अमरावती:
रविवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी भगवती भैय्यासाहेब वाटाणे यांनी लिहिलेल्या आधारवड व भैय्यासाहेब वाटाणे गौरव ग्रंथ या पुस्तकाचे प्रकाशन सकाळी अमरावतीच्या बडनेरा रोडवरील हॉटेल रंगोली पर्लमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे .भगवतीताईचा परिचय माझा अमरावतीच्या सुप्रसिद्ध धन्वंतरी डॉ.शोभाताई पोटोडे व डॉ.जयभारत पोटोडे यांच्यामार्फत झाला .भैय्यासाहेब वाटाणे विविध शासकीय पदावर राहून जेव्हा सेवानिवृत्त झाले तेव्हा ते जेव्हा अमरावतीला आले तेव्हा त्यांचा भव्य नागरिक सत्कार आम्ही अमरावतीच्या श्रीमती विमलताई देशमुख सभागृहामध्ये आयोजित केला होता .भैय्यासाहेब वाटाण्यांचं व्यक्तिमत्व अफाट .त्या व्यक्तिमत्वाबरोबर आयुष्य वेचलेल्या भगवती वाटाणे यांना व इतरांना आलेले अनुभव त्यांनी भैय्यासाहेब वाटणे गौरव ग्रंथात रेखाटले आहे. अमरावती शहरातील वाटाणे परिवाराला फार मोठा इतिहास आहे .खरं म्हणजे तो शब्दबद्ध होणे गरजेचे होते .ते महत्त्वपूर्ण काम भगवती ताईंनी पूर्ण केले आहे. त्यांच्या आधारवड ह्या प्रकाशित होणाऱ्या पुस्तकामध्ये केवळ वाटाणे परिवाराचाच नव्हे तर अमरावती जिल्ह्याचा त्या काळचा बराचसा सामाजिक राजकीय शैक्षणिक चळवळीचा भाग त्यामध्ये आलेला आहे .त्या त्या काळातील लोकांनी खरं म्हणजे पुस्तके लेख लिहायला पाहिजेत. बापूसाहेब कारंजकर यांनी अमरावती शहराचा इतिहास लिहिला .तसेच वीर उत्तमराव मोहिते यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे चरित्र लिहिले. हे दोन ग्रंथ अमरावती शहरातील मैलाचे दगड ठरले आहेत. या दोन्ही ग्रंथांमध्ये अमरावती शहरातील अनेक घडामोडींचे वर्णन आलेले आहे. आधारवड हे पुस्तक जरी दादासाहेब वाटणे व गिरजाताई वाटणे यांच्यावर लिहिलेले असले तरी तत्कालीन अमरावती जिल्ह्यातील महत्त्वाच्या सामाजिक राजकीय घटनांचे त्यात प्रतिबिंब पडलेले आहे .भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी जेव्हा पुणे येथे माध्यमिक विद्यालयात शिकत होत्या. तेव्हा योगायोगाने त्याच होस्टेलमध्ये त्यांच्या कक्षात त्यांच्या समवेत शिक्षण घेण्याचा गिरजाताई वाटणे यांना योग आला. हा प्रसंग लेखिकेने अतिशय समर्थपणे या पुस्तकात रेखाटला आहे .पुढे इंदिरा गांधी जेव्हा अमरावतीला आल्या आणि गिरिजाताई त्यांना भेटायला गेल्या .तेव्हा त्यांच्या पीएला ही जवळीक माहीत नव्हती. त्यांनी इंदिरा गांधी आपणास भेटू शकणार नाही असे स्पष्ट सांगितले .तेव्हा गिरजाताई वाटाणे यांनी त्याला दरडावून सांगितले .जा इंदिरांला सांग. गिरजा आलेली आहे आणि हे शब्द जेव्हा आपल्या आतल्या कक्षात असणाऱ्या श्रीमती इंदिरा गांधींनी ऐकले .तेव्हा त्या पटकन बाहेर आल्या आणि गिरजाताईंना भेटल्या. प्रसंग लहान आहे .पण तेवढाच महत्त्वाचा आहे आणि तो अतिशय समर्थपणे रेखाटण्याचं कौशल्य भगवतीताईंना गवसले आहे .खरं म्हणजे आपल्या भागातील लोक आता कुठे लिहायला लागलेले आहेत .दादासाहेब वाटाणे आणि गिरजाताई वाटाणे यांच्या काळामध्ये पुस्तके लिहिणे पुस्तके छापणे हा तसा दुर्मिळच प्रकार होता. पण तत्कालीन माहिती गोळा करून छायाचित्रे गोळा करून भगवतीताईंनी आधारवड या ग्रंथाची निर्मिती केली आहे. आणि ती निश्चितच अमरावतीच्या ग्रंथ संप्रदायांमध्ये नोंद करण्यासारखी आहे. खरं म्हणजे अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवूनी जाती. असं सदा घडत असते .दादासाहेब वाटाणे आणि गिरजाताई वाटणे यांचे समृद्ध सामाजिक राजकीय शैक्षणिक कार्य शब्दबद्ध करण्याचा यशस्वी प्रयत्न आधारवड या ग्रंथात भगवतीताईंनी केलेला आहे . तर भैय्यासाहेब वाटाणे या महान व्यक्तिमत्वाला त्यांनी गौरव ग्रंथात साकारले आहे.या ग्रंथातील मांडणी लेखनशैली त्याचबरोबर लिखाणातील कौशल्यता सहजता सहज लक्षात येते. खरं म्हणजे कुठलाही ग्रंथ हातात पडला आणि तो सहज सुलभ शब्दबद्ध केलेला असला तर वाचनामध्ये गोडवा निर्माण होतो. तोच धागा या दोन्ही ग्रंथामध्ये लेखिकेला गवसला आहे. अतिशय सहज सुलभ चित्तवेधक भाषा त्यांना प्राप्त झालेली आहे व ती त्यांनी या ग्रंथात प्रतिबिंबित केलेली आहे .खरं म्हणजे भैय्यासाहेब वाटाणे हा खऱ्या अर्थाने मोठा माणूस. पण आपल्याकडची माणसं समजायला वेळ लागतो. हा प्रचंड मोठ्या व्यक्तिमत्त्वाला समर्थ साथ दिली ती भगवतीताईनी. त्यांनी भैय्यासाहेबांबरोबर राहून जे संकलन केले. त्याचबरोबर सन्मानपत्र सन्मानचिन्ह यांची नीट ठेवण करून या पुस्तकांमध्ये शब्दबद्ध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि तो यशस्वी झालेला आहे. पुण्या मुंबईपेक्षा आपल्या विदर्भातील जीवन वेगळे आहे. पुण्या मुंबईच्या लेखनात तोच तो पणा आलेला आहे. परंतु आपल्या वैदर्भीय लेखनामध्ये विविधता आढळते. इथे भाषेची विविधता आहे .प्रसंगाची विविधता आहे .निसर्गाची सामाजिक जाणीवेची त्याचप्रमाणे चालीरीतींची जी प्रचुरता आहे. ती या दोन्ही ग्रंथामध्ये समाविष्ट झालेली आहे .भगवतीताई यांनी आधार वडाची निर्मिती करून केवळ दादासाहेब वाटाणे व गिरजाताई वाटाणे यांच्यावरच प्रकाश टाकला असे नाही तर त्यांनी तत्कालीन अमरावती व अमरावती जिल्हा याचा एक चालता बोलता अल्प इतिहास आपल्यासमोर समर्थपणे उभा केलेला आहे. आणि ही खरोखरच जमेची बाजू आहे. कथा कवितासंग्रह भरपूर येतात .परंतु आधारवडाची निर्मिती करून भगवतीताईनी समाजासमोर दोन प्रचंड व्यक्तिमत्त्वाच्या अमरावतीकर माणसांची ओळख करून दिलेली आहे. ती इतकी समर्थ आहे की हा ग्रंथ वाचताना ते चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते .हे फार कमी लोकांना साध्य होते .इतकी सहजता या ग्रंथांमध्ये आहे. आणि ही सहजता प्राप्त करण्यासाठी भगवतीताईना आपल्या इतक्या वर्षाची तपश्चर्या पणाला लावावी लागली आहे .प्रचंड मोठे व्यक्तिमत्व असलेल्या भैय्यासाहेब वाटाण्यांबरोबर आयुष्य घालवताना तसेच त्यांच्याबरोबर विविध मोठ्या प्रसंगांमध्ये मोठ्या लोकांमध्ये वावरताना भगवतीताईनी स्वतःमध्ये जी प्रगल्भता व सादर करण्याची सहजता संपादन केलेली आहे ती डोळ्यात भरण्यासारखी आहे .सामान्यपणे गृहिणी लिहिण्याच्या मोहात पडत नाहीत. कारण विदर्भातील गृहिणींच्या भोवती संसाराच्या तुरुंगामध्ये कैद तुला झाली हाच प्रकार आढळतो .आता कुठे त्यामध्ये बदल होत आहे.त्यांना वाटते छोटासा तर प्रसंग आहे.यात लिहिण्यासारखं काय आहे. परंतु हा छोटासा प्रसंग देखील अनेक लोकांना प्रेरणा देणारा असतो हे या पुस्तकातून जाणवत आहे आणि म्हणूनच भगवती ताईच्या रूपाने अमरावतीच्या साहित्य विश्वात एका लेखिकेची भर पडली आहे आणि ती निश्चितच समृद्ध व संपन्न अशा स्वरूपाची आहे आणि आज म्हणूनच त्यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने त्यांच्या या दोन ग्रंथावर लिहिताना मला खूप आनंद होत आहे .या निमित्ताने आमच्या वाचकांना एवढेच सांगायचे आहे की तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना मग त्या पारिवारिक पण असू द्या त्या जर आपण शब्दबद्ध केल्या तर निश्चितच समाजापर्यंत पोहोचल्या .तर तुम्हालाही समाधान मिळेल आणि सर्वात महत्त्वाचे ती घटना एखाद्या व्यक्तीला जरी प्रेरणादायी ठरली तरी तुमच्या लिखाणाचे उद्दिष्ट साध्य झाले असे होईल . या ग्रंथाची अतिशय सुंदर अशी सजावट मांडणी टंकलेखन मुखपृष्ठ आतील छायाचित्र ज्ञानपथ प्रकाशन अमरावतीने केलेली आहे. हे ग्रंथ पाहिल्यानंतर हे अमरावतीला छापले गेले आहेत त्यावर विश्वासच बसत नाही इतके सुंदर साज प्रकाशकाने या ग्रंथावर चढवलेले आहेत .त्यामुळे प्रकाशनाचे सर्व सहकारी अभिनंदनास आज पात्र आहेत. आज रविवार दिनांक 10 रोजी भगवती ताईच्या पुस्तकाचे अमरावती येथे हॉटेल रंगोली पर्ल येथे प्रकाशन होत आहे. या प्रकाशानाला अमरावती शहरातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्त भगवतीताईना हार्दिक हार्दिक शुभेच्छा….
प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003