You are currently viewing आरवलीचा वेतोबा..

आरवलीचा वेतोबा..

*आरवलीचा वेतोबा…*

आरवलीचे श्री देव वेतोबा हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील अत्यंत जागृत असे पुरातन देवस्थान असून वेंगुर्ला शिरोडा रस्त्यावर वेंगुर्ला शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे. श्री देव वेतोबा म्हणजे केवळ आरवलीवासियांचाच नव्हे तर अवघ्या दक्षिण कोकणातील लोकांचा पिढ्यानपिढ्याचा पालक, रक्षक आणि संकट निवारक म्हणून ओळखला जातो. श्री देव वेतोबा मंदिराच्या प्रवेशद्वारावर येताच रस्त्यावरूनच मंदिराच्या गाभाऱ्यात उभ्या असलेल्या वेतोबाचं दर्शन होतं. विठोबाच्या गाभाऱ्यात श्री देव भुमय्या, श्री देवपूर्वस, श्री देव रामपुरुष, श्री देव बाराचा ब्राह्मण, श्रीदेवी भावकाई यांच्या सुद्धा पाषाणमूर्ती स्थापित केलेल्या आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात वेतोबाची भव्य अशी मानवाकृती द्विभुज मूर्ती उभी आहे. सुमारे दोन हजार लोक बसू शकतील एवढे प्रशस्त वेतोबा मंदिर असून हे मंदिर सुमारे इ.स.१६६० मध्ये बांधण्यात आले तर सभामंडप इ. स. १८९२ ते १९०० मध्ये बांधण्यात आला आहे. हे देवालय दुमजली असून नगारखाना तीन मजली आहे.
मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा म्हणजेच देवदीपावली दिवशी श्री देव वेतोबाचा जत्रोत्सव भाविकांच्या अलोट गर्दीत पार पडतो. यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे पाऊस, नारींगणे आदी फटाक्यांची होणारी आतषबाजी हे देखील जत्रोत्सवाचे खास आकर्षण असते. श्री देव वेतोबाच्या नवसाला केळीचा घड देण्याची येथे प्रथा आहे. आरवली गावातील लोक मानतात की, वेतोबा गावभर फिरत असतो त्यामुळे त्याचे जोडे झीजतात. त्यामुळे वेतोबाला चामड्याचे भले मोठे जोडे देखील दिले जातात. विठोबा म्हणजेच वेताळ. येथील भक्त आदराने वेताळाला वेतोबा असे म्हणतात. या वेताळांमध्ये भुताखेतांना व अपप्रवृत्तींच्या शक्तीला विरोध करण्याची ताकद असते. त्यामुळेच आरवलीतील वेतोबाची ख्याती सर्व दूर पसरली आहे. दीड ते दोन फूट लांबीच्या चपला वेताळाच्या पायात सरकवल्या जातात व त्यानंतर वेतोबा नगरप्रदक्षिणा मारण्यासाठी बाहेर पडतो. यावेळी काळ्याशक्ती सुद्धा त्याच्यासमोर टिकाव धरू शकत नाहीत. अशा या देवाचे संकटकाळी स्मरण केले तरी तो पाठीशी उभा राहतो.
आरवलीच्या वेतोबा मंदिरात गेल्यावर मोठमोठ्या चपलांचा ढीग दिसतो. मंदिराच्या समोरील दुकानांवर केळ्याचे घड लक्ष वेधून घेतात. नवसपूर्ती साठी भक्तगण केळ्याचा अख्खा घड वेताळाच्या चरणी अर्पण करतात. कोकणातील श्रद्धेचा आणि निसर्गप्रेरणेचे एक महत्त्वाचे स्थान म्हणून वेतोबा देवस्थान ओळखले जाते.

प्रतिक्रिया व्यक्त करा