*चित्रपटगीतांच्या मैफलीला अमिताभप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
पिंपरी
विविध भारती म्युझिकल इव्हेंट या संस्थेच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त प्रस्तुत ‘के पग घुंगरू बांध…’ या महानायक बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेल्या कराओके व्हिज्युअल चित्रपटगीतांच्या नि:शुल्क मैफलीला अमिताभप्रेमी रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गुरुवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ रोजी निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात (छोटे सभागृह) संपन्न झालेल्या या विशेष सांगीतिक मैफलीत दिशा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब जवळकर, उपाध्यक्ष संतोष बाबर, ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव, प्रदीप गांधलीकर, शामराव सरकाळे, चंद्रशेखर कांबळे, जितेंद्र राॅय, राजेंद्र पगारे, महेश बिरदवडे, राजेंद्र देसाई, विलास गादडे, ॲड. स्मिता शेटे, विकी शर्मा, उषा शेटे यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
विनायक कदम, नंदकुमार कांबळे, शैलेश घावटे, डॉ. सायली बांबुरडे, अनिल जंगम, शोभा भणगे, अरुण सरमाने, नेहा दंडवते, विकास जगताप, सुचिता शेटे, शुभांगी पवार, डॉ. किशोर वराडे, अभिमान विटकर, उज्ज्वला वानखेडे या गायक कलाकारांनी आपल्या एकल आणि युगुलस्वरातील लोकप्रिय चित्रपटगीतांच्या सुरेल अन् बहारदार सादरीकरणातून रसिकांना मंत्रमुग्ध केले; तर ज्युनियर अमिताभ बापू जाधव यांनी आपल्या बच्चन शैलीतील नृत्याने रंगमंचावर अमिताभ यांची अनुभूती दिली. गणेश वंदनेने प्रारंभ करण्यात आलेल्या या मैफलीत “अपनी तो जैसे तैसे…” , “रिमझिम गिरे सावन…” , “ओ साथी रे…” , “काहे पैसे पे…” , “जवानी जानेमन…” , “जिधर देखू…” या एकल गीतांसोबत “अपने प्यार के…” , “जाने कैसे कब कहा…” , “परदेसीया यह सच हैं पिया…” , “धूप में ना निकला करो…” , “प्यार में दिल पे…” , “आज रपट जाये तो…” अशा युगुल आणि द्वंद्वगीतांनी रंगात आलेल्या रसिकांनी “देखा ना हाय रे सोचा ना…” या गीतावर उत्स्फूर्त नाच करून दाद दिली; तर “रंग बरसे भिगे चुनरवाली…” या मूळ अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील गीताच्या चपखल सादरीकरणाला पसंतीची पावती दिली. “सारा जमाना…” या गीतावर ज्युनियर अमिताभ यांनी चित्रपट दृश्यातील शैलीबरहुकूम सुरेख नृत्य केले. “चुम्मा दे जुम्मा…” या गीताची धमाल आणि “मैं हूं डॉन…” या गीतावर गायक कलाकारांनी केलेले नृत्य रसिकांना भावले. “मैं और मेरी तनहाई…” मधील अभिताभ यांच्या खास खर्जातील आवाजाचे अप्रतिम सादरीकरण श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून गेले; तर “सलाम – ए – इश्क…” मधील द्वंद्वाने रसिक मोहित झाले. उत्तरोत्तर अतिशय रंगतदार झालेल्या या मैफलीत “के पग घुंगरू बांध…” या ऑल टाईम हिट गीताच्या दमदार सादरीकरणाने मैफलीचा कळसाध्याय गाठला.
विनायक कदम आणि नंदकुमार कांबळे या दोन्ही संयोजकांचा वर्धापनदिनानिमित्त उत्तम जाधव आणि विजय सांबारे यांनी खास सत्कार केला; तर संयोजकांनी सर्व गायक कलाकार आणि साहाय्यकांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान केला. शैलेश घावटे यांनी ध्वनिसंयोजन केले. सौमिल घावटे यांनी दृकश्राव्यचित्रण केले. आकाश यांनी छायाचित्रण केले. सचिन शेटे यांनी विशेष साहाय्य केले. अरुण सरमाने यांनी निवेदन केले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२