*”सर्वसमावेशकता हे संविधानाचे सर्वोच्च मूल्य!” – मिलिंद परांडे*
पिंपरी
“सर्वसमावेशकता हे संविधानाचे सर्वोच्च मूल्य आहे!” असे गौरवोद्गार विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी एस एन बी पी विधी महाविद्यालय सभागृह, मोरवाडी, पिंपरी येथे मंगळवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी काढले. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त एस एन बी पी विधी महाविद्यालय आणि दर्द से हमदर्द तक ट्रस्ट व विधी प्रकोष्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात मिलिंद परांडे बोलत होते. ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सतिश गोरडे, दर्द से हमदर्द तक ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ॲड. सुनीता साळशिंगीकर, एस एन बी पीचे चेअरमन डॉ. डी. के. भोसले, प्राचार्या डॉ. रोहिणी जगताप, उपप्राचार्य कैलाश पोळ आदी मान्यवरांची व्यासपीठावर तसेच व्यावसायिक, वकील आणि विधी महाविद्यालयातील विद्यार्थी यांची सभागृहात बहुसंख्येने उपस्थिती होती.
मिलिंद परांडे पुढे म्हणाले की, “भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील अनेक दिग्गज हे बॅरिस्टर होते. संविधान अस्तित्वात येण्यापूर्वी त्याचा मसुदा तयार करण्याचा प्रयत्न अनेक विद्वानांनी केला होता. वेगवेगळ्या देशांच्या संविधानाचा अभ्यास करून त्यातील उत्कृष्ट बाबींचा समावेश भारतीय संविधानात करण्यात आला. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन तत्त्वांचा समावेश करताना हक्क, कर्तव्य आणि दंडात्मक बाबी यामध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्य अन् समता कायद्याने सूचित केले जाऊ शकते; पण सहभाव अथवा बंधुता म्हणजेच धर्म होय, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मत होते. जातिभेद, अस्पृश्यता, कन्याभ्रूणहत्या आणि गरिबी अशा विविध कारणांमुळे हजारो वर्षांपासून असंख्य भारतीयांनी स्थलांतर केले. त्यामुळेच राज्यघटनेतील उद्देशिकेत सामाजिक न्यायाला स्थान देण्यात आले आहे. व्यक्तिगत स्वार्थाच्या पलीकडे जाऊन, देशाच्या उत्थानासाठी प्रत्येक भारतीयाने संविधान साक्षर होऊन कर्तव्यदक्ष नागरिक होणे आवश्यक आहे!”
ॲड. सतिश गोरडे यांनी, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तन, मन आणि धन समर्पित करून संविधानाच्या मसुद्याला आत्मा प्रदान करीत सजीव केले. त्यामुळे उत्तम मसुदा ही नव्वद टक्के यशाची खात्री होय. संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त दिनांक १६ नोव्हेंबरपासून संविधान साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे. हमदर्द ट्रस्ट तसेच गौरीशंकर मोफत विधिसेवा कायदेविषयक कार्यात मौलिक योगदान देत आहे!” अशी माहिती दिली. सुनीता साळशिंगीकर यांनी, भारतीय संविधानाच्या कलम ३९अ नुसार सर्व नागरिकांना कायदेशीर मदत मिळण्याचा अधिकार आहे, ३ वर्षांपासून आजपर्यंत सहाशेहून अधिक गरजू गरीब कैद्यांना दर्द से हमदर्द ट्रस्टने मोफत कायदेविषयक साहाय्य करून जेलबाहेर काढले आहे. वकिली पेशामध्ये असताना या समाजाचे सुद्धा आपण देणे लागतो अशी भावना नवोदित वकिलांमध्ये जागृत करण्याचे काम संस्था करते; तसेच स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींमार्फत मार्गदर्शन करते, अशी माहिती दिली.
डॉ. रोहिणी जगताप यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अभिराजी वाबळे, प्रा. स्वप्निल जाधव, प्रा. विक्रम कुशाग्र आणि अन्य सहकांर्यानी संयोजनात सहकार्य केले. दीपप्रज्वलन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. प्रा. अर्पिता गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. कैलाश पोळ यांनी आभार मानले.
प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२