मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
जगातील सर्वश्रेष्ठ समजल्या जाणऱ्या भारतीय राज्यघटनेचे महत्त्व अधोरेखित करणारा अमृत महोत्सव संविधान दिन सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती माणिबेन एम पी शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालय, माटुंगा येथे मंगळवार, दिनांक २६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना आणि ग्रीन क्लब अंतर्गत पदवी व पदव्युत्तर कला, वाणिज्य शाखेतील सर्व विभागातील प्राध्यापक, विद्यार्थिंनी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठया उत्साहात साजरा केला.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांच्या अध्यक्षते खाली प्रमुख अतिथी लायन दारा पटेल पीजीडी यांनी संविधानाचे सामुहिक वाचन केले. तसेच उपस्थित विद्यार्थिनींना संविधानाचे महत्त्व सांगून यापुढे तुम्ही त्याचे पालन करणार याची शाश्वती घेतली. संविधानाबद्दल आदर प्रकट करत त्यानुसार आपले जीवन प्रेरित करावे असे मनोगतात त्यांनी सांगितले.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब यांच्या पवित्र स्मृतीस नमन करून संविधानाचे महत्त्व वर्गामध्ये सांगण्यात आले. संविधान दिनानिमित्त अनेक विद्यार्थिनींनी वर्गांमध्ये भारतीय संविधानाचे महत्त्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले. त्याचबरोबर भारतीय संविधानातील घटना, महिलांचे कायदे, महिला सक्षमीकरण याविषयी देखील मुलींनी आपली मते व्यक्त केली. भारतीय संविधानाचे तत्वज्ञान, मूल्य, आदर्श व संविधान निर्मितीचा उद्देश स्पष्ट करण्याकरता संविधान उद्देशिकेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात या संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करणे हे महत्त्वाचे आहे. याचाच एक भाग म्हणून दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ रोजी महाविद्यालयातील विद्यार्थिनींकरिता निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींना संविधानाचे महत्त्व सांगणारी एक छोटी चित्रफित दाखविण्यात आली. यासंदर्भात जनजागृती करण्याकरिता संपूर्ण महाविद्यालयात भित्तीपत्रके लावण्यात आली. संविधानावर आधारीत भित्तीपत्रके आणि घोषणापत्रके तयार करणारी स्पर्धां आयोजित करण्यात आली होती त्यात ५८ विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.