You are currently viewing पिंपरी – चिंचवड कार्यकर्त्यांची खाण!” – दादा वेदक

पिंपरी – चिंचवड कार्यकर्त्यांची खाण!” – दादा वेदक

“पिंपरी – चिंचवड कार्यकर्त्यांची खाण!” – दादा वेदक*

पिंपरी

“पिंपरी – चिंचवड कार्यकर्त्यांची खाण असून या भूमीने सुनीता फाटक यांच्यासारखे असंख्य समर्पित कार्यकर्ते विविध संघटनांना दिले आहेत!” असे भावपूर्ण उद्गार विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संयुक्त मंत्री दादा वेदक यांनी विश्व हिंदू परिषदेच्या नुकत्याच दिवंगत झालेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या स्वर्गीय सुनीता सुधीर फाटक यांच्या श्रद्धांजली सभेत बोलताना कॅप्टन कदम सभागृह, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे शनिवार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी काढले. विश्व हिंदू परिषद जिल्हा अध्यक्ष शरद इनामदार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हा संघचालक विनोद बन्सल, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ महिला विभाग कार्याध्यक्षा वैदेही पटवर्धन यांची व्यासपीठावर तसेच विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची सभागृहात उपस्थिती होती.

दादा वेदक पुढे म्हणाले की, “निरलस, ध्येयनिष्ठ आणि निर्मळ मनाची कार्यकर्ती असे सुनीता फाटक यांचे व्यक्तिमत्त्व होते. १९८७ पासून २०२० पर्यंत त्यांनी संघटनेच्या कार्यासाठी अविरत भ्रमंती केली. आपल्या सामाजिक कार्यातून त्यांनी असंख्य कुटुंबांतील माणसे जोडली. प्रपंचात राहूनही वयाच्या ८१ व्या वर्षांपर्यंत कार्याचा वसा निष्ठेने जोपासला. सुधीर फाटक आणि कुटुंबीयांची त्यांना उत्तम साथ लाभली. सतत व्यस्त असूनही त्यांनी कौटुंबिक घडी कधी विस्कळीत होऊ दिली नाही. भ्रमणध्वनीवरून कार्यकर्ते निर्माण होत नाहीत, तर त्यासाठी सहप्रवास, सत्संग आवश्यक असतो. सुनीता फाटक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बालसंस्कार वर्ग सुरू करावेत!” असे आवाहनही त्यांनी केले.

स्वर्गीय सुनीता फाटक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. रविकांत कळंबकर यांनी प्रास्ताविकातून सुनीता फाटक यांच्या सुमारे चाळीस वर्षांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. यावेळी ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून सुनीता फाटक यांनी सहभाग घेतलेल्या रामजन्मभूमी आंदोलनातील कारसेवा, शिलांन्यास याविषयीच्या आठवणी प्रदर्शित करण्यात आल्या. विनोद बन्सल यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या कार्यातील त्यांचे योगदान अधोरेखित केले; तर शरद इनामदार यांनी आपल्या मनोगतातून, “सुनीताताई यांच्याकडे अनेक गोष्टींचे सामर्थ्य होते. संघटनेच्या उभारणीसाठी त्यांनी तन, मन आणि धन समर्पित केले; तसेच जीवावर उदार होऊन विविध आंदोलनात सहभाग घेतला!” असे गौरवोद्गार काढले. सुनीता फाटक यांच्या स्नुषा तन्वी फाटक यांनी सासू – सुनेच्या नात्यापलीकडील निखळ नात्याच्या हृद्य आठवणी जागविल्या. डॉ. गिरीश आफळे, ह. भ. प. शिवाजीमहाराज मोरे, आशा टाकळकर, विजय देशपांडे, भास्कर रिकामे, अनुजा वनपाळ, अशोक येलमार, महेश कुलकर्णी यांनी व्यक्त केलेल्या श्रद्धांजलीपर मनोगतातून सुनीता फाटक यांच्या चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ सामाजिक कार्याविषयीचे अनेक आयाम उलगडत गेले. हर्षदा पोरे यांनी सूत्रसंचालन केले. उपस्थित सर्वांनी सुनीता फाटक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा