You are currently viewing कर्नाटकात साहित्यिक वि. ग.सातपुते यांचा सत्कार

कर्नाटकात साहित्यिक वि. ग.सातपुते यांचा सत्कार

पुणे :

अ.भा.म.सा. कर्नाटक राज्य साहित्य परिषद व महाराष्ट्र मंडळ, बेंगलोर यांनी आयोजित केलेल्या साहित्यिकांच्या सत्कार समारंभात महाराष्ट्रातील पुणे येथील सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक भावकवी (विगसा) वि. ग. सातपुते सरांचा मानाचा साहित्यिक गौरव पुरस्कार देऊन बेंगलोर येथील महाराष्ट्र् मंडळात सत्कार करण्यात आला. दीपप्रज्वलनानंतर अभा मराठी साहित्य परिषद मुंबईचे उपाध्यक्ष मा. गुरय्यास्वामी यांनी या अलौकिक समारंभाचे प्रास्ताविक केले.

माननीय वि.ग.सातपुते विगसा (आप्पा) सातपुते सर साहित्य क्षेत्रातील विद्यमान ज्येष्ठ साहित्यिक, भावकवी आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत. महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे, मुंबई, ठाणे, मराठवाडा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

त्यांची आजपर्यंत 40 पुस्तके प्रकाशित आहेत. नुकतीच त्यांच्या संस्कार शिदोरी 600 पानांच्या पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित झाली. त्यांचे अध्यात्मिक लेखन, अध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांना आलेल्या अनेक अनुभूतींच्या आधारावर त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी फक्त बोलत रहावे आणि आपण फक्त ऐकतच राहावे असे मनापासून वाटते.

आप्पांच्या तरल व भावनाप्रधान, अशा वेगळ्या धाटणीच्या असलेल्या भावकविता लोकांना खूप भावतात. त्यामुळेच त्यांना भावकवी ही पदवी किंवा ही उपाधी मिळालेली आहे.

अशा थोर व्यक्तींचा सत्कार होणं, ही खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि विगसातपुते ( आप्पा ) यांचे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर इतर प्रांतातील मराठी संस्थांनी देखील सत्कार केले आहेत ही खुप आनंदाची गोष्ट आहे.

*नदिष्ट* अनेक पुरस्कार मिळालेल्या या पुस्तकाचे लेखक *प्रा. मनोज बोरगावकर (नांदेड )* यांची प्रगट मुलाखत *डॉक्टर अनुराग लव्हेकर* यांनी मार्मिक संवादाद्वारे घेतली गेली. मुलाखतीमधून अगदी मोकळेपणाने व्यक्त होताना पोहता पोहता नदी माझ्यात शिरली म्हणजे त्याचवेळी मी तिच्या प्रेमात पडलो असं सांगितलं.. नदीशी संवाद करत असताना रात्रीच्या वेळी ती झोपते, तिचा गर्भाशय खूप विस्तारीत आहे ही उपमा देताना त्यामध्ये असणारे अनेक गर्भित अर्थ आम्हाला खूप जाणवले त्यावर एक वेगळ्या प्रकारचे लेखनही होऊ शकतं असंही वाटलं. राजबिंडा सारखा चालणारा मोर ही आवडला.. त्यांनी योग्य दाखले देत.. पुस्तकातील अनेक बाबींवर भाष्य केले..

या कार्यक्रमात बेंगलोर , गुलबर्गा बेळगाव येथील कवी साहित्यिक डॉ. संध्या अन्वेकर, डॉ. अनुराग लव्हेकर , संत साहित्याचे अभ्यासक डॉ. राजेंद्र पडतुरे , सौ. प्रतिभा टेकाडे आणि कर्नाटक मराठी साहित्य परिषदेच्या सौ. दीपाली वझे , सुरेखा कुलकर्णी , महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष ओंकार संगोराम , दीपक कुलकर्णी , राकेश शेटे , तुषार भट डॉ. महेश वझे , प्रा व्यंकटेश देवनपल्ली , अनिरुद्ध शास्त्री , पुण्याहून ज्येष्ठ गझलकार मकरंद घाणेकर आणि कवयित्री सौ. वंदना घाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सौ. गायत्री बेहरे यांनी गणेशस्तवन सादर केले , सौ. स्नेहा घाटे यांनी सूत्र संचालन केले तर या समारंभात झालेल्या काव्यमैफिलीचे नेतृत्व सौ. प्रतिभा टेकाडे यांनी केले. आणि समारोप आणि आभारप्रदर्शन सौ. दीपाली वझे यांनी केल्यानंतर समारंभाची सांगता झाली.

*वृत्तांकन:- सौ. वंदना घाणेकर*

प्रतिक्रिया व्यक्त करा