You are currently viewing शेवटी वजीर मैदानात….

शेवटी वजीर मैदानात….

*शेवटी वजीर मैदानात….*

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होत असताना मंत्री दीपक केसरकर एकटे पडतात की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु खासदार नारायण राणे आणि राणे कुटुंबीयांनी नाम.दिपक केसरकर यांच्या मागे ठामपणे उभे राहण्याचे जाहीर केले आणि दिपक केसरकर यांच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली.
नाम.दिपक केसरकर यांच्या प्रचारापासून अलिप्त राहून भाजपाच्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी भाजपामधून निलंबित झालेले अपक्ष उमेदवार विशाल परब यांना पाठिंबा दिला होता. एवढेच नव्हे तर काहीजण विशाल परब यांचा खुलेआम प्रचार करत होते; आणि निरोप देऊनही काहीजण ऐकत नसल्याने शेवटी वजीर मैदानात उतरला आणि प्रचाराची दिशाच बदलली. त्यामुळे राणेंच्या झंझावातात सिंधुदुर्गात शांत, संयमी, प्रगल्भ आणि चाणाक्ष केसरकरांचा निभाव का लागला..? या केसरकरांच्या मुत्सद्देगिरीचा प्रत्यय आला.
सावंतवाडी मतदारसंघात लढत नाम.केसरकर विरुद्ध तिघे म्हणजेच तेली, परब, परब; परंतु प्रतिष्ठा पणाला लागली ती राणेंची..!
मागील लोकसभेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांनी स्वतःची कामगिरी अचूकपणे बजावत नारायण राणे यांच्यासाठी जीवाचे रान केले आणि नारायण राणेंच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला अगदी खास.नारायण राणेंनी देखील हे मान्य केले होते. त्यामुळे आता परतफेड करण्याची पाळी राणेंची होती, परंतु सारीपाटावरील प्यादे मात्र वेगळ्याच भूमिकेत वावरत होते. शेवटी राणे हे राणेच..! “जे पुरून उरतात ते राणे” याचा प्रत्यय काल आला आणि राणेंचे कार्यकर्ते आपल्या व्हाट्सअप स्टेटसला सुद्धा साहेबांचा आदेश असा संदेश लिहून नाम.दिपक केसरकर यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले.
राणेंचे वजीर स्वतःच्या मतदारसंघातील आपला स्वतःचा प्रचार सोडून थेट सावंतवाडीत नाम.केसरकरांच्या मदतीला धावले. दिवाळीला सुद्धा वेळ न मिळालेले वजीर थेट कार्यकर्त्यांच्या घरी गेले आणि राणे स्टाईलने शुभाशीर्वाद देऊन कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. राजकारणात मुरलेल्या केसरकरांनी सर्व कार्यकर्त्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली होती. प्रचाराचा शुभारंभ करण्याची वेळ आली तरी भाजपाचे पदाधिकारी विरोधकांच्या तंबूत असल्याचे चित्र दिसत असल्याने एका दगडात दोन पक्षी मारत केसरकरांनी खास.राणे, राणेंचे वजीर आणि नाम.रवींद्र चव्हाण यांच्या मदतीने प्रचारात आघाडी घेतली. नाम.केसरकर यांना मानणारे मतदार कुडाळ मतदारसंघात देखील असल्याने निलेश राणे यांच्यासाठी कुडाळ मतदारसंघात केसरकरांची मदत लागणार असल्याने राणेंचा वजीर सावंतवाडीच्या मैदानात उतरला आणि फरार झालेल्या प्यादांना पुन्हा रणांगणामध्ये उतरून केसरकरांसाठी लढण्यास प्रवृत्त केले.
खास.नारायण राणे यांचा अनुभव, आम.नितेश राणेंची रणनीती, नाम.रवींद्र चव्हाण यांची लढवय्या नीती आणि नाम. दिपक केसरकर यांची मुत्सद्देगिरी या चारही शस्त्रांचा संगम झाल्याने कोणी कितीही वल्गना केल्या, फुशारक्या मारल्या, विकासाची स्वप्ने दाखवली तरी विरोधकांची ताकद सर्व सुज्ञ मतदार जाणून असल्याने नाम. दिपक केसरकर यांना हरविणे वाटते तितकं सोप्पं नाही हे मात्र निश्चित..!

प्रतिक्रिया व्यक्त करा