You are currently viewing राज्यातील पहिले कायद्याचे म्युझियम कोकणात

राज्यातील पहिले कायद्याचे म्युझियम कोकणात

वृत्तसंस्था

दाभोळ (रत्नागिरी) :

दापोली पोलिस ठाण्याच्या आवारातील कायद्याचे म्युझियम आणि कचऱ्यातून सौंदर्यनिर्मिती हा प्रकल्प सर्वांसाठी मॉडेल ठरणार आहे. दापोली पोलिस ठाणे व निवेदिता प्रतिष्ठान यांनी संयुक्‍तपणे साकारलेल्या प्रकल्पाचे उद्‌घाटन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रकल्पाबाबत बोलताना प्रकल्पाचे प्रमुख प्रशांत परांजपे यांनी सांगितले की, स्वच्छतेच्या संदर्भात संदेश आणि कायद्याच्या संदर्भात बोलकं म्युझियम उभारण्यात आलेले दापोली पोलिस ठाणे महाराष्ट्रातील पहिले पोलिस ठाणे आहे. नजरचुकीने अथवा माहितीच्या अभावामुळे किंवा जाणीवेनेही अनेक चुकीच्या गोष्टी समाजात घडत असतात, त्या गोष्टी प्रत्यक्षात समोर दिसल्यानंतर आपण भानावर येऊ शकतो, या भावनेतून प्रतीकात्मक फलक आणि प्रतिकृती उभारले आहेत.

दापोलीत येणाऱ्या पर्यटकाना स्वच्छता आणि कायदा सुव्यवस्था राखणे याचबरोबर एखादे पोलीस ठाणेही पाहण्यासारखे ठिकाण असू शकते, हे अनुभवता येणार आहे. नागरिकांना समाजभान राखण्यासाठी या म्युझियमचा उपयोग होणार आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याकरिता प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांपासून सौंदर्य निर्मिती कशी करता येते, याचेही प्रात्यक्षिक पाहावयास मिळते.

जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यात उभारा

दापोली पोलिस ठाण्याच्या आवारात उभारण्यात आलेले हे म्युझियम एक आदर्शवत ठरणार असून ते दापोली पॅटर्न ठरणार आहे. अशाच प्रकारची म्युझियम जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यात उभारावीत, अशी मागणी दापोलीकरांकडून करण्यात आली आहे.

प्रतीकात्मक फलक व प्रतिकृती

वणवा, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे
विना हेल्मेट गाडी चालवताना होणारे अपघात
अल्पवयीन विद्यार्थ्यानी गाडी न चालवणे
ट्रिपल सीट गाडी न चालवणे
बाल अत्याचार प्रतिबंधक कायदा काय आहे?
गाडी चालवताना मोबाइलवर बोलणं कसे ठरेल घातक
अंधश्रद्धा निर्मूलन संदर्भात, समानता दर्शविणारे फलक
इको फ्रेंडली म्युझियममध्ये मूळ

पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील आणि तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण पाटील यांनी परांजपे यांच्या जालगाव येथील इको फ्रेंडली म्युझियमला भेट दिली होती. त्या वेळी अशाच पद्धतीचे वेगवेगळया स्वरूपाचे म्युझियम दापोली पोलिस ठाण्याच्या आवारात उभारण्याबाबत त्यांच्याबरोबर चर्चा झाली. त्यांच्या मान्यतेमुळे प्रकल्प पूर्ण झाला, असे परांजपे यानी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा