(गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त मोझरी येथे बालकुमार साहित्य संमेलन संपन्न होत आहे त्यानिमित्त)
गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी गुरुकुंज मोझरी येथे मराठा सेवा संघाच्या जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने बालकुमार साहित्य संमेलन होत आहे. ही फार आनंददायी बाब आहे. खरं म्हणजे आजच्या मोबाईलच्या आणि दूरदर्शनच्या जमान्यात साहित्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. त्यातल्या त्यात बाल साहित्य आणि बालक याकडे तर फार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. खरं म्हणजे मुलांचे मन घडवण्याचं त्यांना शुद्ध आचरण घडविण्याचे हेच वय असते .या वयात जे संस्कार होतात ते आयुष्यभर टिकतात. आपल्यासमोर साने गुरुजींचे उदाहरण आहे. त्यांना बालपणात चांगले बाळकडू मिळाले. त्यामुळे ते एक चांगले गृहस्थ होऊ शकले. चांगले साहित्यिक होऊ शकले. श्यामच्या आईचे लेखन करू शकले. आज मुलांच्या हातात पुस्तक जाऊन मोबाईल आला आणि जोडीला टीव्ही आला. घरातलेच लोक जर मोठ्या प्रमाणात टीव्ही पाहत असतील आणि मोबाईलचा वापर करत असतील तर नकळत मुले त्यांचेच अनुकरण करनार आहेत आणि म्हणून मुलांना घडविताना एक काळजी घेण्याची गरज आहे. ती म्हणजे मोठ्यांनी आपले आचरण आपले मन आपले व्यवहार आपले बोलणे चालणे वागणे हे स्वच्छ ठेवण्याचे गरजेचे आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असे म्हटले जाते. पण आचरणात मात्र फार कमी येते. मुले आपल्या मोठ्यांचे आचरण करीत असतात. तुम्हाला माहीत नसते .पण तुमच्या प्रत्येक गोष्टीवर त्यांच्या बारीक लक्ष असते आणि तुम्ही जसे आचरण कराल तसे ते करीत असतात. तुम्ही वर्तमानपत्र वाचत असाल तर मुले पण वाचतील. तुम्ही पुस्तक वाचत असाल तर मुले पण वाचतील. सर्वात महत्त्वाचे आपले बोलणे. आपण दैनंदिन व्यवहारामध्ये सतत आचरण करीत असतो .सतत बोलत असतो आणि मुलांची नजर आपले सगळे बोलणे सगळे आचरण नकळत टिपत असते. म्हणून आपण आपले आचरण चांगले करणे गरजेचे आहे. मुलांना अभ्यासाबरोबरच विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी एखादी वाईट कृती केली तर ती त्याला नीट समजून सांगून त्यात सुधारणा केली पाहिजे. त्याला शिक्षा करून उपयोगाचे नाही .त्याचा आत्मविश्वास वाढेल त्याच्यामध्ये जिज्ञासू व प्रयोगशील वैज्ञानिक वृत्तीची जोपासना होईल. तो व्यायाम करेल. आपल्या वाचनाच्या आवडीला खतपाणी घालेल. तसेच त्याच्या ठिकाणी जे गुण असतील त्या कलागुणांना वाव देण्याची देखील गरज आहे. प्रत्येक पालकाच्या कल आपला मुलगा डॉक्टर इंजिनिअर व्हावा आणि त्याने भरपूर पैसे कमवावे असा असतो. त्यासाठी ते सतत मुलांवर अभ्यास शिकवण्या कोचिंग क्लास टेस्ट सिरीज याच्यावर भर देत असतात. पण याबरोबरच मुलाचे मन आणि आचरण यावर भर देणे गरजेचे आहे. माझे एक मित्र नगराध्यक्ष आहेत. त्यांनी त्यांच्या मुलाला लहानपणापासून पासून हैद्राबादला शिकायला पाठविले होते. मला जेव्हा हे कळले .तेव्हा मी त्या मित्राची भेट घेतली. त्यांना नीट समजून सांगितले. त्यांना ते पटले. त्यांनी मुलाला हैदराबाद वरून परत आणले. त्यामध्ये त्यांचा पाच पन्नास हजाराचा घाटा झाला .पण आज ते जेव्हा मला भेटतात. तेव्हा मला धन्यवाद देतात. मुले ही देवाघरची फुले आहेत असे आपण म्हणतो .पण खरोखरच मनाला एक प्रश्न विचारा. आपण त्यांना फुलासारखे जपतो का. अजिबात नाही. जो बालकांचे रंजन करेल त्याला खऱ्या अर्थाने परमेश्वर प्राप्त होईल असे म्हटले जाते. पण प्रत्यक्षात तसे होत नाही. मुलांचे रंजन करणे हे एवढे सोपे काम थोडेच आहे. त्यासाठी मुलांना विश्वासात घेणे .त्यांचा विश्वास संपादन करणे. त्यांना काय नको काय हवे .याचा विचार करून त्यांना पटवून देणे गरजेचे आहे. आपल्या बालकांना वेळ देणे देखील गरजेचे आहे. आजच्या धकाधकीच्या काळात नवरा बायको दोघेही नोकरीला असतील तर मुलांसाठी त्यांच्याजवळ वेळ नसतो. इथेच मुलांचे मन आणि आचरण बिघडते. मग ते मोबाईलकडे दूरदर्शनकडे किंवा इतर अनेक आक्रमणा कडे वळते. जे पालक आपल्या मुलांकडे योग्य लक्ष देतात आपले मन आणि आचरण स्वच्छ ठेवतात .त्यांची मुले फार मोठे अधिकारी नक्कीच झाले नसतील .पण एक चांगले सुजाण नागरिक मात्र झाल्याचे उदाहरणे समाजात आहेत. मी लेखक व वक्ता असल्यामुळे सुरुवातीपासून रात्री उशिरा जागून लिहीत आहे .त्याचा परिणाम माझ्या पल्लवी आणि प्राची या माझ्या मुलीवर झाला. त्यातल्या त्यात पल्लवी जास्त वेळ जागायला लागली. वाचायला लागली. आणि तिने मिळविलेल्या पाचही पदव्या ह्या विद्यापीठातून प्रथम येऊन उत्तीर्ण केल्यात. त्यासाठी ततिने फार परिश्रम घेतले नाहीत. माझ्या प्रमाणे ती रोजचे काम रोज करायची. रोजचा अभ्यास रोज करायची. त्यामुळे तिला परीक्षेसाठी वेगळा अभ्यास करावा लागला नाही. याशिवाय राष्ट्रीय सेवा योजना नृत्य नाटक अंधश्रद्धा निर्मूलन व्याख्याने या सगळ्या मध्ये ती पुढे होती. ज्या दिवशी परीक्षा संपली त्याच दिवशी तिने पुढच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला .त्यामुळे तिला मेरिटमध्ये येणे सहज शक्य झाले. तीच गोष्ट तिच्या मुलीची. स्वधाची. आता आमची ही नात चौथ्या वर्गात आहे. आजोबांच्या आईचा संस्कार घेऊन ती पुढे जात आहे. रोज नियमितपणे ती वाचते. साधारणपणे दिवसाला अभ्यासाव्यतिरिक्त ती 50 पाने वाचते. त्या पुस्तक वाचनातून तिला स्वतःची कंपनी काढायची प्रेरणा मिळाली. आणि तिने ती काढली ही. ती या वयात वेगवेगळे समाज उपयोगी उत्पादने विकते. या दिवाळीत तर तिने एका दिवसाला जवळपास 300 पाने वाचण्याचा विक्रम केला. दिवाळी शाळेला सुट्टी होत्या. त्या सुट्टीचा तिने सदुपयोग केला. तिने स्वतःचा ग्रंथ संग्रह तयार केला. पण हे कोणामुळे झाले .घरातील वातावरणामुळे. आज किती मुलांकडे स्वतःची गोष्टीची पुस्तके आहेत. स्वतःचे ग्रंथालय आहे .याचे उत्तर नाही असेच असणार. पण मुलांना वस्तुनिष्ठ गोष्टी घेऊन द्या . खेळणे विकत घेऊन द्या.चांगला पोशाख विकत घेऊन द्या .पण त्याचबरोबर त्याचा छंद मग तो वाचन असेल लेखन असेल गायन असेल त्याकडे पण लक्ष द्या. आवश्यक असे वातावरण तयार करून द्या. पण त्यासाठी पालकांनी वेळ काढणे गरजेचे आहे. परदेशामध्ये शनिवार रविवार लोक फिरायला जातात. आठवड्याचा घराचा पूर्ण ताण काढून टाकतात. आपणही तसेच करायला पाहिजे. तुम्ही मुलांना जितके जग दाखवाल. तितका मुलगा समृद्ध होईल. पुस्तकातून तर तो शिकतच आहे .पण त्याला जगामध्ये वावरू द्या. घरी कोणतेही पाहुणे आले तर सर्वप्रथम मुलांची तोंड ओळख त्यांच्याशी करून द्या. मुलांमध्ये खूप फरक पडेल. मी स्वतः मुलांना दुसऱ्या वर्गापासून अधिकारी होण्याचे प्रशिक्षण देतो. माझी मुलं कलेक्टर व्हावीत यासाठी फक्त एक रुपया मध्ये मुलांना शिकवतो. मला माहीत आहे मी जेव्हा मुलांना कलेक्टर होण्याचे प्रशिक्षण देईल तेव्हा तो कलेक्टर होईल की नाही हे मला माहीत नाही. पण तो एक चांगला सफल समृद्ध नागरिक होईल हे मात्र मी हमखास सांगू शकतो. माझ्या दुसऱ्या वर्गातील विद्यार्थिनीचे जेव्हा महामहीम राष्ट्रपतींनी भाषण ऐकले तेव्हा ते थक्क झाले. पण ती विद्यार्थिनी काही एका दिवसात तयार झाली नाही. तिला तयार करावे लागले. आम्ही तर इतरांची मुले घडवितो. तुम्हाला तुमच्याच मुलांना घडवायचे आहे. ती जबाबदारी शिक्षकांवर देऊ नका. कारण तुमची मुले शाळेपेक्षा घरी जास्त राहतात. त्यामुळे घरचेच संस्कार जास्त होतात. माझे अनेक मित्र आहेत. मोठा पगार होता. परदेशात नोकरी होती. पण एवढ्या प्रचंड पगाराच्या नोकरी सोडून ते आता सर्वसामान्य जीवन जगत आहेत. माझे गुजरात मधील महिंद्र भाई नावाचे मित्र आहेत. परवा गुजरातला गेलो असताना समर्थ डायमंड मध्ये त्यांची भेट झाली. त्यांनी मुलांचे मन बनविण्यासाठी व त्यांचे आचरण शुद्ध करण्यासाठी शाळा काढण्याचे ठरविले आहे. त्या शाळेच्या उद्घाटनाला मी होतो. आपली कॅनडा मधली लठ्ठ पगाराची नोकरी त्यांनी सोडली. आणि आता परवाला गुजरात मधील मेहसाणा जिल्ह्यातील वीसनगर येथे शाळा सुरू केली. तुम्ही चांगले काम केले तर लोक मदतीला येतात. गुजरात मधील आमचे दुसरे मित्र श्री दशरथ पाटील हे हिऱ्याचे व्यापारी आहेत. एक हजार कोटींचा त्यांचा व्यवहार आहे. हे हजार कोटीचे मालक महेंद्रभईच्या पाठीमागे उभे राहिले. आता शाळा सुरू झालेली आहे .त्या शाळेमध्ये अभ्यासाबरोबरच मुलांचे मन आणि आचरण घडविण्याचे महत्त्वपूर्ण काम केले जाणार आहे. आपणही आपल्या मुलांसाठी वेळ काढा .आपण स्वतः चांगले आचरण करा. आपले वागणे चालणे बोलणे लिहिणे वाचणे हे सारे चांगले असेल तर आपला मुलगा परदेशात नाही जाणार. त्याला लठ्ठ पगाराची नोकरी नाही मिळणार .पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे तो एक परिपूर्ण माणूस झालेला असेल. सुखी संपन्न साधे जीवन जगण्यासाठी फारसे पैसे लागत नाहीत. आज ज्यांची मुले परदेशात आहेत ते खरोखरच सुखी आहेत काय ? अर्थातच या प्रश्नाचे उत्तर सकारात्मक नाही. आपण या देशाचे अन्न खाल्लेले आहे .तर या भारत भूमीत राहून या देशाच्या साठी काही हातभार लावता येईल का ही भावना मुलांमध्ये देण्याची गरज आहे. आपला मुलगा म्हणजे यंत्र नाही. आपला मुलगा म्हणजे कम्प्युटर नाही .तो म्हणजे माणूस आहे आणि त्याला माणूस घडविण्याचे काम अशा प्रकारच्या बालकुमार संमेलनातून होत असते. आयोजकांनी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज मोझरी आश्रमात हे बालकुमार साहित्य संमेलन घेऊन खऱ्या अर्थाने मुलांना संस्कार देण्याचा व घडवण्याचा विडा उचलला आहे. गुरुकुंज बद्दल काय सांगावे. तिथली शिस्त अप्रतिम आहे . तेथील प्रार्थना माणसाला समाधान देणारी आहे. माणसाचे आयुष्य खऱ्या अर्थाने सफल समृद्ध व समाधानी करण्याची ताकद गुरुकुंज भोसरीमध्ये आहे .ती संयोजकांनी ओळखली आणि बालकुमार संमेलन घेण्यासाठी गुरुकुंज मोझरी आश्रमाची निवड केली ही खरोखरच चांगली गोष्ट आहे .
चला आपण सारे एकत्र येऊ या. दुसऱ्यासाठी नाही तर आपल्या मुलावर संस्कार करू या. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला आपल्यावर संस्कार करावे लागतील. मगच ते झिरपत झिरपत आपल्या मुलांकडे जातील. मुले ही खरोखरच देवाघरची फुले आहेत .त्यांना फुलासारखे जपले तर ते नक्कीच समाजाला सुगंध देत राहतील.
प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक मिशन आयएएस
अमरावती
9890967003