कोणत्याही थराला जायची त्यांची तयारी होती. त्यांनी प्राणांची बाजीच लावली होती त्यामुळे मरणाकडे ते

डोळे वटारूनच पहात होते. मुळीच घाबरत नव्हते. देशासाठी लढतांना त्यांनी खजिनालूट

किंवा जनतेला लुबाडून एकही पैसा वापरला

नाही. जनतेने व दानशूर यांनी जो सहजतेने

पैसा दिला तोच फक्त वापरला. प्रसंगी उपासमारही सहन केली पण कुणाला लुटणे

शक्यच नव्हते.

 

ऐका तर पुढे काय झाले…

 

योगायोगाने कमखेडा ( जे आज माझे सासर आहे) भरणा लूट प्रकरण माझ्या हाती लागले

आहे.माझे सासरे श्री. रामदास रामचंद्र पाटील

स्वातंत्र्यसैनिक होते व या लढ्यात त्यांनीही

तुरूंगवास भोगला होता, शिक्षकाची नोकरी

सोडून त्यांनी या यज्ञात उडी घेतली होती.

त्यावेळचे सारेच तरूण देशप्रेमाने झपाटलेले

होते. कुठून मिळाली त्यांना ही प्रेरणा ….?

 

कमखेडा भरणा लूट गावोगावचे भरणे लुटायचे असा बेत क्रांतिकारकांनी आखला.त्यात शिंदखेडा येथील देशभक्तांनी असा कार्यक्रम ठरविला. शिंदखेडा तालुक्यात दलवाडे हे गाव क्रांतिकारकांचे प्रमुख केंद्र होते. (दलवाड्याच्या देवमन दादांचे अगदी शेवट पर्यंत आमच्या घराशी सलोख्याचे संबंध होते. मी ही लहान असतांना दलवाड्याला गेल्याचे मला आठवते.)तेथील क्रांतिकारकांनी सरकारी खजिना लुटण्याचा कार्यक्रम …कमखेडा…

येथे करण्याचे ठरवले. कमखेड्याचे स्वातंत्र्य

सैनिक भोलापूरी व राजाराम पाटील आणि…

श्री.रामदास रामचंद्र पाटील (माझे सासरे) यांनी कमखेडा येथून भरणा कधी व केव्हा शिंदखेडा येथे नेला जाईल याची पूर्ण माहिती क्रांतिकारकांना देण्याची जबाबदारी उचलली.

 

२२मार्च १९४३ रोजी भर दुपारी निरघोडी

शिवारात प.खानदेशच्या क्रांतिकारकांनी

कमखेड्याचा भरणा शिंदखेडा येथे जात

असतांना लुटला.महसूल भरणाची थैली

कोतवालाला पकडून त्याला झाडाला बांधून त्याच्या कमरेतून भरणाची थैली श्री. ठाकूर यांनी काढून ती श्री.शिवराम महिपत यांच्या जवळ दिली. आणि क्रांतिकारकांनी ती दलवाडे केंद्रात आणून टाकली. दलवाडे येथील देवमन दादा यांनी यातून काही पैसे क्रांतिकार्या साठी नासिक येथे श्री.विष्णूभाऊंकडे पाठवले, कारण भाऊ तेव्हा

सहा महिने नाशिकला थत्तेवाडीत भूमिगत होते.बघा, एक क्रांतिकारक दुसऱ्याला कसा

काळजीने पैसे पाठवतो..

 

आणि आज…

 

आज आपल्या नसानसात स्वार्थ इतका …

बोकाळला आहे की … आज आपण काय

करू या नुसत्या कल्पनेने ही मला हसू येते

वाटते … आपले पूर्वज इतके थोर असतांना

आपला इतका अध:पात कसा झाला ..?

 

तर मंडळी ….

१९४२ चं हे देशभक्तीचं भूत भाऊंच्या अंगात काही एकाएकी संचारलं नव्हतं…. तर

तो त्यांचा लहानपणापासूनचा ध्यास

होता.. त्यांचं हस्तलिखित आता माझ्या जवळ आहे नि त्यांच्याच शब्दात , त्यांच्याच भाषेत आता काही गोष्टी मी तुमच्या समोर मांडणार आहे. भाऊंचा जन्म …कापडणे ..ता. ३/९/१९१३

शिक्षण … मराठी सातवी इयत्ता पास …

सन… १९३० भाऊ म्हणतात, घरची फारच गरीबी म्हणून पुढील इंग्रजी शिक्षण होऊ शकलो नाही. सोनगीर गावी १९२७ साली महात्मा गांधींचे दर्शन झाले. तेव्हा पासून चहा पिणे सोडून दिले. (बघा वय फक्त १३/१४ वर्ष).त्या वेळी विलायती साखर चहा साठी वापरीत असत .परदेशी माल वापरू नका.खादी वापरा.सत्य,अहिंसा पाळा. भेदाभेद मानू नका.हा गांधीजींच्या व्याख्यानाचा सारांश. गांधीजींचे व्याख्यान ऐकले. वय १४/१५ चे होते. हिंदी मुळे व्याख्यान

पूर्ण कळले नाही. मोठ्या मंडळींनी मला समजाऊन सांगितले.ह्या गोष्टी भाऊंनी शेवट

पर्यंत पाळल्या, किंबहुना ती त्यांची जीवनशैलीच बनली होती,इतक्या ह्या गोष्टी

अंगात मुरल्या होत्या. ( मला आठवते, आमच्या घरात कुठलाही भेदभाव पाळला जात नसे.. गावा बाहेर राहणारी मंडळी माझ्या वडीलांबरोबर बसत असत.घरात कामालाही तीच मंडळी होती.)

 

मराठी सातवी पास झाल्यावर मी मराठी शाळेत शिक्षक व्हायचा.शिक्षण खात्यात काका…श्री. तानाजी तुकाराम पाटील(म्हणजे माझ्या आजोबांचे सख्खे भाऊ)वरिष्ठ

हुद्यावर होते.त्यांनी आग्रह धरला शिक्षक हो…

म्हणून, पण मिठाचा सत्याग्रह सुरू झाला होता.श्री.नवल भाऊ पाटील व कॅा. विश्वासराव देवरे यांचे कापडणे गावी व्याख्यान ऐकले.मिठाचे सत्याग्रहासाठी ते स्वयंसेवक गोळा करत होते. मी लोकमान्य टिळक उद्यानात सत्याग्रहात धुळे शिबिरात मे १९३० मध्ये दाखल झालो.

 

मंडळी….(१९४२ ची सुरूवात १९३० मध्ये झाली होती.

वय अवघे १५/१६).

 

परंतु वय लहान म्हणून सत्याग्रहात जाण्याची

परवानगी मिळाली नाही.देशभक्तीचे वारे अंगात संचारले होते.सत्याग्रह शिबिरात सत्याग्रहींना जेवण वाढणे, पाणी भरणे व वाटणे हे काम मिळाले.बुलेटिन वाटण्याचेही ५/६ दिवस गुपचूप काम केले .जुने धुळे येथे पिंजण काम सुरू करून पेळू तयार करण्याचे काम केले. सूत तयार झाले की,ते विणण्यासाठी देणे अशा प्रकारे मिळेल ते काम

करून देशसेवा करू लागलो.

 

दे.भ.नानासाहेब ठकार यांचे समर्थ उद्योग मंदिरात जुलै १९३२ मध्ये दाखल झालो.

सवाई मुकटी हा आदर्श गाव दे.भ.ठकार यांना

करावयाचा होता.तेथे विणकाम हातसुताचे

करू लागलो.सन १९३२ च्या स्वातंत्र्य लढ्यात

धुळे येथे सत्याग्रह करून चार महिने तुरूंगवास

भोगला.पूज्य विनोबा भावे यांच्या गीतेवरील

प्रवचनास हजर रहात असे.पूज्य साने गुरूजींचे

धुळे जेलमध्ये दर्शन झाले.अनेक मोठमोठ्या

देशभक्तांचा सहवास लाभला.

 

१९३२/३३मध्ये माझे वडील कै.सीताराम तुकाराम पाटील, (माझे आजोबा) लहान भाऊ दौलत सीताराम, व लहान बहिण सारजा,अशा आमच्या कुटुंबातील चौघांनी आम्ही भाग घेतला व तुरूंगवास भोगला.

म्हणजे आमचे सारे कुटूटुंबच स्वातंत्र्य लढ्यात

उतरले होते).

तर मंडळी.. अशी असते देशभक्ती …नसानसात

खेळणारी ….) राम राम …

 

जयहिंद..जय महाराष्ट्र…

 

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा