*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी अरुण वि. देशपांडे लिखित अप्रतिम लघुत्तम कथा -*
*पायरीवरची संध्याकाळ*
———————-
संध्याकाळची वेळ झाली की ,
घराच्या भल्या मोठ्या ओट्याच्या मधोमध असलेल्या पायऱ्यांवर रोजच ती येऊन बसते . तिला पाहण्याची सवय आजूबाजूला राहणाऱ्या सर्वांना होती.
अनेक सोसायट्याकडे जाणारा हा कॉमन रस्ता होता,
तिच्या घरासमोरून जाणारा येणारा तिच्या ओळखीचा असतोच त्यामुळे –
काय कस काय ? ठीक ना सगळं ?
हे दोन प्रश्न कधी बोलून, तर कधी एकमेकांकडे नुसते
हसून पाहण्यानेही विचारली जातात.
ती रहात असलेला हा बंगला परिसरातील सगळ्यात जुना होता. मोक्याच्या कॉर्नरची ही ऐसपैस जागा, प्लॉट, यावर अनेकांचा डोळा असणे नवलाचे नव्हते.
इतक्यात तरी ही जागा विक्रीस निघणार नाही ” ही गोष्ट
माहिती असल्याने, इच्छुक मंडळी फक्त मनातल्या मनात
स्वप्न पहात असत.
तिची मुले मोठ्या सिटीमध्ये मोठ्या कंपनीत भरभक्कम पगाराच्या नोकरीत असल्यामुळे , यातले कुने या गावी परत येणार नाहीत याची खात्री सगळ्यांना होती.
सगळ्यांना प्रॉब्लम एकच , अडचण एकच ..
ती म्हणजे या जागेची मालकीण चांगलीच खमकी आहे.
नवऱ्याच्या माघारी दुनियादारीची लढाई ती एकटीने लढून लढून आता ती अधिकच कणखर होऊन रहात होती.
तिला माहिती होते की आपले हे घर त्याला काही किंमत नाहीये . खरी किंमत आहे ती या जमिनीच्या तुकड्याला. हा सोन्याचा तुकडा “मिळवण्यासाठी आजूबाजूचर सगळे टपून बसलेले आहेत .
त्यांच्या दृष्टीने “ही थेरडी आटोपली तरच ही जागा आपली, तो पर्यंत चडफडत बसून वाट पाहणे” हेच हातात होते .
गेल्या काही दिवसांपासून ” ही म्हातारी एकटी राहून वेडी झाली आहे, तिच्या घरच्यांना सुद्धा असेच वाटू लागले,
ते म्हणतात ” ती वेडी झाली, हे आपल्याला वाटून काही उपयोग नाही, मेडिकल टेस्ट घेणे ” आपलीच लबाडी उघडी करेल.
म्हातारीच्या कानावर या गोष्टी येतच होत्या, याबद्दल एक शब्द न बोलता आल्यागेल्याशी आपलेपणाने बोलून ती
सगळ्यांना जोडून होती.
या चतुर म्हातारीला वेडी ठरवणारे अजून बधिर होऊन चाफडत बसलेले पाहून, संध्याकाळी पायऱ्यावर बसून म्हातारी मनातल्या मनात वेड्यासारखी हसत बसते
—————————————–
लघुकथा- पायरीवरची संध्याकाळ
ले- अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342
—————————————–