*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तुझ्याविना*(षोडशाक्षरी)
आठवते सदा मला भेट आपुली पहिली
फुललेल्या वृक्षाखाली चिंबल्या पावसातली
चमकल्या वीजा नभी बेभान होता तो वारा
धरलास हात माझा नजर तेव्हा भिडली
नव्हते शब्द अधरी केवळ भाषा स्पर्शाची
अंतरी थरथरता क्षण एक तो थिजला
ओसरल्या जलधारा वृक्षही सळसळला
कळलेच नाही मला पाऊस केव्हा थांबला
पाऊस तोच असतो वळतात ती पावले वाटते कधी जावे वृक्षास पुन्हा भेटावे
असतील आठवणी जपलेल्या त्या पानांनी टपटपत्या थेंबाना या ओंजळीत वेचावे
धारा धारा बरसती ओलावती पापण्या वाऱ्यासवे गंध येतो घेऊनी तव स्पर्शाला कोरड्या या देहावरी मोरपीस लहरते
पण भान येता कळे बिलगणे दुराव्याला
नसतोस जेव्हा तिथे पाऊस होतो वांझोटा
वारा वाहतो एकाकी शुष्क तुझ्या गंधाविना
ओघळती पागोळ्या उदास करी पानांना चांदण्याशी काय बोलू सांग सख्या तुझ्याविना
*राधिका भांडारकर*