You are currently viewing नित्य नवे सोहाळे

नित्य नवे सोहाळे

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*नित्य नवे सोहाळे*

 

निसर्ग राजाला या सृष्टीला नटवायची खुप हौस आहे. नित्य नवे नवे सोहाळे करून तो तिचे रूप खुलवत असतो.

पहाटे पहाटे हेच निळे नभांगण ऊजळ पांढुरके दिसते. झुंजू मुंजू पहाट…. फुललेल्या फुलांचा तजेला व सुगंध,…. पक्षांचा किलबिलाट,.. तारकांची तिमिरासह पिछेहाट. हे सगळं सहज घडुन येते.यांत शुक्राची चांदणी प्रकाशत हळू हळू मंद होत जाते. आताच न्हाऊन आल्यासारखी सृष्टी या पहाटेच्या सोहाळ्यात ताजी तवानी प्रसन्न दिसते.

थोड्याच वेळात लाल गुलाबी रंगात रंगुन आलेली ऊषा आपला रंग पसरू लागते. किरणे पसरत रवीराजाची वर्दी देतात. गावगाडा जागा होत कामाला लागतो. पोरं शाळेला , तर घरधनी कामगिरीच्या वाटेला लागतात. तरूवेली टवटवीत दिसतात. सुवर्ण ऊधळत रवीराजाचा रथ दौडत जातो व वाटा, झाडांचे शेंडे, घरे सगळंच सोनेरी होऊन जाते. या सुवर्णतेजात सृष्टी न्हाऊन तेजस्वी दिसते. नविन आशेसह नव्या ऊमेदीच्या या ऊष:कालाच्या सोहळ्यात सृष्टी बहरलेली मोहरलेली दिसते, आणि सुप्रभात होते.

मध्यान्ही गडबड शांत होते. जलाशय स्तब्ध होतात. वारा सुस्त पहुडतो. तरूवेलींच्या सावल्या तळाशी दिसतात. सूर्य क्लांत होतो. शांत जलाशयाच्या दर्पणी सुंदर प्रतिबिंबे स्थीर स्तब्ध होतात. पशुपक्षी आसरा शोधतात . सागराचा निळसर असा शांत व गंभीर वाटतो. आकाशाचा दिसणारा चांदवा निरभ्र पण छान दिसतो.असा मध्यान्हीचा सोहळा साजरा होत सृष्टी आरामात आळसात सगळं निरखत शांत निरवतेत बुडलेली दिसते.

ऊन्ह ऊतरतात व संध्या अबोली पिवळया रंगात रंगुन येते. ती प्रथम रवीचे तेज कमी करते. वारा ऊन्मत्त होत वाहू लागतो झाडांच्या पाना पानांना घुसळून काढतो . जलाशयातील प्रतिबिंबे व झाडांच्या सावल्यांच्या रांगोळ्या विस्कटून टाकतो.मातीचा धुरळा मजेत ऊडवतो. दिवस संपल्याची जाणिव देत संध्या रवीबिंबासह पश्चिमेला डोंगराखाली ऊतरू लागते. अशावेळी वाटेतल्या सागराला ,नदी सरोवरांना ती आपल्याच अबोली रंगात रंगवत जाते. नभांगणी संध्याकाळचा सोहळा साजरा होत असताना सृष्टी कमालीची सुंदर दिसते, पण तिचा टवटवित तजेला नाहीसा होतो.

सावळी सावळी सांज सृष्टीवर पसरते. गाई गुरे गळ्यातील घुंगरू घंटा वाजवत धूळ ऊडवत गोठ्याकडे परततात. वासरे दूध पिऊन तृप्त होतात. फुले मावळतात. पशूपक्षी घराकडे परतू लागतात पक्षांच्या आकाशातील रांगा व त्यांची शिस्त खुप छान दिसतात. हळूहळू गावगाडा अंधारात गुडूप होतो. घरोघरी तुळशीजवळ देवघरात दिप जळू लागतात. घरे शांत होतात. पक्षी घरट्यात विसावतात. आता एकेक नक्षत्रांचा दिवा लावत मागेपुढे खेळणारी तारकादले घेऊन रजनी येते. या नक्षत्री प्रकाशात सृष्टी रूपेरी चंदेरी होते तिचे रूप शितल होते. या निरवतेत चांदोबा व तारकादलांचा खेळ रंगू लागतो. पावसाळा नसेल तर पिठूर चांदणचुरा सांडू लागतो. शांत सागराच्या लाटा किनरी विसावतात. झाडांवर काजव्यांच्या दिपमाळा लटकू लागतात. रात्रीच्या दुसर्या प्रहरी दंवबिंदूंची बाळे खाली ओघळतात व पाना फुलांशी गुजगोष्टी करत गारवा आणतात. रूपेरी आभाळाचा तुकडा जलाशयाच्या शांत दर्पणी स्थिर होतो. सृष्टी स्वत:चे हे रूप त्यात शोधत रहाते. ताजी शांत स्तब्ध असं तिचे चंदेरी रूप फारच खुलून. दिसते.

नकळत क्षितिजावर शुक्राची चांदणी चमकू लागते व पुन्हा पहाटेचा सोहळा रंगणार असे दिसू लागते व रजनी आपला सोहळा आटोपता घेते.

पावसाळ्यात सहस्त्र जलधारा, सोदामिनीचे नर्तन, कृष्णमेघांच्या ऊन्मत्त गर्जना वार्याचा सुसाट धिंगाणा यातही सृष्टी थोडी रौद्र पण हवीहवीशी वाटते.

शरदात ती झाडांच्या लाल पिवळ्या रंगात नटते. हेमंतात थोडी ऊबदार होते. शिशिरात मात्र पानगळतीत निष्पर्ण वृक्षांच्या छायेत ऊदास केविलवाणी दिसते.

मग येतो वसंत ऋ्तूराजाच्या रंगित सोहळ्यात ती रंगपंचमी खेळते. फुला फुलात ऊमलून येते. चैत्रपालवीत सजते. सोनचाफ्यात हरवते. आम्रमोहोर कोकीळेचे कूहूकुहूत हरवते.

आंब्याच्या पालखीत बसते. आपले सगळे सोहाळे पुरवून घेते. शेवटी आधी बहावा व नंतर गुलमोहर पानोपानी फुलून येतात व हळदकूंकवाच्या पायघड्या अंथरत तिचा निरोप घेतात .

या सर्वात वर्षा ऋतूत शेतकरी बैल हे कष्टकरी… हेमंतात ताजे भाजीचे मळे फळबागा, वसंतात आंबा फणस, पांगारा काटेसावर , ग्रिष्मात बहावा, शिशिरात जागोजागी शेकोट्या, हरभर्याची ऊसाची शेती, गुर्हाळे यांनी तिचे वैभव जास्तच बहरते.

केव्हाही बघा सृष्टी देखणी दिसेल असेच काही बाही निसर्ग राजा करत रहातो.

 

अनुराधा जोशी.

अंधेरी ६९

9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा