You are currently viewing चित्र प्रदर्शन

चित्र प्रदर्शन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*

 

*चित्र प्रदर्शन*

 

जहांगीर आर्ट गॅलरी आमच्या कॉलेजच्या अगदी समोरच. रोजच तिथे कसली ना कसली तरी प्रदर्शने भरलेली असत. ( म्हणजे अजूनही भरत असतीलच.) मी सांगत आहे ६२/६४ वर्षांपूर्वीची हकीकत.

एम. एफ. हुसेन, अमृता शेरगिल, एस. एच. रझा वगैरे नामवंत भारतीय चित्रकारांची चित्रे मी याच प्रदर्शनातून पाहिलेली आहेत आणि त्याचबरोबर उभरत्या, नवोदित चित्रकारांची प्रदर्शने तर सर्रास भरायची त्या गॅलरीमध्ये. आम्ही मैत्रिणी, चित्रकलेचे शून्य ज्ञान, परंतु काही चित्रात मात्र मन गुंतून राहायचे, मग त्या चित्रांचा अर्थ लावण्याचा आम्ही प्रयत्न करायचो.

या आर्ट गॅलरीत प्रसिद्ध चित्रकार लिओनार्डो दा विनची यांचे मोनालिसा, तिचे सौंदर्य, तिचे स्मित हास्य आणि त्यावरून तयार झालेले भारतीय मोनालिसाचे पेंटिंगही पाहण्याचा योग मला आला आहे. त्या वेळचे दीपावली, दीपलक्ष्मी

आणि हंस या दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठावरील रघुवीर मुळगावकर आणि दीनानाथ दलाल यांनी काढलेली स्त्रियांची सुंदर चित्रे पाहताना फार आनंद वाटत असे. कालिदासाच्या मेघदूत मधील यक्षाच्या प्रेयसीचे सौंदर्य साक्षात साकारल्याचा भास होत असे.

साहित्यात जसे ग्रेस, कवी बी, बा.सी. मर्ढेकर वगैरे कवी अनाकलनीय,

तसेच चित्रकारांच्या बाबतीतही म्हणावे लागेल. चित्रकार त्यांच्या मनातील भाव चित्र काढून व्यक्त करतात, परंतु प्रत्येकच चित्राचा अर्थ पाहणाऱ्याला उलगडतोच असे नाही. त्यात ती जर नव चित्रकला असेल तर विचारावयासच नको.

एकदा असेच झाले. गॅलरीत बरीच छान छान चित्रे बघत बघत एका चित्रापाशी येऊन मी थबकले. समोरून, साईडने, सर्व अँगल्स मधून मी ते चित्र निरखले, परंतु ते चित्र नेमके काय आहे याचा काही केल्या बोध होईना. एका पांढऱ्या शुभ्र कागदावर गुलाबी, थोडे लालसर रंगाचे नुसते फरांटे मारलेले. प्रदर्शनासाठी या चित्राची निवड झाली होती, म्हणजे याला नक्कीच काहीतरी अर्थ असावा याची खात्री होती. थोड्यावेळाने एक तिशीतला तरुण माझ्याजवळ आला. खादीचा सदरा, सफेद लेंगा, केस मानेपर्यंत वाढलेले, गळ्यात शबनम बॅग. त्याचा एकूण अवतार पाहून तो कलावंत असणार याची मला कल्पना आली.

बहुतेक त्या चित्राकडे पाहून माझ्या मनाची

चलबिचल ओळखूनच तो माझ्याकडे आला असावा.” एक्सक्युज मी. ताई, तुम्हाला काही मदत हवी आहे का? ” त्याने मला विचारले. ” हो! या चित्राविषयी तुम्ही मला काही सांगू शकाल का? ” मी लगेचच प्रश्न केला. ” नक्की! हे चित्र माझेच आहे. ”

त्याने मला काय सांगावे? “ताई, सज्जातून एका तरुणीने तिच्या प्रियकराला चोरून पाहिले, त्यांची नजरा नजर झाली आणि त्या क्षणी तिच्या मनात जे तांबडे गुलाबी भाव उमटले ते या चित्रात दाखविले आहेत.”

बापरे! हे आम्हाला कसे कळावे? पुसटशी शंका आली होती की या चित्राचा प्रेमाशी संबंध असावा. जसे कवी मन तसेच चित्रकाराचे मन, जरा अधिकच संदिग्ध!

हं! माझ्यासारख्या सामान्यांची झेप ती किती? दोन टवटवीत दिसणारे, उमलणारे गुलाब पाहून फार तर मी अर्थ लावेन एका आईची दोन गोजिरवाणी लेकरे जशी. किंवा खवळलेल्या सागराचे चित्र पाहून एखाद्या संतप्त व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर येईल. अंधाऱ्या खोलीत शांतपणे जळणाऱ्या समईतील वातीकडे पाहून संकटातही मार्ग सापडतो, प्रकाश दिसतो अशी सूचना देणारे चित्र असावे असा मी अंदाज बांधेन, पण या नवचित्रकारांच्या चित्रांचा अर्थ शोधणे महाकठीण. फार तर पिवळा रंग ज्ञानाचा, सुगंध देणाऱ्या सोनचाफ्याचा, पर्यायाने सुखद भावनांचा इतके मला कळू शकेल.

त्याचप्रमाणे पांढरा, केशरी, हिरवा, निळा वगैरे रंगांचा अर्थ मला लावता येईल, पण त्या पलीकडे? अहं!

कॉलेजची पदवी झाली, पदव्युत्तर परीक्षेतूनही बाहेर आले, यथाकाली विवाहबद्ध झाले, मुलगा झाला, तो चार-पाच वर्षांचा असेल, प्री स्कूल मध्ये त्याच्या टीचरने वर्गातील छोट्या छोट्या मुलांना, “तुमच्या आवडीचे कोणतेही चित्र काढा” असे सांगितल्यावर माझ्या मुलाने चित्र काढले. टीचरने विचारले, ” हे तू काय काढले आहेस? ” तेव्हा तो म्हणाला, ” मिस,

हे जंगल आहे, पण वादळ आले आणि सर्व झाडे पडून गेली, तसेच वाघाने मोठी डरकाळी फोडली आणि जंगलातली जनावरे

घाबरून पळून गेली.” कागदावर दिसत होते फक्त हिरवे गवत आणि एखादे जमिनीवर पडलेले झाड. टीचर ला त्याच्या कल्पनेचे मोठेच कौतुक वाटले. त्याने जेव्हा शाळेतील ही गोष्ट मला सांगितली तेव्हा पटकन आठवले ते जहांगीर आर्ट गॅलरी मधले ते गुलाबी चित्र!

आज मला उमगलय की शब्दांच्या पलीकडची जशी मनाची, भावनांची भाषा असते तद्वतच चित्रातील आडव्या उभ्या रेघा, आणि त्यात भरलेले विविध रंग या पलीकडे चित्र बघणाऱ्यांना काहीतरी दाखविण्याचा प्रयत्न चित्रकार त्याच्या चित्रातून करीत असतो. बघणारा मात्र संवेदनशील असला पाहिजे.

तेव्हा मंडळी चित्र प्रदर्शन म्हणजे काय याचा नेमका अर्थ आला ना तुमच्या लक्षात?

 

अरुणा मुल्हेरकर

मिशिगन

१३/११/२०२४

प्रतिक्रिया व्यक्त करा