कुडाळ
जिजाऊ माता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देताना प्रा अरूण मर्गज, उपप्राचार्य कल्पना भंडारी, उपप्राचार्य प्रियांका सिंग, प्रा.नितीन बांबर्डेकर, तृप्ती प्रभु तेंडुलकर,पल्लवी कामत व शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी
कुडाळ : योगेश परब
भारतीय संस्कृतीचे सच्चे प्रतिनिधी म्हणजे स्वामी विवेकानंद होय. युवकांमधील तेजस्वी सामर्थ्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद होय आणि मुलांना संस्कारित करून त्यांच्यामध्ये स्वराज्यस्थापनेची दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण करणारी समर्थ माता जिजाऊ ही भारतवर्षाला मिळालेली मौलिक देणगी होय असे उद्गार प्रा.अरुण मर्गज यांनी कुडाळ येथील आयोजित कार्यक्रमात बोलताना काढले.
बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये विविध विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय युवा दिन म्हणजे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये विवेकानंदांचा भारतीय अध्यात्मावर श्रद्धा असलेला विश्व बंधुत्वाची शिकवण देणारा मानवतावाद, त्याचं वैश्विक सत्य धर्माची ओळख करून देणारे तत्त्वज्ञान आणि सर्वांगिण विकासाचे शिक्षण देणारे ते खरे शिक्षण याबद्दलची स्वामी विवेकानंदांची विचारधारा यांचा उपस्थितांना परिचय करून दिला.
तसेच राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त हिंदवी स्वराज्य निर्मिती मधील जिजाऊचे योगदान, छत्रपती शिवाजी महाराज घडविण्याबाबतची त्यांची भूमिका यांची उपस्थितांना माहिती दिली. तसेच आई समर्थ असेल, स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची शिकून घेणारी असेल तर शिवाजी महाराजांसारखा राजा कसा निर्माण होऊ शकतो त्याचे अनेक उदाहरणातून त्यांनी विवेचन केले. त्यांचे विचार सर्वांनी आत्मसात केले, त्यांचे आदर्शवत विचार घेऊन भावी पिढी आपण घडवली तर ती खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली ठरेल असे सांगून जिजाऊ माता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्वांनी त्यांना मानवंदना दिली व आदरांजली अर्पण केली. संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमांमध्ये बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्य कल्पना भंडारी, सी.बी.एस.सी. सेंट्रल स्कूलच्या उपप्राचार्य प्रियांका सिंग, बॅरिस्टर नाथ पै बी.एड. कॉलेजचे प्रा.नितीन बांबर्डेकर, महिला महाविद्यालयाच्या एस. एस. विभाग प्रमुख तृप्ती नाईक संस्थेच्या पी.आर.ओ.पियुषा प्रभु तेंडुलकर ,पल्लवी कामत व विविध अभ्यासक्रमाचे शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.