You are currently viewing दृष्टी असलेला माणूस : दादासाहेब काळमेघ

दृष्टी असलेला माणूस : दादासाहेब काळमेघ

दृष्टी असलेला माणूस : दादासाहेब काळमेघ

अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणुकीची धामधूम सुरू होती .श्री दादासाहेब काळमेघ हे अर्थातच अध्यक्षपदाचे उमेदवार होते. या धामधुमीत मला एका प्रज्ञावंत प्राध्यापकाचा फोन आला. ते मला म्हणाले दादासाहेब काळमेघ हा माणूस कसा आहे. मी म्हटलं एकदम चांगला. ते म्हणाले तुम्ही त्यांचे भक्त आहात .खरोखर मनापासून हृदयापासून सांगा. मी त्यांना म्हटले मी हृदयापासूनच सांगत आहे. हा माणूस गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा. डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे महाराजांचा वारसा चालवणारा माणूस आहे. पुढे ते प्राध्यापक म्हणाले. दादासाहेब अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभे राहू शकणार नाहीत अशा एका त्यांच्या विरोधक गटाच्या कार्यवाही सुरू आहेत. मला माहिती मिळाली. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही दादासाहेबांच्या कानावर ही बातमी टाका. तेव्हा मोबाईल यायचा होता. मी दादासाहेबांना नागपूरला फोन लावला. शरदरावानी फोन उचलला .त्यांनी सांगितले दादा अमरावतीला गेलेले आहेत. मी अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांच्या अतिथीगृहात फोन लावला. फोनवर हेमंतराव होते. मी हेमंतरावांना सांगितलं कितीही रात्र होऊ द्या .दादासाहेब आल्याबरोबर मला फोन करा. अतिशय महत्त्वाचे काम आहे. मध्यरात्रीच्या सुमारास दादासाहेबांचा फोन आला. मी त्यांना भेटायला गेलो. दादासाहेब नेहमीप्रमाणे रेस्ट हाऊसच्या बाहेर गोतावळा घेऊन बसले होते. मी नमस्कार केला. म्हटलं दादा खाजगीत काही बोलायचं आहे. दादासाहेब म्हणाले इथेच बोला .सगळे आपलीच माणसे आहेत. मी त्यांना मला मिळालेली माहिती सांगितली. दादासाहेब जोराने हसत म्हणाले. काठोळे तुम्ही राजकारणात कच्चे आहात .अरे अशा लय वावड्या उडत आहेत .मी अध्यक्ष निवडून येणार आहे. सगळ्यांना माहीत आहे. लोक अफवा पसरवतात. तुम्ही जी गोष्ट मला सांगितली ती गोष्ट अमलात आणण्यासाठी विधानसभेला बहुमताने ठराव घ्यावा लागेल आणि आता अधिवेशन कुठे सुरू आहे. त्यामुळे त्या गोष्टीत काही अर्थ नाही. त्यांनी प्राध्यापक आबासाहेब बुरघाटेना बोलावले .का रे आबा हा काठोळे असे असे म्हणतो. त्याच्यात काही अर्थ आहे काय. बुरघाटे सर माझ्याच महाविद्यालयात होते .शिवाय त्यांचा विषय वाणिज्य. त्यांना या तांत्रिक बाबीची जाणीव नव्हती. त्यांनी दादासाहेबांच्या हो ला हो मिळवला. खरंतर आम्ही त्या दिवशी एखादा वकील एखादा संविधान तज्ञ बोलावला असता तर दादा अध्यक्ष परत झाले असते. मी दादासाहेबांना म्हटले. दादासाहेब त्या प्राध्यापकांना तुम्हाला भेटायची इच्छा आहे. दादासाहेब म्हणाले काठोळे काही भेटीगाठी करू नका .मी निवडणुकीला उभा राहणार आहे आणि निवडूण येणार आहे .हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. आणि विपरीत घडले. तेव्हा भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे राज्य होते. विरोधकांनी बरोबर फिल्डिंग लावली होती . दादासाहेब ज्या दिवशी फॉर्म भरणार. त्याच्या एक दिवशी विरोधक राज्यपालाकडून वटहुकूम काढण्यास यशस्वी झाले. त्या वटहुकूमनुसार दादासाहेबांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभे राहता येणार नव्हते. कोर्टात जायलाही वेळ नव्हता. दादासाहेबांनी वेळेवर वसंतराव धोत्रे यांचे नाव पुढे केले आणि त्यांना निवडून आणले.
दादासाहेब चौसाळ्याचे आणि मी त्यांच्या गावाजवळील सातेगावचा. एका विचारसरणीमुळे आम्ही एकत्र आलो. आम्ही इतक्या जवळ आलो की इतरांनाही नवल वाटायचं. मी साधा प्राध्यापक. दादासाहेब माजी कुलगुरू. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष .पण मला भेटतांना ते एक वरिष्ठ मित्र म्हणूनच भेटले. मला नेहमी म्हणायचे काठोळे तुम्ही आमच्या शिवाजी सोसायटीत पाहिजे होते.
दादासाहेबांचे पहिले पुस्तक मीच प्रकाशित केले आणि त्यांचा भव्य नागरिक सत्कार देखील मीच घडवून आणला. त्या कामी मला प्राचार्य भा वा चौखंडे व प्राचार्य डॉक्टर एकनाथ गावंडे यांची मोलाची मदत झाली. संचालक मंडळामध्ये सगळे विरोधक आणि दादासाहेब अध्यक्ष. पण तरीही दादासाहेब सगळ्यांना पुरून उरले. त्या अटीतटीच्या प्रसंगामध्ये मी दादासाहेबांचा सत्कार घडवून आणला. इतका मोठा सत्कार इतक्या विरोधाच्या वातावरणात घडवून आणणे ही तारेवरची कसरत .पण माझ्या मागे दादा साहेबांचे मित्र मंडळ उभे राहिले आणि मराठीतील सुप्रसिद्ध साहित्य प्राध्यापक डॉक्टर भाऊ लोखंडे यांच्या उपस्थितीत अमरावतीच्या श्रीमती विमलताई देशमुख सभागृहात हा भव्य कार्यक्रम संपन्न झाला. आम्ही पंचवटी चौकातील डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यापासून दादासाहेबांची वाजत गाजत मिरवणूक काढली .दादासाहेब कारमध्ये न बसता पैदल सहभागी झाले .आम्ही कार्यक्रमाची जयंत तयारी केली होती. दादा साहेबांचे पहिले पुस्तक दादांचे अभंग याची जबाबदारी प्राचार्य सुधीर मोदे व श्री संजय तराळ यांच्यावर दिली होती .त्यांनी ती अतिशय समर्थपणे पार पाडली व कार्यक्रमाच्या दिवशी पुस्तकाचे प्रकाशन झाले.
दादासाहेब कुलगुरू होण्याच्या अगोदर राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक होते. त्यांनी खुर्चीत बसून कधी कामच केली नाही. फिल्डमध्ये काम करण्याची त्यांना भारी सवय. भजन कीर्तनात त्यांचा भरपूर वेळ जायचा. भजन किर्तन हा दादांचा वीक पॉईंट. भजनाचा कीर्तनाचा होका आला की दादासाहेब नाही म्हणायचे नाही. लोक टीका टिपणी करायचे. शिवाजी सोसायटीचा अध्यक्ष. भजन कीर्तन प्रवचन करतो. ते म्हणायचे मी दारू तर नाही पित .लोकांना प्रबोधन करतो .लोकांना प्रसन्न करतो आणि मी प्रसन्न राहतो. आणि हे सर्व मी कार्यालय संपल्यानंतर करतो.
त्यांच्या खरेच होते. भजन कीर्तन प्रवचन करत असल्यामुळे श्री शिवाजी शिक्षण संस्था लोकाभिमुख होत होती .खऱ्या अर्थाने डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी लोक विद्यापीठाचा एका अर्थाने हा एक भागच होता. पण खरे समजायला वेळ लागतो. तेच दादासाहेबांच्या बाबतीत झाले .
तत्पर निर्णय घेण्यामध्ये दादासाहेबांचा हातखंडा होता. एका महाविद्यालयामध्ये ते तपासण्यासाठी गेले. प्राचार्य त्यांना एका प्रयोगशाळेमध्ये घेऊन गेले. तिथला प्रयोगशाळात सहाय्यक हा एमएससी गणित होता. त्याचे ती पात्रता पाहून दादासाहेबांनी त्याला ताबडतोब तोंडी आदेश दिला. आपले भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे नवीन विज्ञान महाविद्यालय निघाले आहे. तू आजच्या आज तिथे पोहोच. प्राचार्यांना माझं नाव सांग आणि प्राध्यापक म्हणून रुजू हो. काळजी करू नकोस .किती ही तत्परता . त्यामुळे दादासाहेब त्यांच्या विरोधकातही चर्चेला जात होते. आम्हाला आठवते आमचा सावनेरला राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यापीठस्तरीय कॅम्प होता. संयोजक आम्हाला कोराडी प्रकल्प दाखवायला घेऊन गेले होते. येताना आमची गाडी खराब झाली .27 मे 1974 हा तो दिवस होता. आम्ही सर्वजण सावनेरला पायी जात होतो. दादासाहेबांना ते कळले .त्यांनी लगेच आमच्यासाठी गाड्या पाठवल्या. दादासाहेबांना लोकप्रतिनिधी व्हायचे होते .पण ते जमले नाही. पण ते म्हणाले मी आमदार खासदार नाही झालो. पण माझे विद्यार्थी श्रीकांत जिचकार नितीन गडकरी हे लोकप्रतिनिधी झाले आणि मीच झाल्यासारखे आहे. आणि ते खरेच होते.
दादासाहेब नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू असतानाची गोष्ट .मी बसने अमरावती वरून नागपूरला निघालो होतो. आमची गाडी कोंढाळीला चहा पिण्यासाठी थांबले. लोक उतरायला लागले .लोक उतरल्यानंतर दादासाहेब गाडीमध्ये चढले. मी त्यांना पाहताच नमस्कार केला. मला ते म्हणाले. काठोळे जागा आहे का. अर्थात जागा होतीच. दादासाहेबांबरोबर मोतीराम महाराज होते .आम्ही दोघांनाही जागा करून दिली. दादासाहेब म्हणाले .माझी गाडी इथे कोंढाळीला बिघडली. आता नागपूरला फोन करा .गाडी बोलवा. तेवढा वेळ थांबा. त्यापेक्षा मी बसने जाण्याचा निर्णय घेतला. दादासाहेबांबरोबर एलआयटी हा बसने प्रवास करण्याचा योग आला. एक कुलगुरू बसने प्रवास करतो ही गोष्ट खरे इतिहासात लिहून ठेवण्यासारखी आहे.
दादासाहेबांना दूरदृष्टी होती .श्री शिवाजी शिक्षण संस्थेला संपूर्ण भारतामध्ये शिखर संस्थेचा दर्जा द्यावा ही संस्था राष्ट्रीय स्तरावरची व्हावी ही त्यांची मनोमन इच्छा होती .त्यासाठी त्यांचे सातत्याने तन-मनधनाने प्रयत्न सुरू होते. पण काळाला हे पाहवले नाही .आणि त्यांचे अकाली निधन झाले. त्यांचा वारसा त्यांचे सुपुत्र श्री हेमंत काळमेघ त्याच दूर दृष्टीने पुढे नेत आहेत .दादासाहेब आज आपल्यात नसले तरी …रहे ना रहे हम महका करेंगे …या नात्याने ते सदैव दरवळत राहतील .अशी माणसे फार कमी होतात .अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती असेच दादासाहेबाबाबत म्हणावे लागेल. या माणसाने घरादारावर पाणी सोडून श्री शिवाजी शिक्षण संस्थेसाठी तसेच समाजासाठी आपले तन -मन-धन खऱ्या अर्थाने अर्पण केले होते .म्हणून अशा या महापुरुषाला त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आय ए एस अमरावती कॅम्प 9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा