उमेदवारांसाठी खर्चाचा हिशेब तपासण्याच्या तारखा जाहीर*
सिंधुदुर्गनगरी
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांचा दैनंदिन खर्चाचा हिशेब प्रचार कालावधीत किमान तीनवेळा निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले खर्च निरीक्षकांकडून तपासणे आवश्यक आहे. त्यानुसार कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाच्या तपासणीचे वेळापत्रक जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडून जाहीर केल्याची माहिती जिल्हा खर्च सनियंत्रण समिती समन्वय अधिकारी अमित मेश्राम यांनी दिली आहे. या वेळापत्रकानुसार तिन्ही मतदारसंघातील सर्व उमेदवारांच्या खर्चाची प्रथम तपासणी ९ नोव्हेंबर, द्वितीय तपासणी १३ रोजी व तृतीय तपासणी १७ रोजी होणार आहे. या तिन्ही तपासण्या जिल्हा नियोजन समिती सभागृह (नवीन) जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे होणार आहेत. उमेदवारांना खर्च मर्यादा ४० लाख असून या तपासणीत उमेदवारांकडून आयोगाने आखून दिलेल्या विहित नियमानुसार व मर्यादेत खर्च करीत आहेत किंवा कसे? याची खातरजमा निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. दिव्या के. जे. यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा खर्च सनियंत्रण समितीकडून केली जाणार आहे. उमेदवार, उमेदवारांचे खर्च प्रतिनिधी यांनी विहित वेळेत अभिलेख निवडणूक खर्च निरीक्षक यांना तपासणीसाठी उपलब्ध करुन न दिल्यास लोकप्रतिनिधित्व कलमान्वये उमेदवाराने खर्चाचे दैनंदिन अभिलेख अद्यावत ठेवले नसल्याचे समजण्यात येऊन उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नोटीस बजावल्या जातील. मर्यादेपेक्षा जास्त खर्च करेल त्याला अपात्र करण्याबाबत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आहेत.