उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदवहीची तृतीय तपासणी पुर्ण
सिंधुदुर्गनगरी
निवडणूक खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदवहीची व्दितीय तपासणी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हयातील तीनही विधानसभा मतदार संघाची एकत्रीत बैठक संपन्न झाली, असल्याची माहिती जिल्हा खर्च सनियंत्रण समितीचे समन्वय अधिकारी अमित मेश्राम यांनी दिली आहे.
या बैठकीस जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील, निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. दिव्या के.जे., समन्वय अधिकारी जिल्हा खर्च सनियंत्रण समिती अमित के. मेश्राम व डॉ. शिवप्रसाद खोत, तीनही विधानसभा मतदार संघातील सहाय्यक खर्च निरीक्षक, लेखापथक, व्हिडीओ पाहणी पथक प्रमुख तसेच निवडणूक लढवणारे उमेदवार, प्रतिनिधी या बैठकीस उपस्थितीत होते.
या बैठकीमध्ये निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. दिव्या के.जे यांनी उमेदवारांचे नामनिर्देशन दिनांकापासून ते दि.15 नोव्हेंबर 2024 पर्यंतचे सर्व उमेदवारांचे खर्चाच्या नोंदवहीची तपासणी करुन यामधील उणिवांबाबत अभिप्राय दिला. तपासणीच्या वेळेस प्रचारादरम्यान गावोगावी काढण्यात येणाऱ्या प्रचार फेऱ्या, प्रचारसभा या सर्व ठिकाणी करण्यात आलेला खर्च हा उमेदवारांच्या खर्चाच्या लेख्यामध्ये नोंदविला असल्याबाबतची खात्री केली. उमेदवारांनी मतदानाच्या दिवशीचा मतदान केंद्रावरील उमेदवारांनी नेमलेले अधिकृत प्रतिनिधींचा खर्च, मतदान केंद्राबाहेरील उमेदवारांचे बुथ, आणि जे उमेदवार निवडून येतील त्यांनी निकाला दिवशीचा खर्च लेख्यांमध्ये नोंदवावा असेही सूचना दिल्या. तसेच उमेदवारांनी निवडणूक कालावधीमधील केलेल्या सर्व प्रकारच्या खर्चाचे उपप्रमाणके सादर करावीत अशाही सूचना दिल्या.
तसेच अंतिम ताळमेळ बैठक निकालानंतर 26 व्या दिवशी आयोजित करण्यात आली असून त्यावेळेस सर्व उमेदवार, उमेदवार प्रतिनिधी यांनी या बैठकीस उपस्थित राहून खर्चासंबंधीचे सर्व लेखे परिपूर्णरित्या सादर करण्याच्या सूचना दिल्या. दिनांक 15 नोव्हेंबर 2024 पर्यंतचा खर्च मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तसेच उमेदवाराने सादर केलेले लेखे कोणत्याही व्यक्तीस रु. 1/- प्रती पान या दराप्रमाणे उपलब्ध होवू शकतील.