*मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा गर्जे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आभास मनाचे…*
चंद्रही तोच आहे
त्याच चांदण्याही
वाटती आताशा
परक्याच त्याही
चंद्रही पोळतो अन्
जाळती चांदण्याही
का उगाच छळती
उमगत काही नाही
सुखावित होते
मला हेच तारे
तेच मला आताशा
नकोसे झाले सारे
हव्यास नव्हता
मला चांदव्याचा
एकटेपणात होता
मज आधार त्याचा
निळ्या नभांगणी
खेळणारे चंद्र तारे
अचानक एवढे
का नकोसे झाले?
आकाशही रिकामे
नव्हतेच चंद्र तारे
का माझिया मनाचे
होते आभास सारे
@अरुणा गर्जे
नांदेड