विशेष संपादकीय…..
खाजगी शाळा मात्र २० मिनिटे ऑनलाईन शिकवणी घेऊन पालकांकडून पैसे काढण्यात व्यस्त…
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाची आर्थिक गाडीच बंद पडली, उद्योग, व्यवसाय बंद झाले. कित्येकांना नोकऱ्यांना मुकावे लागले. शाळा, महाविद्यालये बंद पडली. एकंदरीत प्रत्येक क्षेत्रात मंदी आली. कित्येकांना दोनवेळाच्या घासासाठी मिळेल ते काम करावे लागले. अनेकांनी आपला मूळ धंदा बंद असल्याने रस्त्यावर भाजीपाला विकून उदरनिर्वाह चालविला. दैनंदिन जीवनात कित्येकांना उदरनिर्वाहाचे साधनही उपलब्ध नाही, परंतु खाजगी शिक्षण क्षेत्राने मात्र अगदी नर्सरी,केजीच्या मुलांना सुद्धा दिवसातून २०/३० मिनिटे ऑनलाईन शिकवणीचे धडे देत पालकांना लुटण्याचीच युक्ती शोधून काढली.
राज्य सरकारने लोकांना आवाहन केले की कोरोनाच्या काळात खाजगी शाळांची फि भरू नकात, परंतु फक्त आवाहन करून होत नाही तर शिक्षण मंत्र्यानी तसा अध्यादेश का काढला नाही? अशी विचारणा फी च्या चक्रव्यूहात भरडले गेलेले पालक करत आहेत. आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून काही खाजगी शाळांकडून वारंवार फी संदर्भात फोन करून विचारणा झाल्यावर नाविलाजने का होईना सरकारने शाळांना तसा आदेश दिला नाही म्हणून फी भरत आहेत.
खाजगी शाळांमध्ये शिकविण्यासाठी असणारे शिक्षक हे कायम नसतात, अगदी नगण्य पगारावर, आणि शिक्षणानेही बऱ्याच ठिकाणी नगण्यच असतात. शिक्षक म्हणून कुठलीही डिग्री नसणारे असे शिक्षक अशा खाजगी शाळांमधून शिकवीत असताना सुद्धा कामावर हजर नसणाऱ्या, घरातूनच २०/३० मिनिटे झूम अँप सारख्या विडिओ कॉलिंग च्या माध्यमातून मुलांची शिकवणी घेतात, जिथे कित्येक मुलांच्या घरी रेंज नसल्याने त्याचा उपयोग शून्यच असतो. परंतु अशाप्रकारच्या शिकवणीमुळे काही संस्था, शाळा चालक मात्र मुलांच्या पालकांकडून संपूर्ण सत्राची फी वसूल करतात. न दिल्यास वारंवार फोन करून सतावतात, मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती दाखवतात.
शाळा बंद असल्याने अर्धा तास शिक्षकांच्याच इंटरनेट सुविधेचा उपयोग करून घेतात, शाळेतील पाणी, वीज वापरली जात नाही, शाळेचे कुठलेही साहित्य वापरले जात नाही, शिक्षक सुद्धा शाळेत येत नाहीत, मग अशावेळी शिक्षकांचा, कर्मचाऱ्यांचा पगार देणे बाकी आहे असे सांगून हे खाजगी शाळा चालक पालकांना का लुबाडतात? यांच्या घरी बसलेल्या शिक्षकांना पगार द्यायचा असतो, परंतु घरी बसलेल्या पालकांना कोण पगार देणार? याचा थोडाही विचार खाजगी शाळा चालकांना येत नाही का?
कोरोनामुळे गेले सहा महिने सर्वच ठप्प आहे. अशावेळी पालकांवर दबाव आणून पालकांना लुटणाऱ्या खाजगी शिक्षण संस्थांवर सरकार कधी वचक बसवणार आहे? शाळा सुरू होत नाहीत तोपर्यंत फि भरू नका अशा शिक्षण मंत्र्यानी पोकळ घोषणा करण्यापेक्षा तशा प्रकारचे परिपत्रक खाजगी शिक्षण संस्थांसाठी का काढण्यात आले नाही?
काही खाजगी शिक्षण संस्थांकडून पालकांची होणारी ही लूट, पिळवणूक थांबण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्र्यानी शाळा सुरू होईपर्यंत कोणत्याही प्रकारची फी वसूल करू नये असे परिपत्रक काढावे, तसेच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा खाजगी शाळांच्या मुजोर वागण्याकडे गांभीर्याने लक्ष घालून पालकवर्गाला न्याय द्यावा अशी मागणी पालकवर्गाकडून करण्यात येत आहे.
https://sanwadmedia.com/1554/
या वेबसाईटला अवश्य भेट द्यावे. sanwadmedia वेळोवेळी समाजात ज्या विविध घडामोडी घडत असतात तसेच जनकल्याणासाठी, विकासासाठी, त्याचप्रमाणे परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून यांच्या लेखणी व लेखाद्वारे एक धाडसी नेतृत्व समाजात पहावयास मिळते.
आजचा विशेष संपादकीय लेख भरपूर आवडला. संपादक व त्यांची संपूर्ण टीम यांचे मनःपूर्वक आभार जे वेळोवेळी सामाजिक विषयाला अनुसरून जनजागृती तसेच विषयाला हाताळण्याचे कार्य करीत असतात. यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा व अद्ययावत बातम्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमाने सर्वांना पोहोचत आहेत.
आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
🙏 सत्यवान रेडकर
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार