You are currently viewing इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानच्या साहित्य पुरस्कारांची घोषणा

इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानच्या साहित्य पुरस्कारांची घोषणा

हंसराज जाधव,विठ्ठल खिलारी, सफरअली इसफ यांना संस्कृती साहित्य पुरस्कार जाहीर

 

इचलकरंजी/प्रतिनिधी

इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे यावर्षीच्या साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये कथा विभागात दगडूलाल मर्दा स्मृती संस्कृती पुरस्कारासाठी हंसराज जाधव यांच्या ‘ मोहरम’ या कथा संग्रहाची तर कादंबरी विभागात लक्ष्मण कांबळे ( जिंदा ) स्मृती संस्कृती पुरस्कारासाठी विठ्ठल खिलारी यांच्या ‘ सवळा ‘ या कादंबरीची आणि काव्य विभागात वसंत-कमल स्मृती संस्कृती पुरस्कारासाठी कवी सफरअली इसफ यांच्या ‘अल्लाह ईश्वर ‘ या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. सदर पुरस्कार विजेत्यांची निवड समीक्षक प्रा. डॉ.रणधीर शिंदे, समीक्षक प्रा.डॉ रमेश साळुंखे या परीक्षकांनी केली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष महावीर कांबळे यांनी दिली.सदर पुरस्कारांचे वितरण इचलकरंजी येथे डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात होणाऱ्या संस्कृती साहित्य संमेलनात होणार आहे. इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे गुणवंत लेखक कवींचे लेखन चांगल्या वाचकांपर्यंत पोहोचावे म्हणून दरवर्षी कथा कादंबरी आणि काव्य विभागात पुरस्कार दिले जातात. यावर्षीच्या सदर पुरस्कार योजनेसाठी कथा, कादंबरी आणि काव्य विभागात मिळून सुमारे १०० पुस्तके प्राप्त झाली होती. यातून तिन्ही विभागातील पुस्तकांचे परीक्षण करून सदर तीन ग्रंथांची संस्कृती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ‘मोहरम ‘ या कथासंग्रहात ग्रामीण भागातील सांस्कृतिक बहुविधता, महानुभव पंथीयांची परंपरा, लोकश्रद्धा, शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची अस्वस्थता या संदर्भातले असंख्य अनुभव तपशीलवारपणे आलेले आहेत. ज्या अनुभवांच्या आधारे ही कथा गुंफली जाते ते अनुभव वाचकांच्या मनाला भिडतात, अस्वस्थ करतात. ‘सवळा ‘ ही कादंबरी ऊसतोड कामगारांची व्यथा मांडताना शोषित समाज व्यवस्थेचं भयावह चित्र मांडते. ऊसतोडीच्या संघर्षातही एखादं मूल उच्चशिक्षित होतं तरीही त्याला भ्रष्ट व्यवस्था नाकारते आणि पुन्हा ते ऊस तोडीकडेच वळते अशी दारूण परिस्थिती मांडणारी ही कादंबरी वाचताना वाचकाला अंतर्मुख करत जाते. तर ‘अल्लाह ईश्वर ‘ मधील कविता आजच्या जातीय धार्मिक ध्रुवीकरणाकडे निर्देश करताना माणूस कसा विभागला गेला आहे याचं भेदक वास्तव सांगते. माणसाचा माणसावरचा विश्वास उडून जावा इतका माणूस अधिक वर्चस्ववादी झाला आहे. या वर्चस्ववादी वृत्तीचा बळी अल्पसंख्यांक गट ठरत असून या सगळ्याची चिकित्सक मांडणी करताना या कवितेत कुणाबद्दलही कटुता नाही हे या कवितेचे सर्वात महत्वाचे मोल आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सदर तीन ग्रंथांची संस्कृती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचे परीक्षकांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा