*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*******************
*ती….*
उन्हातान्हात ती
गावभर हिंडायची
गल्ली बोळात आवाज देऊन ती
काहींना काही विकायची
विकत घेण्याचा तिचा आग्रह असायचा
तेव्हा तिला लेकरांच्या चेहऱ्यावरचा
भुकेचा वणवा दिसायचा
भूक मारून ती
दिवसभर पायपीट करायची
घाम गाळून ती पैसे कमवायची
बघणाऱ्यांची नजर मात्र
तिच्या फाटक्या कपड्यांवर असायची
तेव्हा तिची मान शरमेने खाली झुकायची
अशाही अवस्थेत माणसांच्या गर्दीत
ती धैर्याने फिरत होती
फाटक्या लूगड्याने अंग झाकून घेत होती
कितीतरी असाह्य वेदना घेऊन
घरी परतायची
सुखरूप घरी आल्यावर मग ती
देवापुढे दिवा लावायची
रोज कितीतरी नजरांनी ती
जखमी होत असे
एक अनामिक भिती तिच्या
चेहऱ्यावर दिसे
तेव्हा लेकरं तिच्या अवतीभोवती गोळा व्हायचे
डोळेभरून पाहून तिला मिठी मारायचे
लेकरांना जवळ घेऊन ती त्यांना
पोटभरून खाऊ घालायची
त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून
मग ती तिच फाटकी चोळी शिवायची
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
९५७९११३५४७
९४२२८९२६१८