You are currently viewing कुडाळ मतदारसंघाची १४ टेबलवर होणार मतमोजणी

कुडाळ मतदारसंघाची १४ टेबलवर होणार मतमोजणी

२५८ कर्मचारी नियुक्त; एकूण २० फेऱ्या होणार

कुडाळ :

कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शनिवार, २३ नोव्हेंबर रोजी कुडाळ तहसील कार्यालय परिसरात सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. १४ टेबलवर ही मतमोजणी होणार असून एकूण २० फेऱ्या होणार आहेत. यासाठी २५८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. २३ रोजी सकाळी ८ पासून मतमोजणी सुरू होऊन दुपारी बारापर्यंत कुडाळ-मालवण मतदारसंघाचा निकाल स्पष्ट होणार आहे. सुरक्षेच्यादृष्टीने तीन टप्यांमध्ये सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती कुडाळ निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी दिली. प्रशासनस्तरावर नियोजन करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया झाली. यानंतर आता सर्वांनाच निवडणुकीच्या निकालाचे वेध लागले आहेत.

राजकीयस्तरावर विविध लोकप्रतिनिधी मतांची आकडेवारी करण्यात व्यस्त आहेत, तर प्रशासन मात्र निवडणुकीची मतमोजणी व निकालाची जय्यत तयारी करण्यात व्यस्त आहे. या अनुषंगाने तहसील कार्यालय येथे मतमोजणीची जय्यत तयारी सुरू आहे. सुरक्षा यंत्रणा अतिशय कडेकोट कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात एकूण २७९ मतदान केंद्रे असून यासाठी एकूण १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. एका फेरीत १४ केंद्रांची मतमोजणी होणार आहे. एकूण २० फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी २५८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक मतमोजणी कालावधीत सुरक्षा यंत्रणा कडेकोट ठेवण्यात येणार आहे. या मतमोजणी दरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी अभिमन्यू हॉटेल जवळचा परिसर व एस. एन. देसाई चौक या ठिकाणचा परिसर अशा दोन ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. जागा लवकरच त्या-त्या पक्षांच्या नेत्यांना सांगण्यात येतील, अशी माहिती कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा